Skip to content
Home » शनि परिवर्तन – वृश्चिक रास

शनि परिवर्तन – वृश्चिक रास

शनि परिवर्तन – वृश्चिक रास

स्थिती विरोधाभासाची

प्राप्ती यशासह संघर्षाची

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बऱ्याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या वृश्चिक राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. #drjyotijoshi

ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया.

एक महत्त्वाचा विषय म्हणजे शनि महाराजांना राशीचक्र फिरण्यासाठी २९ ते ३० वर्ष लागतात. म्हणजे तब्बल ३० वर्षांनी शनि महाराज कुंभ या आपल्या आवडीच्या राशीत प्रवेश करणार आहेत. मात्र लगेचच काही दिवसांनी पुन्हा एकदा वक्री होऊन मकर राशीत परत जातील. आपल्या आवडत्या घरातून बाहेर निघायला फारसं कुणाला आवडत नाही. शनि महाराजांनाही ते आवडणार नाही. तरीही आपल्या अपूर्ण राहिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ते मागे येतील. १२ जुलै २०२२ रोजी ते मकर राशीत आले की जानेवारी २०२३ पर्यंत ते तिथेच राहतील. त्यानंतर पुन्हा एकदा ते कुंभ राशीत येतील. तेव्हा त्यांची शुभता बऱ्यापैकी वाढलेली असेल. आता आपण राशीनुसार जेव्हा त्यांच्या फळांचा विचार करु तेव्हा आपल्याला त्यांच्या या दोन्ही गोचरचा विचार करावा लागेल. तरच आपण योग्य फलकथनार्पंत पोहचू शकू. तेव्हाच तुमच्या राशीसाठी त्यांची काय भूमिका असेल? हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. त्यानुसार तुम्ही आपल्या कार्याचं, उपायाचं योग्य ते नियोजन करु शकाल आणि शनि महाराजांच्या या प्रवासाची सुखद फळं मिळवू शकाल. अजून एक बाब म्हणजे जे जेष्ठ व्यक्ती आहेत म्हणजे वयवर्ष ४५ च्या किंवा ५० च्या पुढील जे आहेत त्यांनी ३० वर्षापूर्वीच्या काळातील त्यांचं आयुष्य आठवून घ्यावं. त्याच पद्धतीने सर्वसामान्य परिणाम तुमच्यावर पुन्हा घडून येतील. अर्थातच थोडा फरक हा असतो की तेव्हाची महादशा वेगळी असेल आणि आताची महादशा वेगळी असेल. कोणताही ग्रह महादशानाच्या अनुषंगाने फळं देत असल्यामुळे त्यानुसार थोडा फरक निश्चित घडून येईल. मात्र त्याची मूळ प्रवृत्ती तिच राहते. म्हणजे तुम्ही मूळ अभ्यास केला की शनि काय फळं देणार आहे? तर तुम्ही ३० वर्षांपूर्वीचं आयुष्य आठवून घ्या. तुम्हाला तीच फळं लक्षात येतील. एकंदरीत शनि महाराजांची साडेसाती, त्यांची ढैय्या, त्याचं राशी परिवर्तन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो.

शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते. #drjyotijoshi

मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा हा अत्यंत आनंददायी असतो. या काळात अनेक प्रकारचे लाभ होतात. प्रगती देखील होत राहते. त्यामुळे साहजिकच जातकाचा आत्मविश्वास शिखरावर पोहोचलेला असतो की आपल्यावर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव झाला नाही. त्या आनंदात ते असतात. त्यानंतर दुसरा टप्पा सुरु होतो. तेव्हा त्यांना साडेसातीचे चटके बसायला लागतात. व्यक्तिमत्त्वात नकारात्मकता येते. कुटुंबापासून दुर जातो. तो एकटा पडतो. त्याचे निर्णय चुकतात. किंबहूना निर्णय क्षमतेत कमतरता येते. तिसऱ्या टप्प्यात कौटुंबिक दृष्टीने मनुष्य अजून एकटा पडतो. अशाप्रकारे वृश्चिक जातकांसाठी साडेसातीतील पहिला टप्प्याचा प्रगतीदायक काळ सोडला तर उर्वरीत काळ हा अत्यंत संघर्षमय असतो. आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदाऱ्या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.

आता आपण तुमच्या वृश्चिक राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया. #astrogurudrjyotijoshi

वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराजांकडे तुमच्या पत्रिकेतील तृतीय आणि चतुर्थ या दोन स्थानांचं स्वामीत्व आहे. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरुन वास्तु, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व गोष्टी बघितल्या जातात. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते शश योगाचे निर्माण करतील. जो पंचमहापुरुष योगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यामुळे या गोचरची अत्यंत शुभ फळं वृश्चिक जातकांना प्राप्त होणार आहेत. मात्र पत्रिकेतील चौथा शनि हा एक ढैय्या प्रकार देखील असतो. त्यामुळे अनेक ठिकाणी अडथळे, अडचणी देखील वाढणार आहेत. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आणि शनि यांच्यात नैसर्गिक शत्रुत्वाचं नातं आहे. ज्यामुळे या शुभ योगाच्या परिणामांमध्ये देखील एक उणिव तयार होईल. म्हणजे चतुर्थ स्थानात आगमन करणारे शनि महाराज हे एकाच वेळी तुम्हाला अडथळे, अडचणी आणि राजयोगाचे लाभ अशी परस्पर विरुद्ध फळे प्रदान करणार आहेत. चतुर्थ स्थानाच्या कारकत्वानुसार तुमच्यासाठी वास्तुयोग, वाहनयोग निर्माण होतील. जुन्या वास्तुतून आर्थिक लाभ प्राप्त होईल. नोकरीत पदोन्नतीच्या संधी निर्माण होतील. व्यवसायात वृद्धीच्या संधी निर्माण होतील. व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होईल. मात्र तरी सुद्धा अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या अडचणी, अडथळे निर्माण करणं हे त्यांचं कार्य असेल.

दुसरी बाब म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे शश योग हा पंचमहापुरुष योगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. तो निर्माण होत असतांना देखील शनि महाराजांची जी विलंबाची मूळ प्रवृत्ती आहे ती ते सोडणार नाही. याच्या अगदी विपरीत स्थिती तुमचा राशी स्वामी मंगळाची असते. त्याला प्रत्येक गोष्ट लवकर हवी असते. या परस्पर विरोधाभासामुळे वृश्चिक जातकांना या काळात काही बाबतीत निश्चितच संघर्ष करावा लागेल. चतुर्थ स्थानात येणारे शनि महाराज त्या स्थानाच्या कारकत्वानुसार वास्तु, वाहन, जमीन, मातृसौख्य तुम्हाला प्रदान करतील. २९ एप्रिल ते १२ जुलै पर्यंत ते तुमच्या चतुर्थ स्थानात असतील. त्यानंतर ते वक्री होऊन पुन्हा एकदा मकर राशी म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात जातील. #astrogurudrjyotijoshi

वृश्चिक राशीसाठी शनि महाराजांचं मकर राशीतील गोचर हे लाभकारक ठरलं आहे. कारण तृतीय हे उपयच स्थान शनि महाराजांना विशेेष मानवतं. त्या तुलनेत चतुर्थ स्थान फारसं मानवत नाही. जानेवारी २०२३ पर्यंत ते तुमच्या तृतीय स्थानातच असतील. म्हणजे हा जो तुम्हाला ढैय्याचा त्रास होणार आहे तो अत्यंत तात्पुरता असेल. किंवा याला तुम्ही नंतरच्या काळाचा एक ट्रेलर देखील म्हणू शकता. २०२३ नंतर तुम्हाला कोणत्या दिशेने फळं मिळतील? ती दिशा या काळात तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येऊ शकते. या काळात शनि महाराजाचं गोचर हे धनिष्ठा नक्षत्रातून सुरु असेल. ते तुमच्या राशी स्वामीचं म्हणजे मंगळाचं नक्षत्र असून धन देणारं नक्षत्र म्हणून त्याची विशेष ओळख आहे. तसेच चतुर्थेश चतुर्थात, आपल्या मूळत्रिकोण राशीत, शश योगाची निर्मिती या सर्व कारणांमुळे तुम्हाला धनाची प्राप्ती निश्चितच होणार आहे.

      जसं आपल्याला माहितीच आहे की शनि महाराजांना तृतीय, सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. ज्या अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात. म्हणजे दोन स्थानं आणि तीन दृष्ट्या अशाप्रकारे एकाच वेळी एकूण पाच स्थानांवर शनि महाराजांचा प्रभाव पडतो. त्यानुसार चतुर्थ स्थानातील शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. पत्रिकेतील षष्ठ स्थानावरुन आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रु, नोकरी या गोष्टी बघितल्या जातात. या स्थानावर पडणारी शनि महाराजांची दृष्टी तुम्हाला नोकरीत स्थैर्य मिळवून देईल. येथून पुढे तुमची नोकरी दीर्घकाल चालणार आहे. प्रगतीच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील. पदोन्नतीच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. ज्यांची कोर्टात एखादी केस सुरु असेल आणि तुमची बाजु योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजुने लागण्याची येथे बऱ्यापैकी शक्यता निर्माण होत आहे. विरोधक स्वत:हून माघार घेतील. हितशत्रु काहीही करु शकणार नाही. अशाप्रकारे शनि महाराजांच्या तृतीय दृष्टीची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होणार आहेत.

यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थानाला कर्म स्थान म्हटलं जातं. व्यवसायातील प्रगती देखील याच स्थानावरुन बघितली जाते. कालपुरुषाची कुंडली जेव्हा आपण पाहतो तेव्हा दशम स्थानाचं स्वामीत्व देखील शनि महाराजांकडे येतं. या दृष्टीने विचार केला असता त्यांचं हे मूळ त्रिकोण राशीतील गोचर तुमच्या व्यवसायात वृद्धी घडवून आणेल. व्यवसाय वृद्धीच्या अनेक संधी येथे निर्माण होतील. शनि महाराज हे मंद ग्रह आहेत. ते तुमच्या व्यवसायात वृद्धी नक्कीच करतील. मात्र त्यांची गती ही मंद असेल. जे आक्रमक असलेल्या तुमच्या राशी स्वामीला मानवणार नाही. ही स्थिती लक्षात घेता या काळात तुम्हाला शांततेने, धैर्याने वाटचाल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तेच तुमच्यासाठी योग्य असेल.

यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल. येथे खरा एक अंतर्गत विरोध निर्माण होईल. कारण शनि महाराज राजयोग निर्माण करुन त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर टाकणार आहेत. राशी स्वामीला मूळ स्वभावानुसार प्रत्येक गोेष्ट पकटन, तडकाफडकी हवी असते. आक्रमकपणा, नेतृत्व, धाडस हे सर्व गुण तुमच्या राशी स्वामीमध्ये आहेत. या ऊलट शनि महाराज शांतपणे काम कर हा सल्ला देतात. ते स्वत: देखील हळू हळूच कामं करतात. त्यांचा हा शांतपणा, धिमेपणा, सौम्यपणा तुमच्या राशी स्वामीला मानवणार नाही आणि त्यांची दृष्टी नेमकी तुमच्या राशीवर पडणार आहे. याचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्त्वावर निश्चितपणे होईल. अनेक वेळा तुम्ही तडकाफडकी कामं करायला उठाल आणि थोड्या वेळाने पुन्हा शांत बसाल. आजचं काम उद्यावर ढकलाल. पुन्हा विचार कराल की नाही, आज आपण काम करायला हवं. थोडक्यात वैचारिक अस्थैर्य तुमच्यात निर्माण होईल. विचार वारंवार बदलत राहतील.

एकंदरीत शनि आणि मंगळ यांच्यात जो संघर्ष चालेल, तो तुमच्या व्यक्तिमत्त्वात उतरेल. त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो. ही सर्व स्थिती लक्षात घेता विचारपूर्वक, ठामपूर्वक, शांतपणे वाटचाल करणे, तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असेल. या काळात होणारी प्रगती ही तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्रदान करेल. कारण शनि महाराज हे मंद ग्रह आहेत. ते लाभ विलंबाने, हळू हळू प्रदान करतात. मात्र जेव्हा देतात तेव्हा भरभरुन देतात. त्याचे प्रचंड शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. शनि महाराज तुमच्या पत्रिकेसाठी कारक नसतांना देखील त्यांचं हे गोचर तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरेल.

या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात वृश्चिक जातकांनी महादेवाला चंदन, केशर, कापुर मिश्रीत जलाने अभिषेक करावा. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील.

अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन वृश्चिक राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद! शुभम भवतु! 

अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *