Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – वृश्चिक रास

राहु-केतु परिवर्तन – वृश्चिक रास

दिवस सरले आता संघर्षाचे

मार्ग प्रशस्त होतील प्रगतीचे

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण वृश्चिक राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत राहु सोबत शुक्र हा ग्रह असेल तर तो जातकाच्या मनात पझेसिव्हनेस निर्माण करण्याचा काम करेल. माझा जोडीदारा कसा असावा? जो किती स्मार्ट असावा? तो टापटिप असावा किंवा त्याने इतरांशी बोलावं की बोलू नये? या सर्व बाबी दर्शविणारा ग्रह म्हणजे राहु होय. तर याच्या अगदी विरुद्ध मानसिकता केतुची असते. जोडीदार गबाळ असेल तरी चालेल. कसाही असला तरी चालेल. कोणताही कलर कॉम्बिनेशन नसलेला व्यक्ती देखील एखाद्याला मनापासून आवडू शकतो. कारण अशा जातकांच्या पत्रिकेत केतु आणि शुक्राची युती असते. त्यातहून महत्त्वाची बाब म्हणजे अशा जातकांचा संसार देखील अतिशय उत्तम असतो. कारण केतु या गोष्टींना महत्त्व देत नाही.

थोडक्यात राहु आणि केतु या दोन्ही ग्रह एकमेकांशी संबंधित असले तरी ते दोन्ही भिन्न टोकांना असतात. त्यामुळे त्यांचे प्रभावही एकमेकांच्या विरुद्ध असतात. राहुला आपण काळ पुरुषाचं दु:ख म्हणू शकतो. तो छाया ग्रह आहे. सूड घेण्याची प्रवृत्ती त्याच्यात आहे. दारुसह इतरही वाईट प्रवृत्तीचा कारक म्हणूनही त्याला ओळखलं जातं. घात, चोरी, अपघात, दरोडा, माणसाला विस्थापित करणं हे सर्व कारकत्व मानलं जातं. मात्र यामुळे राहु पूर्णपण वाईट होत नाही. त्याच्याकडे काही चांगल्या बाबी देखील येतात. राहु म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पाहिजे ते परिश्रम करुन ती गोष्ट साध्य करणं होय. पटकन, झटकन काही तरी मिळविणं, भौतिक सुखाचा पुरेपुर उपभोग घेणं म्हणजे राहु होय. म्हणूनच आजच्या २१ व्या शतकात, आजच्या आधुनिक युगात राहुचं महत्त्व जास्त आहे. #astroguru

केतु हा ग्रह याच्या अगदी विरुद्ध प्रभाव दर्शवितो. तो मुक्तीचा, मोक्षाचा कारक ग्रह आहे. माणसाला आध्यात्म्याच्या मार्गावर नेण्याचं कार्य केतु करीत असतो. एखाद्या जातकाच्या कुंडलीतील केतु प्रबळ असेल तर तो जातक संसारापासून, जीवनातील सर्व मोहांपासून लांब जातो. सर्वांपासून तो अलिप्त होतो. आध्यात्म्याच्या कारक ग्रह खरं तर तीन आहे. शनि, गुरु आणि केतु हे तीन ग्रह होय. मात्र या तिघांच्या कारकत्वात एक मुलभूत फरक आढळून येतो. तो म्हणजे शनि महाराज जातकाला सांगतात कि, नीतीने, न्यायाने वागा आणि मोक्षाकडे जा. गुरु महाराज जातकाला सांगतात की आधी सर्व कर्म, सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि मोक्षाकडे चला. तर केतु जातकाला सांगतो की सर्व काही सोडून द्या आणि मोक्षाकडे चला. अर्थात, केतु हा ग्रह कुठेतरी जबाबदारी नाकारणारा ग्रह आहे, असं आपण म्हणू शकतो. त्याचा प्रभाव भयंकर असतो. तो पत्रिकेत ज्या स्थानात बसतो त्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचं काम करतो. ज्या ग्रहासोबत तो बसलेला असतो त्याचं कारकत्व खराब करण्याचं काम तो करीत असतो. तसेच ज्या स्थानावर त्याची दृष्टी असते त्या नात्यात तो दरी निर्माण करतो. मनुष्याला विरक्ती येते ती केतु या ग्रहामुळेच येते. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा वृश्चिक राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता राहु-केतुच्या या परिवर्तनाने ‘सुखाचा काळ आला’ असं आपण म्हणू शकतो. कारण गत काही वर्षांपासून सातत्याने संघर्ष करीत आहेत. या संघर्षातून तुमची आता सुटका होणार आहे. या वर्षाचं राशी भविष्य सांगतांना देखील आम्ही वृश्चिक जातकांना सांगितलं होतं की खूप उत्तम काळ तुमच्यासाठी येणार आहे. फक्त एप्रिल महिन्यापर्यंत वाट बघा. आता एप्रिल महिना देखील जवळ आलेला आहे. या महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. जी मोठी ऐतिहासिक घटना ठरेल. कारण असा संयोग सहसा जुळून येत नाही. या सर्व ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीवर अत्यंत शुभ प्रभाव होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहु ग्रह की जे ज्याने गत दीड वर्ष तुमच्या कौटुंबिक सुखात विसंवाद उभा केला होता. दुरावा निर्माण केला होता. तो आता येथून पुढे तुम्हाला शुभ फळे द्यायला बाध्य होणार आहे. कारण तो आता राशी परिवर्तन करुन तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहे.

      पत्रिकेतील षष्ठ स्थान हे उपचय स्थान म्हणून ओळखलं जातं. जे राहुला विशेष मानवतं. त्यामुळे या स्थानात येणारा राहु तुम्हाला शुभ फळं देण्यासाठीच येणार आहे, असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. शत्रुंचा नाश करणं, स्पर्धकांवर विजय प्राप्त करणं, कर्जाची आवश्यकता असल्यास ते सहज प्राप्त करुन देणं, नौकरीमध्ये पदोन्नतीच्या संधी देणं, आर्थिक लाभ मिळवून देणं, असे अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला षष्ठ स्थानात येणारा राहु तुम्हाला प्रदान करणार आहे. कारण पत्रिकेतील षष्ठ स्थान हे राहुला सर्वात जास्त मानवणारं स्थान आहे. खरं सांगाचयं तर राहुला तृतीय, षष्ठ, दशम आणि एकादश ही चारंही उपचय स्थानं मानवतात. त्यातल्या त्यात जेव्हा आपण विचार करतो तर सर्वात जास्त शुभ फळं षष्ठात आलेला राहु देत असतो. शत्रुंना नामोहरम करण्याचं सामर्थ्य तो तुम्हाला प्रदान करतो. थोडक्यात राहुचं हे परिवर्तन वृश्चिक जातकांसांठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. #astrogurudrjyotijoshi

आपल्याला माहिती आहेच की राहुला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. त्यामुळे राहु एकाच वेळी चार स्थानांवर आपला प्रभाव टाकत असतो. म्हणून देखील राहुचं परिवर्तन हे खूप महत्त्वाचं असतं. त्यानुसार षष्ठ स्थानात विराजमान राहुची पंचम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावर पडणारी राहुची दृष्टी तुमच्या कर्मात वृद्धी करण्याचं काम करेल. आजच्या आधुनिक काळात माणसाला जे जे हवं असतं म्हणजे पैसा, प्रतिष्ठा, यश, राजकारणातील यश हे सर्व या दृष्टीतून घडून येतं. अनेक लोकांना व्यवसायात, राजकारणात, समाजकारणात भरभरुन यश येथून प्राप्त होतं.

यानंतर राहुची सप्तम दृष्टी तुमच्या व्यय स्थानावर पडणार आहे. ही दृष्टी तुम्हाला प्रवास करायला लावेल. अनेक प्रकारांनी खर्च करायला लावेल. मात्र ते सर्व खर्च हे तुमच्यासाठी लाभदायक असतील. थोडक्यात खर्च होणार असला तरी तो योग्य व लाभदायक कारणांसाठीच होईल. यानंतर राहुची नवम दृष्टी तुमच्या कुटुंब स्थानावर पडेल. जी तुम्हाला थोडासा विपरीत परिणाम देईल. कारण शेवटी राहु हा राहुच असतो. तो कितीही शुभ स्थितीत असला, कितीही चांगल्या राशीत असला तरी सर्वार्थाने शुभ होणं हे त्याला मानवत नाही. कारण त्याचा तो मूळ स्वभाव असतो. आपला मूळ स्वभाव तो कधीही सोडत नाही. त्यानुसार त्याच्या नवम दृष्टीमुळे राहु तुमच्या कुटुंबात थोडे प्रश्न निर्माण करण्याचं काम करेल. तरी देखील षष्ठ स्थानात येणारा राहु हा राजयोगकारक मानला जातो. विशेषत: राजकारणातील व्यक्तींना राजकीय यश देण्याचं, व्यावसायिक व्यक्तींना व्यावसायिक यश देण्याचं कार्य तो करतो. याशिवाय शेअर मार्केट सारख्या व्यवसायातून, मेडिकल सेक्टर मध्ये प्रचंड लाभ होतो. सोबतच न्यायालयीन सेक्टरमध्ये जे लोक कार्यरत आहेत त्यांना देखील खूप मोठा लाभ षष्ठ स्थानातील राहुमुळे होतो.   एकंदरीत षष्ठ स्थानात येणारा राहु तुम्हाला भरघोस यश व लाभ प्रदान करणार आहे. #drjyotijoshi

केतु परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता त्याचं तुमच्या व्यय स्थानात आगमन होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केतुची ही स्थिती देखील तुमच्यासाठी शुभदायक ठरणार आहे. कारण इतके दिवस तो तुमच्या राशीत विराजमान होता. ज्यामुळे तुम्हाला नैराश्याने घेरलं होतं. अनेक संघर्ष या काळात तुम्हाला करावे लागत होते. या सर्व संघर्षातून तो आता तुमची सुटका करणार आहे. अर्थात येथील केतुमुळे तुमच्या प्रवासात वाढ होईल. तरीही व्यय स्थानातील केतुपासून तुम्हाला शुभ शुभ फळं निश्चितच प्राप्त होतील. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याच काळात शनि महाराज देखील राशी परिवर्तन करुन तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत. तिथे ते पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेल्या शश योगाचे निर्माण करणार आहेत. सोबतच त्यांची तृतीय दृष्टी षष्ठातील राहुवर असणार आहे. राहु सोबत ते लाभयोग देखील करतील. या सर्व गोष्टींचे अत्यंत शुभ परिणाम तुमच्यावर होणार आहेत. हे कमी की काय, म्हणून १३ एप्रिल रोजी तुमचे पंचमेश गुरु महाराज हे देखील राशी परिवर्तन करुन तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहे. ज्यामुळे पंचमेश पंचम स्थानात ही स्थिती निर्माण होईल. जी अत्यंत शुभ मानली जाते. गुरु महाराज अनेक दु:खातून तुमची सुटका करुन, तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग प्रशस्त करणार आहेत. #bestastrologerinmaharashtra

थोडक्यात एप्रिल महिन्यातील ग्रह स्थिती बघितली असता सर्व ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन वृश्चिक राशीसाठी बऱ्यापैकी लाभदायक ठरणार आहे. विशेषत: राहु आणि केतुचं राशी परिवर्तन हे तुम्हाला संकटातून बाहेर काढणारं, मागील काळात जो संघर्ष तुम्ही केला आहे, त्यातून सुटका करणारं ठरेल. सोबतील इतर ग्रहाचं देखील तुम्हाला भरभरुन सहकार्य प्राप्त होईल. त्यामुळे वृश्चिक राशीसाठी प्रगतीचे मार्ग प्रशस्त होणार आहेत, असं आपण म्हणू शकतो. त्याचा तुम्ही पुरेपुर लाभ घेण्याचा प्रयत्न करायला हवा.

राहु-केतु परिवर्तनाचे वृश्चिक राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 शुभम भवतु!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *