Skip to content
Home » शनि परिवर्तन – कर्क रास

शनि परिवर्तन – कर्क रास

 

अडथळे, अडचणी, संघर्ष

परिश्रमानेच होईल उत्कर्ष

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बऱ्याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या कर्क राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. #bestastrologerinmaharashtra

एक महत्त्वाचा विषय म्हणजे शनि महाराजांना राशीचक्र फिरण्यासाठी २९ ते ३० वर्ष लागतात. म्हणजे तब्बल ३० वर्षांनी शनि महाराज कुंभ या आपल्या आवडीच्या राशीत प्रवेश करणार आहेत. मात्र लगेचच काही दिवसांनी पुन्हा एकदा वक्री होऊन मकर राशीत परत जातील. आपल्या आवडत्या घरातून बाहेर निघायला फारसं कुणाला आवडत नाही. शनि महाराजांनाही ते आवडणार नाही. तरीही आपल्या अपूर्ण राहिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ते मागे येतील. १२ जुलै २०२२ रोजी ते मकर राशीत आले की जानेवारी २०२३ पर्यंत ते तिथेच राहतील. त्यानंतर पुन्हा एकदा ते कुंभ राशीत येतील. तेव्हा त्यांची शुभता बऱ्यापैकी वाढलेली असेल. आता आपण राशीनुसार जेव्हा त्यांच्या फळांचा विचार करु तेव्हा आपल्याला त्यांच्या या दोन्ही गोचरचा विचार करावा लागेल. तरच आपण योग्य फलकथनार्पंत पोहचू शकू. तेव्हाच तुमच्या राशीसाठी त्यांची काय भूमिका असेल? हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. त्यानुसार तुम्ही आपल्या कार्याचं, उपायाचं योग्य ते नियोजन करु शकाल आणि शनि महाराजांच्या या प्रवासाची सुखद फळं मिळवू शकाल. अजून एक बाब म्हणजे जे जेष्ठ व्यक्ती आहेत म्हणजे वयवर्ष ४५ च्या किंवा ५० च्या पुढील जे आहेत त्यांनी ३० वर्षापूर्वीच्या काळातील त्यांचं आयुष्य आठवून घ्यावं. त्याच पद्धतीने सर्वसामान्य परिणाम तुमच्यावर पुन्हा घडून येतील. अर्थातच थोडा फरक हा असतो की तेव्हाची महादशा वेगळी असेल आणि आताची महादशा वेगळी असेल. कोणताही ग्रह महादशानाच्या अनुषंगाने फळं देत असल्यामुळे त्यानुसार थोडा फरक निश्चित घडून येईल. मात्र त्याची मूळ प्रवृत्ती तिच राहते. म्हणजे तुम्ही मूळ अभ्यास केला की शनि काय फळं देणार आहे? तर तुम्ही ३० वर्षांपूर्वीचं आयुष्य आठवून घ्या. तुम्हाला तीच फळं लक्षात येतील. एकंदरीत शनि महाराजांची साडेसाती, त्यांची ढैय्या, त्याचं राशी परिवर्तन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो.

शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते. #drjyotijoshi

मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा बऱ्यापैकी प्रगतीचा ठरतो. कर्तृत्व आणि कर्तव्य निभावण्याची मानसिकता शनि महाराज या पहिल्या टप्प्यात जातकांची तयार करतात. दुसरा टप्प्यात मात्र त्यांच्या भूमिकेत बदल होतो. त्यामुळे जातक जसं जसा आपल्या कर्तव्यापासून लांब जातो, तसतसा साडेसातीचा त्रास वाढायला लागतो. तर तिसऱ्या टप्प्यात जातक अक्षरश: तावून सुलाखुन निघतो. अशा जातकाला संबंधित प्रत्येक व्यक्तीकडून त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे कर्क जातकांना साडेसातीचा खरा त्रास हा तिसऱ्या टप्प्यात होतो. आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदाऱ्या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.

आता आपण तुमच्या कर्क राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया.

कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पत्रिकेतील सप्तम आणि अष्टम या दोन स्थानांचं स्वामी शनि महाराजांकडे आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा सर्वात जलद गतीने भ्रमण करणारा ग्रह आहे. याऊलट शनि महाराज हे सर्व ग्रहांमध्ये मंद ग्रह म्हणून ओळखले जातात. हा एक विरोधाभास येथे निर्माण होतो. शनि महाराज हे तुमच्या राशीला कारक ग्रह नाहीत. कारक नसले तरी त्यांचं स्वत:चं एक महत्त्व निश्चितच आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार, व्यवसाय या महत्त्वपूर्ण बाबी दर्शवितं. तर अष्टम हे आयुष्य, अडथळे, अडचणी, संघर्ष, सासर आणि अचानक प्राप्त होणारा धनलाभ दर्शवितं. या सर्व दृष्टीकोनातून या शनि परिवर्तनाचा तुमच्यावर प्रभाव पडणार आहे. याशिवाय शनि महाराजांचं एक नैसर्गिक कारकत्व असतं. त्या कारकत्वानुसार म्हणजे कर्मफल देणं हे त्यांचं मुख्य कारकत्व असल्यामुळे त्याचे प्रभाव देखील तुमच्यावर होणार आहेत. #bestastrologerinmaharashtra

एकंदरीत कर्क राशीच्या दृष्टीने आपण विचार केला तर मागील काही काळात तुम्ही शश या राजयोगाचा भरपूर लाभ घेतला आहे. कारण तेव्हा शनि महाराज तुमच्या सप्तम स्थानात विराजमान होते. आता ते तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे तुम्हाला शनि महाराजांची ढैय्या सुरु होणार आहे. ते स्वत:च्या आवडत्या म्हणजे कुंभ राशीत जरी असले तरी कुंभ रास ही तुमच्या अष्टम स्थानात येते. या स्थानात आलेले शनि महाराज तुमच्यासाठी ढैय्याचा कालावधी निर्माण करतात. त्यामुळे साहजिकच या काळात तुम्हाला विविध प्रकारच्या अडचणी, अडथळे, संघर्षाचा सामना करीत वाटचाल करायची आहे. या वाटचालीवर तुमचं पुढील भाग्य, कर्म आणि लाभ ठरणारं आहे. म्हणून शनि महाराजांचं कुंभ राशीतील गोचर हे तुमच्यासाठी विशेषत्वाने महत्त्वाचं राहिल, असं आपण म्हणू शकतो.

आपल्याला माहितीच आहे की शनि महाराज हे एका राशीत तब्बल अडीच वर्ष विराजमान असतात. त्यामुळे तुमच्या राशीला सुरु होणारी त्यांची ढैय्या देखील अडीच वर्षांची राहिल, असं तुम्हाला वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र सुदैवाने शनि महाराज वर्षातील काही काळासाठी वक्री मागील राशीत प्रवेश करतात. त्यानुसार ते यावर्षी देखील वक्री होतील. शनि महाराजांची ही स्थिती इतर राशींसाठी त्रासदायक जरी असली तरी कर्क राशीसाठी मात्र ती लाभदायक ठरणार आहे. १२ जुलै रोजी शनि महाराज वक्री होऊन पुन्हा मकर राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील. त्यामुळे त्यांच्या ढैय्येतून तुमची तात्पुरती सुटका होईल. जानेवारी २०२३ मध्ये ते पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करतील. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा ढैय्या सुरु होईल. मधला हा काळ म्हणजे एप्रिल ते जुलै पर्यंतचा काळ हा नंतर येणारी शनि महाराजांची ढैय्या तुमच्यासाठी कशी असेल? याचे संकेत तुम्हाला देईल. त्याचे होणारे प्रभाव आपण समजून घेऊया. कारण शनि महाराज तुमच्या पत्रिकेला सप्तमेश आणि अष्टमेश आहेत. #astrogurudrjyotijoshi

      पत्रिकेमध्ये शनि महाराज दोन स्थानांचे स्वामी असतात आणि इतर तीन स्थानांवर त्यांची दृष्टी असते. म्हणजे एकूण पाच स्थानांवर ते एकाचवेळी प्रभाव टाकतात. त्यानुसार अष्टम स्थानातून त्यांची तृतीय दृष्टी तुमच्या दशम स्थानावर, सप्तम दृष्टी तुमच्या कुटुंब स्थानावर आणि दशम दृष्टी पंचम स्थानावर पडेल. या सर्व दृष्ट्यांचे प्रभाव आता आपण समजून घेणार आहोत. मूळत: शनि म्हणजे मंद ग्रह, न्यायाचा कारक, त्यात तो तुमच्या अष्टम स्थानात येणं आणि तुमच्या पत्रिकेला कारक नसणं, अशाप्रकारे एक विपरीत स्थिती शनि महाराज तुमच्यासाठी निर्माण करणार आहेत. त्यातही दिलासादायक बाब म्हणजे तुमचे भाग्येश गुरु महाराज हे भाग्यात आल्यामुळे कुठे तरी एक शुभ स्थिती नक्कीच निर्माण होईल. मात्र अष्टम स्थानात आलेले शनि महाराज तुमच्यासाठी बऱ्यापैकी प्रश्न निर्माण करणार आहेत. त्यात प्रामुख्याने सासरच्या मंडळींशी विनाकारक वाद निर्माण होणं, दुरावा निर्माण होणं, जोडीदाराशी विसंवाद निर्माण होणं, आर्थिक नुकसानाचे योग निर्माण होणं, एखादं काम घडून येत असतांना मध्येच अडथळा निर्माण होणं, यासारखे अनेक नकारात्मक प्रभाव तुमच्यावर निर्माण होतील.

अष्टम स्थानातून शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थानाला कर्म स्थान म्हटलं जातं. तिथे मंगळाची मेष रास येते. मुख्य बाब म्हणजे तिथे राहु ग्रह विराजमान असेल. या राहुवर देखील शनि महाराजांची दृष्टी पडेल. राहुला दशम स्थान मानवतं. त्यानुसार तुमच्या व्यवसायात वृद्धी घडून येईल. अनेक प्रकारचे व्यावसायिक लाभ तुम्हाला होऊ शकतात. मात्र त्यात समाधान तुम्हाला अजिबात लाभणार नाही. तुम्ही सतत कार्यरत राहाल. कदाचित नेहमीपेक्षा कितीतरी पटीने जास्त कार्य कराल. मात्र त्यात तुम्हाला समाधान, संतुष्ठी लाभणार नाही. #drjyotijoshi

यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या कुटुंब स्थानावर पडेल. ज्यामुळे तुमच्या कुटुंबात विनाकारण वाद निर्माण होतील. कौटुंबिक दुरावा निर्माण होणं, कौटुंबिक शांती भंग पावणं, भरल्या कुटुंबात एकटेपणाची भावना निर्माण होणं, विसंवाद निर्माण होणं, आपल्याच माणसाकडून प्रगतीत अडथळे निर्माण होणं यासारखे अडथळे तुमच्यासाठी निर्माण होतील. असे असले तरी येथे देखील एक शुभ प्रभाव जाणवतो. तो म्हणजे तुमच्या कौटुंबिक प्रॉपर्टीत विभागणी होणार असेल तर त्यात तुम्हाला बऱ्यापैकी लाभ प्राप्त होऊ शकतो.

यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल. पत्रिकेतील पंचम स्थानावरुन आपण शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघतो. त्यानुसार शैक्षणिक वाटचालीत विलंबाचा सामना करावा लागणं, अडथळे निर्माण होणं, कुठे प्रवेश घ्यायचा असेल तर तिथे अडचणी येणं, या सारखे अनेक बाबी शनि महाराजांची ही दृष्टी तुमच्यासाठी निर्माण करेल. ही बाब आधीच लक्षात घेऊन नेहमीपेक्षा जास्त अभ्यास करण्याचा सल्ला कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. कारण तुम्ही जर नियोजन केलं असेल की रोज आपण किमान सहा तास तरी अभ्यास करायचा. मात्र शनि महाराज हे विलंबाचे कारक आहेत आणि अष्टम स्थानातून पडणारी त्यांची दृष्टी यामुळे ते तुम्हाला पाच तास अभ्यास करुन देतील. एक तास तुमचा विनाकारण वाया जाईल. त्यामुळे तुम्ही सात तासांच्या अभ्यासाचं नियोजन करावं. जेणे करुन तुमचा अभ्यास योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकेल. या काळात संतती तुमच्या बोलण्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष करणार आहे. मात्र तुम्ही हा विषय शांततेने घ्यावा. कारण हा काळ अल्प असेल. याशिवाय गुरु महाराजांची दृष्टी संततीच्या स्थानावर पडत असल्यामुळे गुरु महाराज तुमच्या संततीच्या अभ्यासाची काळजी घेतील. म्हणूनच संततीने तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तरी ते फारसं मनाला लावून घेऊ नका. कारण गुरु महाराज भाग्य स्थानातून शिक्षण आणि संतती या दोन्ही बाजु मजबूत करणार आहेत. म्हणजे शनि महाराज अडथळे आणतील आणि गुरु महाराज पाठबळ देतील. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्हींमध्ये तुमचे प्रयत्न यशाची दिशा ठरवतील. एकंदरीत शनि महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. #astrogurudrjyotijoshi

या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात कर्क जातकांनी महादेवाला दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहावेत व सारख घातलेल्या दुधाने अभिषेक करावा. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील.

अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन कर्क राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया. धन्यवाद! शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *