Skip to content
Home » शनि परिवर्तन – कन्या रास

शनि परिवर्तन – कन्या रास

 

जबाबदार्‍यांचे ठेवा भान

उन्नतीसह मिळेल समाधान

 

नमस्कार!

      मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बऱ्याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या कन्या राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. #astroguruma

      ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया.

      २०२२ या वर्षाचा आपण जेव्हा विचार करतो आणि या एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत तर कुठेतरी एक युग परिवर्तनाचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे राशी परिवर्तन होत त्याच्या अभ्यास आपण केला तर रवि ग्रह मेष राशीत प्रवेश करुन उच्चीचा होणार आहे. मात्र तिथेच राहु देखील आलेला असेल. ज्यामुळे रविला ग्रहण लागेल. गुरु ग्रह मीन या आपल्या स्वराशीत असेल. तेव्हा तिथेच शुक्र ग्रह देखील उच्चीचा असेल. म्हणजे गुरु आणि शुक्र हे दोन्ही मीन राशीत मात्र राहु आणि शनि या दोन ग्रहांच्या पाप कर्तरीत अडकलेले असतील. निसर्ग कुंडलीचं लाभ स्थान आपण बघितलं असता शनि महाराज कुंभ या स्वत:च्या मूळ त्रिकोण राशीत असतील. ज्यामुळे ते अत्यंत बलवान होतील. मात्र त्यावेळी तिथे त्यांचा आदर्श शत्रु मंगळ देखील आलेला असेल. एकंदरीत प्रत्येकच ग्रहाची स्थिती पाहिली असता किंवा निसर्ग कुंडलीचा विचार केला असता अनेक संकटमय स्थिती कुठेतरी निर्माण होतांना दिसत आहे. तरी देखील या स्थितीचे काही शुभ परिणाम देखील आहेत.

      शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते. #astrogurudrjyotijoshi

      मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा बऱ्यापैकी खर्च करायला लावणारा, जबाबदाऱ्या निभवा हे सांगणारा असतो. त्या जबाबदाऱ्या तुम्ही निभावल्या तर दुसऱ्या टप्प्यातील तुमच्या प्रगतीला कोणी थांबवू शकत नाही. व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता येते. योग्य दिशेने तुमची वाटचाल सुरु होते आणि तिसऱ्या टप्प्यात तुम्ही प्रगतीचे मोठे शिखर गाठतात. एकंदरीत कन्या जातकांसाठी शनि महाराजांची साडेसाती ही अत्यंत लाभदायक ठरते. आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदाऱ्या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. #astroguruma

      शनि महाराज साधारणपणे अडीच वर्ष एका राशीत राहतात. मात्र प्रत्येक वर्षी ते काही काळासाठी वक्री देखील होतात. त्यानुसार १२ जुलै २०२२ रोजी ते पुन्हा राशी परिवर्तन करुन मकर राशीत प्रवेश करतील. शनि सारखा पुढे आलेला ग्रह जेव्हा पुन्हा मागील राशीत जातो तेव्हा त्याचा एक विशिष्ट्य उद्देश असतो तेव्हा त्याला काही तरी आठवतं की आपली काही कामं अपूर्ण राहिलेली आहेत. ती आपण पूर्ण केली पाहिजेत. त्यासाठी तो वक्री होऊन मागील राशीत प्रवेश करतो आणि राहिलेली सर्व अपूर्ण कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शनिच्या मकर गोचरचा जो प्रभाव एखाद्याला पूर्ण मिळू शकलेला नसेल. मग तो प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार चांगला असो किंवा वाईट असो, तो राहिलेला प्रभाव पूर्ण करण्यासाठी शनि महाराज पुन्हा एकदा १२ जुलै २०२२ रोजी मकर राशीत प्रवेश करतील. महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी पर्यंत ते तिथेच राहतील. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचं हे संपूर्ण गोचर धनिष्ठा नक्षत्रातून होणार आहे.

      आता आपण तुमच्या कन्या राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया. #astroguruma

      कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराजांची स्थिती ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कारण ते तुमच्या राशीचे कारक ग्रह आहेत. त्यांपासून तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होतात. मागील काळात त्यांचं गोचर तुमच्या पंचम स्थानातून सुरु होतं. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहेत. खरं तर तुमचा राशी स्वामी बुध ग्रह म्हणजे युवराज आणि शनि म्हणजे वृद्ध ग्रह होय. किंवा आपण आजोबा आणि नातू या पद्धतीने देखील विचार करु शकतो. म्हणूनच त्यांच्यात कुठेतरी मैत्रीचे सूर जुळून येतात. एकंदरीत विचार केला असता कन्या राशीसाठी शनि महाराजांचं हे गोचर बऱ्यापैकी लाभदायक ठरणार आहे. त्यांचं मकर राशीतील गोचरही तुम्हाला अनेक शुभ फळं देणारं होतं. आता जेव्हा २९ एप्रिल रोजी शनि महाराज तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करतील तेव्हा त्या शुभ फळांमध्ये मोठी वृद्धी घडून येईल. कारण षष्ठ स्थान हे उपयच स्थान असतं. ते वृद्धी करतं. विशेेष म्हणजे शनि महाराजांच्या स्वभावाला अनुसरुन त्याची वृद्धी असते. या वृद्धीमुळे तुमची अनेक बाबतीत प्रगती घडून येईल.

      ज्योतिष नियमांनुसार पत्रिकेतील उपचय स्थानं पाप ग्रहांना विशेष मानवतात. तुमच्या राशीचे कारक असलेल्या शनि महाराजांना ते जास्त मानवतं. त्यातही महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शनि महाराज तेथून तुम्हाला शुभ फळं द्यायला बाध्य होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जे जातक गेली अनेक दिवस नोकरीमध्ये पदोन्नतीची वाट बघत होते ती शनि महाराजांच्या कृपेने तुम्हाला अचानकरीत्या प्राप्त होईल. हितशत्रुंवर तुम्ही अगदी सहजच मात करु शकाल. या काळात तुम्हाला शैक्षणिक यश प्राप्त होईल. तुमच्या कर्तृत्वातही मोठी वृद्धी घडून येईल. थोडक्यात अनेक गोष्टींची अत्यंत शुभ फळं षष्ठ स्थानात येणारे शनि महाराज प्रदान करणार आहेत. कारण ते कुंभ या आपल्या मूळ त्रिकोण राशीत, आवडत्या राशीत प्रवेश करतील. ते सुरुवातीला धनिष्ठा या नक्षत्रात प्रवेश करीत आहेत. जे मंगळाचं नक्षत्र आहे. त्यामुळे अचानकपणे संकट येणं, विपरीत घटना घडणं हा प्रभाव देखील होऊ शकतो. मात्र जसं आपल्याला माहिती आहे की कन्या राशीसाठी शनि कारक तर मंगळ अकारक ग्रह असल्यामुळे शनिचा प्रभाव हा निश्चितच जास्त असेल. #astrogurudrjyotijoshi

      जसं आपल्याला माहिती आहे की शनि महाराजांना तृतीय, सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. ज्या अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात. म्हणजे पत्रिकेतील दोन स्थानं आणि तीन दृष्ट्या अशा एकूण पाच स्थानांवर शनि महाराज प्रभाव टाकतात. त्यानुसार षष्ठ स्थानातील शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल. पत्रिकेतील अष्टम स्थानावरुन अचानक धनलाभ बघितला जातो. त्यानुसार या स्थानावर शनि महाराजांची पडणारी दृष्टी तुम्हाला अचानक धनलाभ प्राप्त करुन देऊ शकते. तुम्ही जर आधी जमीन घेतलेली असेल, प्लॉट घेतलेला असेल त्यातून धनलाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील.

      यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या व्यय स्थानावर पडेल. शनि महाराजांचा एक मूळ स्वभाव आहे. ते आपल्याला नेहमीच सांगतात की, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. कर्म, कर्तव्य पूर्ण करा. मी तुम्हाला फळ द्यायला बाध्य आहे. त्यानुसार येथून शनि महाराज तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहेत की तुम्ही तुमचे कर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या पूर्ण करा. ते जर तुम्ही केले तर शनि महाराज षष्ठ स्थानातून तुम्हाला भरभरुन शुभ फळं निश्चितपणे प्रदान करतील. व्यय स्थानावर पडणारी त्यांची दृष्टी तुमच्यासाठी लहान-मोठे प्रवास करणं, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करणं यासारखी फळं देतील. महत्त्वाची बाब म्हणजे त्यातून तुम्हाला सामाधान देखील प्राप्त होईल. म्हणून या काळात तुम्ही जास्तीत जास्त लक्ष आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. #drjyotijoshi

      यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल. पत्रिकेतील तृतीय स्थानावरुन परिश्रम, पराक्रम, बंधुसौख्य, शेजारी या गोष्टी बघितल्या जातात. या स्थानावर पडणाऱ्या शनि महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे तुम्हाला बंधुसौख्य प्राप्त होईल. या काळात तुमचे लहान-मोठे प्रवास घडून येतील आणि त्या प्रवासातूनही तुम्हाला लाभ प्राप्त होईल. शेजार्‍यांशी सौख्य वाढेल. तुमच्या कर्माच्या, परिश्रमाच्या दिशेला शिस्तबद्धपणा येईल. त्यातुन तुमच्या प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. अर्थात हे सर्व २९ एप्रिल ते १२ जुलै या काळात घडून येईल. त्यानंतर शनि महाराज वक्री होऊन पुन्हा एकदा मकर राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील. ते पुन्हा मागील राशीत जातील, याचा अर्थ तेथील त्यांची काही कार्य अपूर्ण राहिलेली आहेत. ती पूर्ण करण्यासाठीच ते पंचम स्थानात प्रवेश करतील. #astrogurudrjyotijoshi

      पंचम स्थानातील शनि महाराजांच्या शुभ फळांचा तुम्ही मागील काळात अनुभव घेतलेलाच आहे. त्यांचं जेव्हा मकर राशीत आगमन झालं होतं तेव्हा आम्ही देखील विविध व्हिडिओंच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण केलं होतं. त्याचा अनुभव तुम्ही निश्चितच घेतलेला आहे. तेच अनुभव तुम्हाला पुन्हा प्राप्त होतील. १२ जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंतचा तो काळ असेल. त्यानंतर शनि महाराज मार्गी होऊन पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करतील. म्हणजे आता २९ एप्रिल ते १२ जुलै या काळात तुम्हाला जी फळं प्राप्त होणार आहेत, त्याच फळांमध्ये जानेवारी २०२३ नंतर पुन्हा वृद्धी घडून येईल. किंवा आपण असंही म्हणू शकतो की जानेवारी २०२३ नंतर शनि महाराज जी शुभ फळं तुम्हाला देणार आहेत, त्या फळांचा थोडासा ट्रेलर आता तुम्हाला बघायला मिळणार आहे.

      एकंदरीत शनि महाराजांचं हे गोचर कन्या राशीसाठी अत्यंत शुभफलदायक राहणार आहे. खरं म्हणजे आता होणारे सर्वच गोचर कन्या राशीसाठी आपण शुभ म्हणू शकतो. कारण षष्ठ स्थानात शनि महाराज, सप्तम स्थानात गुरु महाराजांद्वारा हंस योग या काळात घडून येणार आहे. ज्याची अत्यंत शुभ फळं तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होणार आहेत. याच काळात अष्टम स्थानात प्रवेश करणारा राहु कुठेतरी नकारात्मकता निर्माण करेल. मात्र ग्रह हे सतत फिरत असतात. त्यात काही ग्रह शुभ परिणाम देतात. तर काही ग्रह संघर्ष निर्माण करतात. कोणताही ग्रह पूर्णपणे शुभ किंवा पूर्णपणे अशुभ नसतो. तो त्याच्या स्थानानुसार, दृष्टीनुसार, कारकत्वानुसार आणि पत्रिकेतील त्याच्या भावेशत्वानुसार फळं देत असतो.

      या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीला शनि महाराज पंचमेश आणि षष्ठेश आहेत. आता ते राशी परिवर्तन करुन षष्ठ स्थानात प्रवेश करतील. ज्याचे अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या अष्टम, व्यय आणि तृतीय स्थानावर पडेल. या सर्व दृष्ट्या देखील तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. म्हणजे एकंदरीत तुमच्या पत्रिकेतील पाच स्थानांवर शनि महाराज एकाच वेळी शुभ प्रभाव दिसून येईल.

      या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात कन्या जातकांनी महादेवाचे मंदीर व परिसराची स्वच्छता करावी. आपल्या परिने तिथे सेवा द्यावी. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. #drjyotijoshi

      अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन कन्या राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!  

अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *