Skip to content
Home » शनि परिवर्तन – मिथुन रास

शनि परिवर्तन – मिथुन रास

 

भाग्यसह लाभाची लयलूट

संघर्षातून मिळेल थोडी सूट

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बर्‍याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या मिथुन राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. #drjyotijoshi

शनि महाराजांच्या या सर्व बाबी समजून घेतांना आपल्याला एक अजून बाब समजून घ्यावी लागेल. ती म्हणजे मकर आणि आणि कुंभ या दोन्ही शनि महाराजांच्याच राशी आहेत. म्हणजे शनि महाराजांचं संपूर्ण गोचर हे स्वराशीतून आहे. २०२२ मध्ये ते आता धनिष्ठा नक्षत्रातूनच प्रवास करणार आहेत. कुंभ राशीत धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण येतात आणि मकर राशीत दोन चरण येतात. म्हणजे राशीत परिवर्तन करुन ते जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा धनिष्ठा नक्षत्रात जातील. तसेच वक्री होऊन जेव्हा ते पुन्हा मकर राशीत प्रवेश करतील तेव्हाही ते धनिष्ठा नक्षत्रातच असतील. थोडक्यात त्याचं नक्षत्र एकच असेल. मात्र प्रभावाची दिशा प्रचंड बदलेली राहिल. ती दिशा समजून घेण्यासाठी आपल्याला मकर आणि कुंभ या दोन राशींमधील मुलभूत फरक समजून घ्यावा लागेल. या दोन्ही राशी शनि महाराजांच्याच आहेत. मात्र आपण एक आवडती आणि एक नावडती रास म्हणू शकतो. त्यानुसार विचार केला असता कुंभ ही त्यांची आवडती रास आहे आणि मकर ही त्यांची नावडती रास आपण म्हणू शकतो. कारण मकर ही श्रमीक स्थिर रास आहे. निसर्ग कुंडलीत ती कर्म स्थानात येते. परिश्रम करणं, सातत्याने कार्यरत राहणं, सतत कर्म करीत राहणं, स्थिर राहणं हे तिचं मुलभूत तत्त्व आहे.

याऊलट कुंभ राशीच्या विचार केला असता ती वायुतत्त्वाची, बुद्धिमान, लाभ देणारी रास म्हणून ओळखली जाते. कारण निसर्ग कुंडलीत दशम स्थान हे कर्म स्थान आणि एकादश स्थान हे लाभ स्थान असतं. दहावी मकर रास ही कर्म रास आणि अकरावी कुंभ रास ही इच्छापूर्ती करुन देणारी, लाभ करुन देणारी रास असते. म्हणजे मूळत: या दोन राशींमध्ये खूप मोठा फरक असून त्यातील कुंभ रास ही शनि महाराजांची आवडती रास आहे. नैसर्गिकरीत्या लाभ स्थान, एकादश स्थान, उपचय स्थान या सर्व दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पाप ग्रहांना उपचय स्थान आवडतं. म्हणून देखील शनि महाराजांना हे उपयच स्थान विशेष मानवतं. साहजिकच त्याची अत्यंत शुभ फळं सर्व राशींना प्राप्त होतील.

शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते.

मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा बर्‍यापैकी प्रगतीचा ठरतो. दुसरा टप्पा व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारा असतो. जी अत्यंत महत्त्वाची बाब म्हटली पाहिजे. मात्र तिसरा टप्पा हा कुठेतरी नुकसानीचा, कुटुंबात विघटन करणारा, कुटंबाचं ऐक्य भंग करणारा, कुटुंबापासून लांब नेणारा ठरतो. आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदार्‍या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.

आता आपण तुमच्या मिथुन राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया.

      मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पत्रिकेतील अष्टम आणि भाग्य या दोन स्थानांचं स्वामीत्व शनि महाराजांकडे आहे. आता ते राशी परिवर्तन करुन कुंभ रास म्हणजे तुमच्या भाग्य स्थानात प्रवेश करणार आहे. ज्यामुळे भाग्येश भाग्य स्थानात ही स्थिती निर्माण होईल. जी अत्यंत शुभ मानली जाते. मनुष्य जीवनाचा सर्व लेखाजोखा शनि महाराजांकडे असतो. एखाद्या व्यक्ती आयुष्यात कसे कर्म करतो? त्याची दिशा कोणती आहे आणि त्यानुसार आपण त्याला काय द्यायला हवं? हे ठरविणारे ग्रह म्हणजे शनि महाराज होय. कारण काळपुरुषाची कुंडली जेव्हा आपण पाहतो, तेव्हा शनि महाराज कर्म स्थानाचे अधिपती आहेत. मिथुन पत्रिकेच्या दृष्टीने विचार केल्यास तुमच्या भाग्य स्थानाचे ते अधिपती आहेत. कर्म आणि धर्म यांचा एक सुसंबंध येथे तयार होतांना दिसून येतो. कारण काळपुरुषाच्या कर्म स्थानाचा अधिपती तुमच्या धर्म स्थानात प्रवेश करणार आहे. मागील काही काळात शनि महाराजांची ढैय्या तुमच्यावर सुरु होती. त्या ढैय्येने अनेक प्रकारच्या जबाबदार्‍यांची जाणिव तुम्हाला करुन दिली. रोजच्या आयुष्यात अनेक अडथळे, अडचणीं, संघर्षाचा सामना करत तुम्ही मार्गक्रमण करीत राहिलात आणि सातत्याने पुढे जात राहिलात. #drjyotijoshi

या अडथळ्यांचा, अडचणींचा, संघर्षाचा सामना तुम्ही कशा प्रकारे केला? यावर शनि महाराजांची अगदी बारकाईने दृष्टी होती. आता ते तुमच्या भाग्य स्थानात प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे साहजिकच तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे. मागील काळात तुम्ही जो काही संघर्ष केला असेल त्याची अत्यंत शुभ फळं आता तुम्हाला प्राप्त होणार आहेत. एकंदरीत पाहता भाग्येश भाग्यात ही अत्यंत शुभ बाब मानली जाते, जी तुमच्या बाबतीत २९ एप्रिल २०२२ पासून घडून येणार आहे. तुमच्या भाग्य स्थानात शनि महाराजांची कुंभ रास येते. जी त्यांनी आवडती रास म्हणून ओळखली जाते. त्यामुळे साहजिकच तिथे ते अत्यंत बलवान होणार आहेत. आपल्याला माहितीच असेल की शनि महाराजांना तृतीय, सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. ज्या अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात. त्यानुसार भाग्य स्थानातून शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या लाभ स्थानावर पडेल. सप्तम दृष्टी तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर आणि दशम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडणार आहे. जसं मी आधीही सांगितलं की शनि महाराज तुमच्या पत्रिकेला अष्टम आणि नवम या दोन स्थानांचे स्वामी आहेत. तसेच तीन स्थानांवर त्यांची दृष्टी पडणार आहे. म्हणजे एकूण पाच स्थानांवर त्यांचा प्रभाव असेल. या सर्व पाचही स्थानांची शुभ फळं तुम्हाला यासाठी देखील मिळतील की भाग्येश भाग्य स्थानात बसून दृष्टी टाकणार आहे. म्हणजे प्रत्येक स्थानाच्या कारकत्वात तो कुठेतरी वृद्धी घडवून आणणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही वृद्धी शुभ असेल कारण भाग्येशाची दृष्टी ही कायमच शुभच असते. या सर्व दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मिथुन राशीसाठी संघर्षाचा काळ आता संपलेला आहे, असं आपण म्हणू शकतो किंवा संघर्षाच्या या काळात काही दिवस तुम्हाला दिलासा देणारे मिळतील, असेही आपण म्हणू शकतो.

असं म्हणण्याचं कारण म्हणजे शनि महाराज १२ जुलै २०२२ रोजी वक्री अवस्थेत पुन्हा मकर राशीत म्हणजे तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा त्यांची ढैय्या सुरु होईल. ते जेव्हा अष्टम स्थानात प्रवेश करतील तेव्हा पुन्हा एकदा तुमच्यासाठी अडथळे, अडचणी, संघर्षाचा कालखंड सुरु होईल. जो जानेवारी २०२३ पर्यंत सुरु राहिल. मात्र त्यापूर्वी आज जो काळ तुमच्या समोर येत आहे म्हणजे २९ एप्रिल पासून तर १२ जुलै पर्यंतचा काळ तुमच्यासाठी विशेष भाग्याचा आहे, असं आपण म्हणू शकतो. या काळाचा तुम्ही पुरेपुर लाभ घ्यायला हवा. #astrogurudrjyotijoshi

शनि महाराज तुमच्या भाग्य स्थानात बसून तुमचं भाग्य निश्चितच समृद्ध करतील. भाग्य स्थानातील शनि महाराज हे खरं तर गतजन्मातील कर्माचे विश्लेषक देखील असतात. तेथून ते गत जन्मातील कर्माचे संकेत देतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा प्रभाव तुमच्या या जन्मातील आयुष्यावर पडत असतो. त्यामुळे भाग्य स्थानात आलेले शनि महाराज हे तुम्हाला शुभत्व देणार आहेत. त्यांची एक कार्यपद्धती आहे की सर्वप्रथम ते मागील काळात मकर राशीत असतांना त्यांची ढैय्या तुम्हाला सुरु होती तेव्हा त्यांनी तुम्हाला संघर्षाचा सामना करायला लावला. आता ते तुमचं भाग्य समृद्ध करण्यासाठी तयार झालेले आहेत. भाग्य स्थानातील शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या लाभ स्थानावर पडेल. तिथे मंगळाची मेष रास येते. महत्त्वाची बाब म्हणजे शनि महाराजांचं गोचर देखील मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रातून सुरु आहे. एकंदरीतच लाभामध्ये अनपेक्षितरीत्या मोठी वृद्धी घडून येणं, अनेक प्रकारचे लाभ होणं, किंबहूना त्यापेक्षाही इच्छापूर्तीचे विविध योग निर्माण होणं, अशी अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. मागील काळात ज्या एखाद्या छोट्याशा इच्छेसाठी तुम्ही अत्यंत परिश्रम करीत होता, एखाद्या गोष्टीचे स्वप्न पाहत होता, विचार करीत होता ती सर्व पूर्ण होण्याचा हा कालावधी असेल. कारण इच्छापूर्तीच्या स्थानावर असलेली शनि महाराजांची दृष्टी ही इच्छापूर्तीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असते.

यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर पडेल. शनि महाराज हे कर्माचे कारक आहेत आणि परिश्रमाच्या स्थानावर त्यांची दृष्टी पडणार आहे. म्हणजे ते तुम्हाला कुठेतरी सूचित करीत आहेत की तुम्ही योग्य ते परिश्रम करा. मी भाग्य समृद्ध करतो. त्यानुसार तुम्ही जेवढे जास्त परिश्रम कराल तेवढं जास्त तुमचं भाग्य समृद्ध होईल. या काळात अनेक लहान-मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील. भावंडांशी सौख्य वाढेल. प्रवासातून, कर्मातून, परिश्रमातून तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल. किंबहूना शेजार्‍यांशी देखील नातं समृद्ध होईल. एकंदरीत अनेक अर्थाने शनि महाराजांची ही दृष्टी तुमचं व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करणार आहे. तसंही तुमचे राशी स्वामी आणि शनि महाराज यांच्यात मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे शनि महाराज मिथुन राशीसाठी सदैव सकारात्मक ग्रह किंवा शास्त्रामध्ये ज्यासाठी आपण कारक ग्रह हा शब्द वापरतो असे आहेत. असा हा कारक ग्रह जेव्हा भाग्य स्थानात येणार आहे आणि तेथून त्याची परिश्रमाच्या स्थानावर दृष्टी पडणार आहे, त्यामुळे परिश्रमातूनही तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे. #bestastrologerinmaharashtra

यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. पत्रिकेतील षष्ठ स्थानावरुन आपण आरोग्य, कर्ज, शत्रु, प्रतिस्पर्धी, नोकरी या सर्व गोष्टी बघतो. शनि महाराज हे न्यायाचे कारक ग्रह म्हणून ओळखले जातात. योग्य ते संतुलन राखणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. आपल्या दशम दृष्टीने ते तुम्हाला नोकरीत यश देतील. तुमच्यासाठी पदोन्नतीच्या, प्रगतीच्या संधी निर्माण करतील. अर्थात तुम्ही ज्या पद्धतीने कर्म कराल, परिश्रम कराल त्यानुसार या संधी तुम्हाला प्राप्त होतील. शत्रुंवर, प्रतिस्पर्धींवर तुम्ही सहजच मात कराल. येथे पुन्हा मंगळाची वृश्चिक रास येते. आधी सांगितल्याप्रमाणे मंगळाच्याच नक्षत्रातून शनि महाराजांचं गोचर सुरु आहे. ज्या जातकांचे कोर्टात एखाद्या केसवर कामकाज सुरु असेल त्यांना या काळात न्याय मिळण्याची शक्यता बर्‍यापैकी जास्त आहे. कारण शनि महाराजांसारखा योग्य न्यायाधिश कोणीही नाही. त्यामुळे योग्य न्याय प्राप्त होण्याच्या दृष्टीने हा कालावधी अत्यंत उत्तम आहे.

एकंदरीत २९ एप्रिल ते १२ जुलै या काळात शनि महाराज तुमच्यासाठी अत्यंत चांगली सुसंधी निर्माण करणार आहेत. मागील काही काळात तुम्ही जो संघर्ष केला आहे, त्यातून थोड्या कालावधीसाठी का होईना तुमची मुक्ती होणार आहे. त्या संघर्षाची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होणार आहेत. मात्र १२ जुलै रोजी ते वक्री होऊन पुन्हा मकर राशीत प्रवेश करतील. एखादा ग्रह जेव्हा वक्री होऊन पुन्हा मागील राशीत जातो तेव्हा त्याला अपूर्ण राहिलेल्या कामांची कुठेतरी आठवण आलेली असते. ब्रम्हदेवाकडून त्याला आठवण करुन दिली जाते की बाबारे तुम्ही ही कामं अपूर्ण राहिली आहेत. तरी तू पुढील राशीत कसा आलास? मग तो ग्रह पुन्हा एकदा मागील राशीत जातो आणि राहिलेली कार्य पूर्ण करतो. त्यानंतर मग मार्गी होतो. असं या स्थितीचं विश्लेषण आपण करु शकतो. या पद्धतीने शनि महाराज जानेवारी २०२३ मध्ये मार्गी होऊन पुन्हा एकदा तुमच्या भाग्य स्थानात प्रवेश करतील. थोडक्यात मिथुन जातकांसाठी शनि महाराजांचं हे गोचर दिलासा देणारं असेल. त्याचा पुरेपुर उपयोग तुम्ही करायला हवा. या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात मिथुन जातकांनी महादेवाला दररोज काळे उडिद वाहावेत. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. #astrogurudrjyotijoshi

अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन मिथुन राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणार्‍या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!  

अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *