Skip to content
Home » शनि परिवर्तन – तुळ रास

शनि परिवर्तन – तुळ रास

शनि परिवर्तन – तुळ रास

यशासह मोठी प्रगती

शनि करतील इच्छापूर्ती

 

नमस्कार!

      मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बऱ्याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या तुळ राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

      ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. #drjyotijoshi


      शनि महाराजांच्या या सर्व बाबी समजून घेतांना आपल्याला एक अजून बाब समजून घ्यावी लागेल. ती म्हणजे मकर आणि आणि कुंभ या दोन्ही शनि महाराजांच्याच राशी आहेत. म्हणजे शनि महाराजांचं संपूर्ण गोचर हे स्वराशीतून आहे. २०२२ मध्ये ते आता धनिष्ठा नक्षत्रातूनच प्रवास करणार आहेत. कुंभ राशीत धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण येतात आणि मकर राशीत दोन चरण येतात. म्हणजे राशीत परिवर्तन करुन ते जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा धनिष्ठा नक्षत्रात जातील. तसेच वक्री होऊन जेव्हा ते पुन्हा मकर राशीत प्रवेश करतील तेव्हाही ते धनिष्ठा नक्षत्रातच असतील. थोडक्यात त्याचं नक्षत्र एकच असेल. मात्र प्रभावाची दिशा प्रचंड बदलेली राहिल. ती दिशा समजून घेण्यासाठी आपल्याला मकर आणि कुंभ या दोन राशींमधील मुलभूत फरक समजून घ्यावा लागेल. या दोन्ही राशी शनि महाराजांच्याच आहेत. मात्र आपण एक आवडती आणि एक नावडती रास म्हणू शकतो. त्यानुसार विचार केला असता कुंभ ही त्यांची आवडती रास आहे आणि मकर ही त्यांची नावडती रास आपण म्हणू शकतो. कारण मकर ही श्रमीक स्थिर रास आहे. निसर्ग कुंडलीत ती कर्म स्थानात येते. परिश्रम करणं, सातत्याने कार्यरत राहणं, सतत कर्म करीत राहणं, स्थिर राहणं हे तिचं मुलभूत तत्त्व आहे.

      याऊलट कुंभ राशीच्या विचार केला असता ती वायुतत्त्वाची, बुद्धिमान, लाभ देणारी रास म्हणून ओळखली जाते. कारण निसर्ग कुंडलीत दशम स्थान हे कर्म स्थान आणि एकादश स्थान हे लाभ स्थान असतं. दहावी मकर रास ही कर्म रास आणि अकरावी कुंभ रास ही इच्छापूर्ती करुन देणारी, लाभ करुन देणारी रास असते. म्हणजे मूळत: या दोन राशींमध्ये खूप मोठा फरक असून त्यातील कुंभ रास ही शनि महाराजांची आवडती रास आहे. नैसर्गिकरीत्या लाभ स्थान, एकादश स्थान, उपचय स्थान या सर्व दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पाप ग्रहांना उपचय स्थान आवडतं. म्हणून देखील शनि महाराजांना हे उपयच स्थान विशेष मानवतं. साहजिकच त्याची अत्यंत शुभ फळं सर्व राशींना प्राप्त होतील.

      शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते.

      मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार तुळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुळ जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा हा प्रगतीदायक असतो. या काळात व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतात. सोबतीला अनेक प्रकारचे खर्च होतात. मात्र तेही प्रगतीसाठीच असतात. दुसऱ्या टप्प्यात व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड विकास होतो. योग्य निर्णय घेण्याची आणि त्यावर ठाम राहण्याची, त्याची अंमलबजावणी करण्याची प्रवृत्ती वाढते. मात्र शेवटचा तिसरा टप्पा हा तुळ जातकांसाठी संघर्षदायी ठरतो. या काळात कौटुंबिक विवाद निर्माण होतात. आर्थिक नुकसान देखील होतं. त्यामुळे या शेवटच्या टप्प्यात तुळ जातकांना बऱ्यापैकी त्रास होतो. आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदाऱ्या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.

      आता आपण तुमच्या तुळ राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया.

      तुळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण तुळ राशीसाठी शनि महाराज हे राजयोगकारक ग्रह आहेत. तुळ राशीचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे. शुक्र आणि शनि हे मित्र ग्रह मानले जातात. तसेच तुळ पत्रिकेतील चतुर्थ आणि पंचम या दोन महत्त्वपूर्ण स्थानांचं स्वामीत्व शनि महाराजांकडे आहे. ज्योतिष नियमांनुसार पत्रिकेतील चतुर्थ म्हणजे केंद्र स्थान आणि पंचम म्हणजे त्रिकोण स्थान होय. म्हणजे केंद्र आणि त्रिकोण या दोन्ही स्थानांचं स्वामी शनि महाराजांकडे असल्यामुळे येथे हा एक लक्ष्मीनारायण योग संपन्न होतो. जो अत्यंत महत्त्वपूर्ण व लाभदायक मानला जातो. त्यामुळेच तुळ रास किंवा तुळ लग्नासाठी शनि महाराजांचं गोचर, त्यांची स्थिती ही कायमच महत्त्वपूर्ण असते. खरं तर तुळ पत्रिका असली आणि त्यात म्हणजे मूळ पत्रिकेत, नवमांशात आणि राशी पत्रिकेत शनि महाराजांची स्थिती योग्य असली तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम त्या जातकाला शनि महाराजांच्या महादशेत, आंतरदशेत प्राप्त होतात. अशा जातकाची प्रचंड प्रगती होत असते. गोचरने जेव्हा जेव्हा शनि महाराज त्यांना आवडणाऱ्या स्थानांमध्ये आणि आवडणाऱ्या राशीतून प्रवास करतात तेव्हा तेव्हा ते तुळ राशीला भरभक्कम शुभ फळं प्रदान करतात.

      त्यानुसार गेली काही वर्ष शनि महाराज मकर राशी म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानातून प्रवास करीत होते. पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वास्तु, वाहन, जमीन, सुखशांती याचं स्थान म्हणून ओळखलं जातं. ज्योतिष नियमांनुसार चतुर्थ स्थानात जेव्हा शनि महाराज असतात तेव्हा आपण त्याला ढैय्या असं म्हणतो. त्यामुळे चतुर्थ स्थानाच्या कारकत्वात अनेक अडथळे, अडचणी येतात. मात्र त्याचवेळी शनि महाराजांनी चतुर्थ स्थानात शश योग निर्माण केला होता. जो पंचमहापुरुष योगांपैकी एक अत्यंत शुभ राजयोग मानला जातो. म्हणजे एकीकडे चौथा शनि म्हणून ढैय्या आणि दुसरीकडे शश योग अशी परस्पर विरुद्ध फळांची दिशा होती. शनि महाराजांची या दोन्ही दिशा तुमच्या आयुष्यात पुरेपुर निभावल्या. म्हणजे तुळ जातक जेव्हा आता मागे वळून पाहतील तेव्हा त्यांना अनेक संघर्ष, अडथळे दिसून येतील. तरी सुद्धा झालेली प्रगती देखील दिसून येईल. कारण शनि महाराज तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान होते.

      आता ते राशी परिवर्तन करुन ते तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील. ज्यामुळे पंचमेश पंचमात ही स्थिती निर्माण होईल. जी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे तेथून त्यांच्या शुभ फळांची दिशा जास्त वाढेल. कारण तेव्हा चौथ्या शनिची ढैय्या संपलेली असल्यामुळे आता केवळ त्यांना शुभ फळं द्यायची आहेत. आता ते त्रिकोणात येतील. त्या स्थानाचे ते स्वामी देखील आहेत. किंबहूना मकर रास म्हणजे शनि महाराजांची नावडती रास आणि कुंभ रास म्हणजे आवडती रास, असेही आपण म्हणू शकतो. म्हणजे नावडत्या राशीतून ते आवडत्या राशीत प्रवेश करणार आहेत. केंद्र स्थानातून त्रिकोण स्थानात प्रवेश करतील. त्यांची ढैय्या देखील संपलेली असेल. त्यामुळे ते शुभ फळं द्यायला बाध्य होतील. म्हणजे एकंदरीत आपण तुळ राशीच्या दृष्टीने विचार करतो तर शनि महाराजांचं हे गोचर अत्यंत प्रगतीदायक, यशदायक, लाभदायक, अनेक अर्थाने योगकारक आपण म्हणू शकतो. #drjyotijoshi

      २९ एप्रिल ते १२ जुलै या काळात शनि महाराज तुमच्या पंचम स्थानात विराजमान असतील. त्यानंतर ते वक्री होऊन पुन्हा मागील राशीत म्हणजे मकर राशीत प्रवेश करतील. म्हणजे ते पुन्हा तुमच्या चतुर्थ स्थानात जाऊन शश योग आणि ढैय्या या दोन्ही परस्पर विरुद्ध योगांचे एकाच वेळी निर्माण करतील. सर्वप्रथम आपण त्याचं पंचम स्थानातील आगमन आणि त्याचे परिणाम समजून घेणार आहोत. कारण ते तुमच्या पंचम स्थानात आता थोड्या कालावधीसाठी जरी येत असले तरी हा एक ट्रेलर असणार आहे की भविष्यात ते तुम्हाला किती शुभ फळं देतील, किती राजयोग देतील. २९ एप्रिल ते १२ जुलै या काळात ते तुमच्या पंचम स्थानात येऊन भरभरुन शुभ फळं तुम्हाला प्रदान करणार आहेत. ही फळं त्यांच्या पुढच्या गोचरचा ट्रेलर असणार आहे. कारण जानेवारी २०२३ मध्ये ते मार्गी होऊन तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील. तेथून पुन्हा त्यांची शुभ फळं तुम्हाला भरभरुन प्राप्त होतील. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झाल्यास मागील तीन वर्षात परस्पर विरुद्ध योग असतांना, एकीकडे ढैय्या सुरु असतांना देखील देखील त्यांची काही शुभ फळं तुम्हाला मिळाली. आता ते संपूर्ण शुभ फळं देण्यासाठीच तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहेत. पत्रिकेतील पंचम स्थानावरुन शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघितल्या जातात. या तीनही बाबतीत शनि महाराजांची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. कारण येथे शनि महाराज स्वराशीचे, मूळ त्रिकोण राशीचे आहेत. तसेच तुमच्या राशीला ते केंद्र व त्रिकोणाचे स्वामी होऊन राजयोगकारक आहेत.

      पंचम स्थानातील शनि महाराज तुम्हाला शिक्षणात प्रचंड मोठे यश देतील. टेक्निकल, मॅकेनिकल, फार्मसी अशा कोणत्याही सेक्टरमध्ये तुम्ही असाल, त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. विशेषत: तुम्ही जर न्यायालयीन म्हणजे कायदेविषयक शिक्षण घेत असाल तर या काळात तुमच्या यशाची टक्केवारी ही कितीतरी पटीने जास्त राहिल. इष्टदेव तुम्हाला दोन्ही हातांनी भरपूर आशीर्वाद देतील. थोडक्यात तुम्ही केवळ अभ्यासात परिश्रम करा. त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. त्याही पलिकडे जाऊन विवाह इच्छुक मुला-मुलींना या काळात योग्य जोडीदार मिळेल. एकंदरीत शनि महाराजांचं हे गोचर तुमच्या पत्रिकेतील पंचम स्थान समृद्ध करेल. शिवाय ते त्रिकोण स्थानातील महत्त्वाचं स्थान असल्यामुळे त्याची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. #astroguruma

      यानंतर आपण शनि महाराजांच्या दृष्ट्यांच्या प्रभावांचे विश्लेषण करुया. पंचम स्थानातून त्यांची तृतीय दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार व व्यवसायाचं स्थान मानलं जातं. गेली काही दिवस तुमच्या वैवाहिक जीवनात अशांतता होती. विसंवादाचं प्रमाण वाढलेलं होतं. त्याच्यात आता मोठा बदल होऊन सौख्य निर्माण होईल. हे असतांनाच १२ एप्रिल रोजी तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या राहुकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण सप्तमातील राहु हा कुठेतरी जोडीदारासोबत विसंवाद निर्माण करण्याचं कार्य करतो. मात्र शनि महाराजांची त्याच्यावर दृष्टी असल्यामुळे त्याचा फारसा त्रास तुम्हाला होणार नाही. शनि आणि राहु हे मित्र ग्रह आहेत. तसेच शनि महाराज पंचम स्थानाचे स्वामी आहेत. त्या स्थानाच्या कारकरत्वात, सौख्यात वृद्धी करणं हे त्यांचं कार्य आहे. त्यामुळे ते राहुला तुमच्यात फारसा दुरावा निर्माण करु देणार नाहीत. किंबहूना राहुला देखील शुभ फळं देण्यासाठी ते बाध्य करतील. #astrogurudrjyotijoshi

      यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या एकादश स्थानावर पडेल. पत्रिकेतील एकादश स्थानाला लाभ व इच्छापूर्तीचं स्थान म्हटलं जातं. त्यामुळे गेली अनेक दिवस ज्या लहान-मोठ्या इच्छा तुमच्या मनात आहेत, त्या सर्व इच्छांची पूर्ती होण्याचा हा कालखंड असेल. अनेक मार्गांनी तुम्हाला लाभ प्राप्त होईल. विशेेषत: बांधकाम, मशिनरी सेक्टरमध्ये तुम्ही कार्यरत असाल किंवा मशिनरी भाड्याने देण्याचा तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही वकील असाल, न्यायाधिश असाल तर या कालखंडात तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. #drjyotijoshi

      यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या कुटुंब स्थानावर पडेल. तिथे मंगळाची वृश्चिक रास येते. महत्त्वाची बाब म्हणजे शनि महाराजांचं हे गोचर मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून होणार आहे. धनिष्ठा नक्षत्र हे धन देणारं नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. त्यात तुमच्या धन स्थानावर शनि महाराजांची दृष्टी पडणार आहे. मात्र मंगळ आणि शनि यांच्यात शत्रुत्व असल्यामुळे कुठेतरी या गोष्टीचा तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. कोणताही ग्रह एकाच वेळी पूर्णपणे शुभ किंवा पूर्णपणे अशुभ फळं देत नाही. त्याला अनुसरुन कुठेतरी कुटुंबात विसंवाद निर्माण होणं, धनहानी होणं असे प्रकार देखील तुमच्या सोबत होऊ शकतात. अर्थात यासाठी तुमच्या मूळ पत्रिकेतील शनि महाराजांची स्थिती बघणं देखील आवश्यक आहे. एकंदरीत शनि महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक, यशदायक राहिल. या काळात त्याचा तुम्ही ट्रेलर बघुन घ्या. म्हणजे जानेवारी २०२३ नंतर तुमच्या आयुष्यातील प्रगतीच्या दिशा तुम्हाला आजच नोंदवून ठेवता येतील.

      या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात तुळ जातकांनी महादेवाला दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक करावा. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. #astrogurudrjyotijoshi

      अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन तुळ राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु! 

अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *