Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – वृषभ रास

राहु-केतु परिवर्तन – वृषभ रास

 

लाभाची, प्रगतीची स्थिती

संघर्षातून, त्रासातून मुक्ती

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत लग्न स्थानात किंवा चंद्राच्या सोबतीला राहु ग्रह विराजमान असेल किंवा राशि स्वामी सोबत राहु ग्रह विराजमान असेल तर अशा जातकाला जगातील प्रत्येक गोष्ट हवी असते. प्रत्येक ठिकाणी यश मिळविणं, सतत धडपड करणं, त्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरणं, काहीही करुन हवी असलेली गोष्ट आपल्याला मिळायलाच हवी, त्यासाठी वाटेल तेवढे परिश्रम करण्याची तयारी राहु त्या जातकाला प्रदान करतो. याच्या अगदी विरुद्ध स्थिती केतु सोबत असते. म्हणजे केतु ग्रह जर लग्न स्थानात असेल, राशी स्वामी सोबत असेल तर तो कुठेतरी निराशा देतो. विषयाकडे सोडून देणे, जास्तीचे परिश्रम न करणे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी काहीशी भूमिका अशा जातकांची असते. हा मुलभूत विरोधाभास राहु आणि केतु या दोन ग्रहांच्या प्रभावांमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. #astrogurudrjyotijoshi

राहु म्हणजे भौतिकता तर केतु म्हणजे आध्यात्मिकता होय. म्हणजे राहु हा ग्रह भौतिक सुखाचा कारक मानला जातो. तर केतु हा ग्रह आध्यात्म, विरक्ती, मोक्षाचा कारक ग्रह मानला जातो. आजचं जग हे भौतिक सुखांनी वेढलेलं आहे. त्या सर्व राहुच्या अखत्यारीत येतात. गाडी, बंगला, पैसा, लॉटरी, जुगार या सर्व गोष्टी राहुवरुन पाहिल्या जातात. इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापार, परदेशगमन या गोष्टीचं स्थायी कारकत्व राहुकडे आहे. म्हणजे एखाद्या पत्रिकेत राहु बिघडलेला आहे. त्याची महादशा सुरु आहे. अशी पत्रिका जर आमच्याकडे आली तर त्यावर उपाय म्हणून आम्ही सांगत असतो, या जातकाला तुम्ही लवकरात लवकर परदेशात पाठवा. जेणे करुन इतर दुष्प्रभाव कमी होतील आणि जातकाची प्रगती होऊ शकेल.

आजच्या जगात जातकाला जे जे हवं आहे, ते ते सर्व देण्याची प्रवृत्ती राहु ग्रहाकडे आहे. केतुच्या बाबतीत सांगायचं झाल्यास याच्या अगदी विरुद्ध ज्या गोष्टी येतात त्या सर्व केतुच्या अखत्यारीत येतात, असं म्हटलं जाऊ शकतं. केतु हा ग्रह आध्यात्मिक प्रवृत्तीचा ग्रह आहे. जातकाची आध्यात्मिक उन्नती ही केतुवरुन बघितली जाते. त्याला मोक्षाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळेच राहुच्या इतकाच तोही महत्त्वपूर्ण ठरतो. कारण जीवनाचं अंतिम ध्येय हे केवळ मोक्षचं असतं. माणसाला आध्यात्म्याच्या मार्गावर नेण्याचं कार्य केतु करीत असतो. एखाद्या जातकाच्या कुंडलीतील केतु प्रबळ असेल तर तो जातक संसारापासून, जीवनातील सर्व मोहांपासून लांब जातो. सर्वांपासून तो अलिप्त होतो. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा वृषभ राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया. #drjyotijoshi


राहु हा ग्रह आतापर्यंत वृषभ राशीत विराजमान होता. आता तो तुमच्या व्यय स्थानात जाणार आहे. त्यामुळे राहु-केतुचं हे राशी परिर्वतन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून तुम्ही मानसिक समस्यांचा सामना करीत आहात. कौटुंबिक दुराव्याचा सामना करीत आहात. या सर्वातून तुमची आता सुटका होणार आहे. कारण तुमच्या राशीत विराजमान असलेला राहु राशी परिवर्तन करुन व्यय स्थानात जाणार आहे. राशीतून व्यय स्थानात त्याच्या प्रवास होणार असल्यामुळे त्याच्या अशुभ परिणामांची तीव्रता देखील कमी होणार आहे. अर्थात व्यय स्थानातील राहुला देखील खूप जास्त शुभ मानता येत नाही. मात्र गेल्या दीड वर्षांपासून तुम्हाला जो खूप जास्त त्रास सहन करावा लागला होता त्या त्रासाचा तीव्रतेत कुठेतरी कमी येईल. त्यामुळे हेही नसे थोडकं, असं म्हणावं. कारण तो राहु ग्रह आहे. त्याच्या दुष्प्रभावांची तीव्रता कमी होणं देखील लाभदायकच म्हणायला हवं. त्यानुसार वृषभ जातकांना राहु-केतुचं हे राशी परिवर्तन लाभदायक ठरणार आहे.

या परिवर्तनानुसार तुमच्या व्यय स्थानात राहु तर षष्ठ स्थानात केतु ग्रह विराजमान होणार आहे. त्यांची ही स्थिती तुम्हाला परस्पर विरुद्ध परिणाम देईल. व्यय स्थानातील राहुमुळे खर्चामध्ये अनपेक्षितरीत्या वाढ होणं, प्रवासात वाढ होणं, प्रवासावर बराच खर्च होणं या सारख्या गोष्टी घडून येतील. अर्थात, हा राहु तुम्हाला काही बाबतीत लाभ देखील देईल. जसं आपल्याला माहिती आहे की राहुला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. त्यांचाही खूप मोठा प्रभाव जातकावर होत असतो. त्यानुसार राहुची पंचम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर म्हणजे वास्तु, वाहनाच्या स्थानावर पडेल. सप्तम दृष्टी षष्ठ स्थानावर म्हणजे नोकरी, कर्ज, स्पर्धकांच्या स्थानावर पडेल. तर नवम दृष्टी अष्टम स्थानावर म्हणजे आयुष्य देणाऱ्या स्थानावर पडेल. राहुच्या या तीनही दृष्ट्यांचे शुभ अशुभ परिणाम तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होतील. एकंदरीत स्पर्धक तुम्हाला बऱ्यापैकी त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या मार्गात अडथळे, अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. अर्थात, स्पर्धकांचा त्रास असला तरी राहुच्या प्रभावामुळे त्यांचा सामना करुन विजय प्राप्त करण्याचं सामर्थ्य देखील तुमच्यात निर्माण होईल. म्हणजे संघर्ष होणार असला तरी त्यात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होणार आहे. #astrogurudrjyotijoshi

यानंतर अष्टम स्थानावर पडणाऱ्या राहुच्या दृष्टीने तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे योग निर्माण होतील. कारण पत्रिकेतील अष्टम स्थानावरुन अचानक होणारा धनलाभ देखील बघितला जातो. याशिवाय जे जातक संशोधन कार्य करीत आहेत त्यांच्यासाठी देखील राहुची ही दृष्टी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे जे जातक गेल्या अनेक दिवसांपासून, वर्षांपासून संशोधन करीत आहेत त्यांच्या संशोधनाला अचानकपणे योग्य ती दिशा प्राप्त होईल. त्याचा त्यांनी योग्य उपयोग करुन घेतला तर होऊन शकत त्यांना यश देखील मिळू शकेल. एकंदरीत वृभष जातकांना राहुचं हे परिवर्तन अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्याचा तुम्ही पुरेपुर लाभ घ्यावा.


राहु आणि केतु हे दोन टोकांना असणारे दोन ग्रह असल्यामुळे सहसा असं घडतं की एक राहु शुभ परिणाम देणार असेल तर केतु जातकासाठी अशुभ ठरतो. किंवा केतु शुभ परिणाम देणार असेल तर राहु ग्रह अशुभ फलदायी ठरतो. थोडक्यात नैसर्गिक कारकत्वानुसार देखील त्यांची फळे ही एकमेकांच्या विरुद्ध असतात. मात्र काही वेळेला असंही होतं की हे दोन्ही ग्रह जातकासाठी शुभ फलदायी ठरतात. अशी स्थिती फार क्वचितच घडत असते जी यावेळी वृषभ जातकांसाठी घडून येणार आहे. म्हणजे वृषभ जातकांसाठी राहुसह केतु पासून देखील शुभ फळांची प्राप्ती होणार आहे. कारण राहु राशीतून व्यय स्थानात गेल्यामुळे थोडा शुभ झाला. तर केतु ग्रह तुमच्या सप्तम स्थानातून षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थान हे उपचय स्थान म्हणून ओळखलं जातं. ज्योतिष नियमांनुसार कोणत्याही पाप ग्रहांना पत्रिकेतील तृतीय, षष्ठ, दशम आणि एकादश ही चार उपचय स्थानं विशेषत्वाने मानवतात. उपचय स्थानांमध्ये पाप ग्रहांची अत्यंत शुभ फळे जातकाला प्राप्त होतात. त्याला अनुसरुन तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या केतुपासून तुम्हाला शुभ फळे निश्चितच प्राप्त होतील. कितीही स्पर्धक आले, त्यांची तुमच्याशी कितीही स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्यांच्यावर मात करु शकाल. हितशत्रुंना पराभुत कराल. आयुष्यात प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल सुरु राहिल.

राहु-केतु परिवर्तन – मेष रास

थोडक्यात राहु आणि केतु या दोघांचंही परिवर्तन वृषभ जातकांसाठी अत्यंत लाभदायक राहिल, असं आपण म्हणू शकतो. मागील दीड वर्षांपेक्षा येणारी दीड वर्ष तुमच्यासाठी लाभदायक, यशदायक, प्रगतीदायक ठरतील. याच वेळी तुमच्या राशीसाठी योगकारक असलेले शनि महाराज दशम स्थानात प्रवेश करतील. ते उपयच स्थान असल्यामुळे शनि महाराजांना देखील ते विशेषत्वाने मानवतं. शिवाय ते तिथे कुंभ या आपल्या स्वराशीत असणार आहेत. २९ एप्रिल रोजी शनि महाराज कुंभ राशीत म्हणजे तुमच्या दशम स्थानात प्रवेश करतील. त्यांच्यापासूनही तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. तसेच १३ एप्रिल रोजी गुरु महाराज तुमच्या लाभ स्थानात प्रवेश करतील. जी त्यांच्यासाठी अत्यंत शुभ स्थिती असेल. अकरावा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो. त्यामुळे साहजिकच त्यांच्यापासूनही तुम्हाला अत्यंत शुभ फळे प्राप्त होतील. या सर्वांच्या एकंदरीत परिणामांचा विचार केला तर वृषभ जातकांसाठी येणाऱ्या काळात खूप चांगल्या संधी निर्माण होतील, असे आपण म्हणू शकतो. #rahuketuparivartan

तसंही २०२२ या वर्षाचं राशी भविष्य सांगतांना आपण हे वारंवार सांगितलंय की एप्रिल महिन्यानंतरचा काळ हा वृषभ जातकांसाठी विशेेष भाग्योदयाचा राहिल. त्याचं कारणच हे होतं की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे सर्वच ग्रहांच्या प्रभावाची दिशा बदलणार आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून सर्वचजण जो संघर्ष करीत आहेत त्यातून सुटका होऊन प्रगतीच्या दिशेकडे आपलं मार्गक्रमण सुरु राहिल. त्यातल्या त्यात वृषभ जातकांना राहु-केतु परिवर्तनाचे विशेष शुभ प्रभाव प्राप्त होतील. म्हणून या अत्यंत लाभदायक काळाचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यायला हवा. #drjyotijoshi

राहु-केतु परिवर्तनाचे वृषभ राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद! शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *