Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – कर्क रास

राहु-केतु परिवर्तन – कर्क रास

 

वृद्धी होईल कर्मात

भर पडेल लाभात

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. #astrogurudrjyotijoshi

राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनातील सर्व सुखसुविधा जातकाला राहु प्रदान करतो तर केतु त्या सर्वांना जातकापासून काढून घेण्याचं काम करतो. राहु हा ग्रह भविष्यकाळ आहे तर केतु हा ग्रह भविष्यकाळ आहे. राहु म्हणजे भौतिकता तर केतु म्हणजे आध्यात्म होय. हे दोन्ही ग्रह १८० अंशावर बसून मनुष्याने कोणत्या दिशेने श्रम करावेत, याचं मार्गदर्शन करीत असतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही ग्रह कायमस्वरुपी वक्री चालित असतात. कारण ते बिंदू असून ते सदैव मागच्याच राशीत जात असतात. हे दोन्ही ग्रह कधीही मार्गी होत नाहीत. म्हणून देखील या दोघांचे प्रभाव सर्वात जास्त असतात, असे आपण म्हणू शकतो. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे राहु आणि केतु या दोन्ही ग्रहांना स्वत:ची राशी नाही. मात्र पत्रिकेत ते ज्या राशीत विराजमान असतात त्या राशीच्या स्वामीनुसार त्यांची फळ देण्याची वृत्ती आणि प्रवृत्ती तयार होते. म्हणूनच या दोन्ही ग्रहांचं परिवर्तन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. साधारणपणे दीड वर्षानंतर हे दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करीत असतात. त्यामुळे साहजिकच त्यांना प्रभाव हा दीड वर्षांपर्यंत असतो. म्हणून देखील त्यांच्या परिवर्तनाला महत्त्व प्राप्त होतं. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद ग्रह मानला जातो. शनिला एक राशीत साधारणपणे अडीच वर्षांपर्यंत विराजमान असतो. त्याच्या खालोखाल राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह साधारणपणे दीड वर्षांपर्यंत एक राशीत विराजमान असतात. म्हणून त्यांचा प्रभाव हा दीर्घकालीन असतो व म्हणूनच तो प्रामुख्याने समोर येतो.

एखाद्या जातकाच्या पत्रिकेत लग्न स्थानात किंवा चंद्राच्या सोबतीला राहु ग्रह विराजमान असेल किंवा राशि स्वामी सोबत राहु ग्रह विराजमान असेल तर अशा जातकाला जगातील प्रत्येक गोष्ट हवी असते. प्रत्येक ठिकाणी यश मिळविणं, सतत धडपड करणं, त्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरणं, काहीही करुन हवी असलेली गोष्ट आपल्याला मिळायलाच हवी, त्यासाठी वाटेल तेवढे परिश्रम करण्याची तयारी राहु त्या जातकाला प्रदान करतो. याच्या अगदी विरुद्ध स्थिती केतु सोबत असते. म्हणजे केतु ग्रह जर लग्न स्थानात असेल, राशी स्वामी सोबत असेल तर तो कुठेतरी निराशा देतो. विषयाकडे सोडून देणे, जास्तीचे परिश्रम न करणे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी काहीशी भूमिका अशा जातकांची असते. हा मुलभूत विरोधाभास राहु आणि केतु या दोन ग्रहांच्या प्रभावांमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. #rahuketuparivartan

राहु म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पाहिजे ते परिश्रम करुन ती गोष्ट साध्य करणं होय. पटकन, झटकन काही तरी मिळविणं, भौतिक सुखाचा पुरेपुर उपभोग घेणं म्हणजे राहु होय. म्हणूनच आजच्या २१ व्या शतकात, आजच्या आधुनिक युगात राहुचं महत्त्व जास्त आहे. केतु हा ग्रह याच्या अगदी विरुद्ध प्रभाव दर्शवितो. तो मुक्तीचा, मोक्षाचा कारक ग्रह आहे. माणसाला आध्यात्म्याच्या मार्गावर नेण्याचं कार्य केतु करीत असतो. एखाद्या जातकाच्या कुंडलीतील केतु प्रबळ असेल तर तो जातक संसारापासून, जीवनातील सर्व मोहांपासून लांब जातो. सर्वांपासून तो अलिप्त होतो आणि मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतो. म्हणून केतुचं महत्त्व देखील नाकारता येत नाही. कारण जीवनाचं अंतिम ध्येय हे मोक्षचं असतं. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा कर्क राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

      कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता गेली तीन वर्ष राहु हा ग्रह अत्यंत प्रबळ होता. म्हणजे मिथुन राशीत तो अत्यंत प्रबळ होता. त्यानंतर वृषभ रास ही शुक्राची म्हणजे राहुच्या मित्राची रास असल्यामुळे तिथे देखील तो अत्यंत बळकट अवस्थेत होता. भ्रम, फसवणूक याचे सर्व ऐतिहासिक विक्रम राहुच्या कृपेने मोडल्या गेले आहेत. आता राहु सेनापतीच्या घरात म्हणजे मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भ्रम आणि भ्रमाचे तारे तुटून वास्तव जगाच्या समोर येईल, असे आपण म्हणू शकतो. म्हणजे गेली तीन वर्ष जो भ्रमाचा जो डोलारा उभा करण्यात आलेला होता त्याच्यातून सेनापतीच्या घरात राहु प्रवेश करेल तेव्हा कुठेतरी तो सेनापतीच्या द्वारे पराभूत होईल. त्यामुळे सत्यता जगाच्या समोर येईल. कर्क राशीच्या दशम स्थानात राहुचं आगमन होणार आहे. जे तुमच्यासाठी अत्यंत उत्तम ठरेल. कारण दशम स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे ते राहुला विशेषत्वाने मानवतं. मात्र मंगळ आणि राहु यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे. या ठिकाणी राहुचं बळ कमी पडेल आणि मंगळाचं बळ वाढणार आहे. कारण राहु मंगळाच्या राशीत प्रवेश करणार आहे आणि मंगळ गोचरने बऱ्यापैकी प्रबळ झालेला दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यानुसार मंगळाचं देखील परिवर्तन होईल. त्याद्वारे मंगळही प्रबळ झालेला असेल. एकंदरीत दशम स्थानात आलेला राहु हा कर्क जातकांना कर्म प्रधान करेल. #drjyotijoshi

राहु-केतुच्या पाठोपाठ १३ एप्रिल रोजी गुरु महाराज देखील राशी परिवर्तन करीत आहेत. ते तुमच्या भाग्य स्थानात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर २९ एप्रिल रोजी शनि महाराज देखील राशी परिवर्तन करीत आहेत. हे बदल देखील आपण राशी नुसार सविस्तरपणे सांगणारच आहोत. मात्र कर्क म्हणून जेव्हा तुम्ही आपल्या राशीचा विचार करता तेव्हा प्रत्येकच गोचरचा, प्रत्येकच परिवर्तनाचा तुमच्यावर प्रभाव होणार आहे. तसेच राहु परिवर्तनाचा प्रभाव सांगतांना पर्यायाने गुरु आणि शनिचा विचार आपण करीत असतो. आपल्या माहिती आहेच की राहुला एकूण तीन दृष्ट्या असतात आणि त्या दृष्टींचाही खूप मोठा प्रभाव पडतो. त्यानुसार राहुची पंचम दृष्टी तुमच्या धन स्थानावर, सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आणि नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. एकंदरीत तुमच्या दशम स्थानात आलेला राहु हा तुमच्यासाठी बऱ्यापैकी यशाचे दरवाजे उघडे करणार आहे. मागील तीन वर्ष जो तुम्ही सातत्याने संघर्ष करीत आहात त्याच्यातून बाहेर पडून उन्नतीकडे मार्गक्रमण करण्याची ही वेळ असणार आहे. #astrogurudrjyotijos

थोडक्यात सांगायचे झाल्यास येणाऱ्या दीड वर्षात तुमचे कर्म अत्यंत समृद्ध होणार आहेत. विशेषत: भाग्येश भाग्यात असतांना दशम स्थानात आलेला राहु हा बऱ्यापैकी शुभ फळ तुम्हाला प्रदान करणार आहे. तुम्हाला कर्म प्रधान बनविणार आहे. शत्रुंवर तुम्ही मात करणार आहात. स्पर्धकांच्या सतत पुढे राहाल. हे जरी असलं तरी कौटुंबिक दुरावा निर्माण होणं, वास्तुच्या कामांना विलंब होणं हे प्रभाव देखील तुमच्यावर जाणवणार आहेत. कारण राहु आणि केतु यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते शिर आणि धड असले म्हणजे एकाच शरीराचे दोन भाग असले तरी देखील हे दोन्हीही ग्रह एकाच वेळी शुभ किंवा अशुभ सहसा होत नाहीत. म्हणजे राहु शुभ स्थितीत असेल तर केतुचे अशुभ परिणाम प्राप्त होतात. तसेच केतु शुभ स्थितीत असेल तर राहुचे अशुभ परिणाम प्राप्त होतात. त्यातल्या त्यात राहुचं शुभ असणं हे जास्त फायदेशीर, लाभकारक असतं. कारण राहुच्या स्थानासह त्याच्या तीन दृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण कार्य करीत असतात. त्यामानाने केतु जवळ फक्त सप्तम ही एकच प्रभावशाली दृष्टी असते. कारण ते धड असल्यामुळे पंचम आणि नवम दृष्टी ही फारशी कार्य करतांना आढळून येत नाही. म्हणूनच पत्रिकेत राहु शुभ असेल तर ते जास्त शुभदायक ठरतं.

यानुसार विचार केला असता कर्क जातकांसाठी राहुचं हे राशी परिवर्तन अत्यंत शुभदायक ठरणार आहे. तर केतुचं गोचर अशुभदायक ठरणार आहे. मात्र त्याचे अशुभ परिणाम हे मर्यादित स्वरुपात होतील. विशेषत: वास्तु, वाहन, आईचं आरोग्य या संदर्भात ते परिणाम होतील. घरातील सुखशांती या काळात हरवलेली असेल. परंतु आर्थिक बाबतीत विचार केला असता कर्क जातकांना या काळात स्थैर्य लाभणं, विकास होणं, व्यावसायिक विकास घडून येणं किंवा नौकरीतील विकासाच्या संधी प्राप्त होणं अशा विविध दृष्टीने राहुचं हे भ्रमण फायदेशीर ठरणार आहे. राहु मेष राशीत असतांना १४ तारखेला रवि देखील मेष राशीत प्रवेश करेल. येथे अजून एक बाब घडून येईल की राहुचे अंश जास्त असतील. कारण तो वक्री चालीने भ्रमण करीत असतो. म्हणजे जास्त अंशाकडून कमी अंशाकडे तो वाटचाल करतो. तसेच रवि हा ग्रह मार्गी असतो. त्यामुळे रविचे अंश साहजिकच तेव्हा कमी असतील. त्यामुळे तिथे ग्रहयुद्ध घडून येईल. ज्यात रविचा विषय होईल. तसेच मेष राशीत रवि उच्चीचा होत असतो. त्यामुळे तो सर्वच राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. राहु हा ग्रह रविला ग्रहण लावण्याचं सामर्थ्य ठेवतो. हे जरी खरं असलं तरी ज्योतिषीय नियमांनुसार जेव्हा ग्रह युद्ध होतात तेव्हा कमी अंशाचा ग्रह जास्त यशस्वी ठरतो. येथे राहुची वाटचाल रविच्या दिशेने आणि रविची वाटचाल राहुच्या दिशेने असेल.

अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या ग्रह युद्धात राहु शत्रु राशीत तर रवि मित्र राशीत आणि त्यातही उच्च अवस्थेत असल्यामुळे तो मूळत: तिथे प्रबळ झालेला असेल. हा प्रबळ असलेला रवि जगासमोर धडधडीत सत्य, वास्तव आणण्याचं काम करेल. फसवणूक, संभ्रम आदी सर्वकाही बाहेर निघेल. जागतिक कटकारस्थानाचं बिंग फुटेल. सत्य जगासमोर येईल. ही अत्यंत शुभदायक बाब आपण या काळातील म्हणू शकतो. ही घटना १४ एप्रिल ते १४ मे च्या काळात घडू शकते. अर्थातच त्याचा अत्यंत शुभ प्रभाव सर्वांवर घडून येईल. त्यात कर्क जातकांना देखील अत्यंत शुभ फळं प्राप्त होतील.

राहु-केतु परिवर्तनाचे कर्क राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *