Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – तुळ रास

राहु-केतु परिवर्तन – तुळ रास

  • by

राहु-केतुची अशुभता

शनि कमी करेल तीव्रता

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण तुळ राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. #rahuketuparivartan

राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत राहु सोबत शुक्र हा ग्रह असेल तर तो जातकाच्या मनात पझेसिव्हनेस निर्माण करण्याचा काम करेल. माझा जोडीदारा कसा असावा? जो किती स्मार्ट असावा? तो टापटिप असावा किंवा त्याने इतरांशी बोलावं की बोलू नये? या सर्व बाबी दर्शविणारा ग्रह म्हणजे राहु होय. तर याच्या अगदी विरुद्ध मानसिकता केतुची असते. जोडीदार गबाळ असेल तरी चालेल. कसाही असला तरी चालेल. कोणताही कलर कॉम्बिनेशन नसलेला व्यक्ती देखील एखाद्याला मनापासून आवडू शकतो. कारण अशा जातकांच्या पत्रिकेत केतु आणि शुक्राची युती असते. त्यातहून महत्त्वाची बाब म्हणजे अशा जातकांचा संसार देखील अतिशय उत्तम असतो. कारण केतु या गोष्टींना महत्त्व देत नाही.

थोडक्यात राहु आणि केतु या दोन्ही ग्रह एकमेकांशी संबंधित असले तरी ते दोन्ही भिन्न टोकांना असतात. त्यामुळे त्यांचे प्रभावही एकमेकांच्या विरुद्ध असतात. राहुला आपण काळ पुरुषाचं दु:ख म्हणू शकतो. तो छाया ग्रह आहे. सूड घेण्याची प्रवृत्ती त्याच्यात आहे. दारुसह इतरही वाईट प्रवृत्तीचा कारक म्हणूनही त्याला ओळखलं जातं. घात, चोरी, अपघात, दरोडा, माणसाला विस्थापित करणं हे सर्व कारकत्व मानलं जातं. मात्र यामुळे राहु पूर्णपण वाईट होत नाही. त्याच्याकडे काही चांगल्या बाबी देखील येतात. राहु म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पाहिजे ते परिश्रम करुन ती गोष्ट साध्य करणं होय. पटकन, झटकन काही तरी मिळविणं, भौतिक सुखाचा पुरेपुर उपभोग घेणं म्हणजे राहु होय. म्हणूनच आजच्या २१ व्या शतकात, आजच्या आधुनिक युगात राहुचं महत्त्व जास्त आहे.

केतु हा ग्रह याच्या अगदी विरुद्ध प्रभाव दर्शवितो. तो मुक्तीचा, मोक्षाचा कारक ग्रह आहे. माणसाला आध्यात्म्याच्या मार्गावर नेण्याचं कार्य केतु करीत असतो. एखाद्या जातकाच्या कुंडलीतील केतु प्रबळ असेल तर तो जातक संसारापासून, जीवनातील सर्व मोहांपासून लांब जातो. सर्वांपासून तो अलिप्त होतो. आध्यात्म्याच्या कारक ग्रह खरं तर तीन आहे. शनि, गुरु आणि केतु हे तीन ग्रह होय. मात्र या तिघांच्या कारकत्वात एक मुलभूत फरक आढळून येतो. तो म्हणजे शनि महाराज जातकाला सांगतात कि, नीतीने, न्यायाने वागा आणि मोक्षाकडे जा. गुरु महाराज जातकाला सांगतात की आधी सर्व कर्म, सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि मोक्षाकडे चला. तर केतु जातकाला सांगतो की सर्व काही सोडून द्या आणि मोक्षाकडे चला. अर्थात, केतु हा ग्रह कुठेतरी जबाबदारी नाकारणारा ग्रह आहे, असं आपण म्हणू शकतो. त्याचा प्रभाव भयंकर असतो. तो पत्रिकेत ज्या स्थानात बसतो त्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचं काम करतो. ज्या ग्रहासोबत तो बसलेला असतो त्याचं कारकत्व खराब करण्याचं काम तो करीत असतो. तसेच ज्या स्थानावर त्याची दृष्टी असते त्या नात्यात तो दरी निर्माण करतो. मनुष्याला विरक्ती येते ती केतु या ग्रहामुळेच येते. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा तुळ राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया. #drjyotijoshi

      तुळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता राहुचं आमगमन तुमच्या सप्तम स्थानात होणार आहे. तसेच केतुचं आगमन तुमच्या राशीत होणार आहे. कारण हे दोन्ही ग्रह एकाच वेळी राशी परिवर्तन करतात. दोघेही एकमेकांपासून १८० अंशावर आणि वक्री चालीने म्हणजे राशीत त्यांचा प्रवास सुरु असतो. वास्तविक हे दोन्ही ग्रह नसून बिंदू आहेत आणि वक्री मार्गानेच त्यांचा प्रवास सुरु असतो. या प्रवासाचा प्रभाव खूप मोठा असतो. कारण हे दोन्हीही ग्रह एकेका राशीत तब्बल दीड वर्ष ठाम मांडून बसलेले असतात. म्हणजे शनि नंतर एका राशीत जास्तीत जास्त कालावधीपर्यंत एका राशीत मुक्काम करणारे ग्रह कोणते असतील तर ते राहु आणि केतु होय. तर असा हा राहु तुमच्या सप्तम स्थानात आणि केतु तुमच्या राशीत आलेला आहे. एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष ते तुमच्या आयुष्यात दाखवित आहेत. या संघर्षाचे परिणाम देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्यामुळे तुळ जातकांनी अजिबात घाबरुन जाऊ नये. कारण या काळात शनि महाराज तुम्हाला प्रचंड सहकार्य करणार आहेत. त्यामुळे फक्त राहु-केतुचे फळ लक्षात न घेता शनि महाराज किंबहूना गुरु महाराजांच्या शुभ फळांचाही विचार करणे आवश्यक आहे. ते देखील आम्ही तुम्हाला राशीनुसार स्वतंत्रपणे सांगणारच आहोत.

राहुच्या प्रभावाचा विचार केला असता सप्तम स्थानात आलेला राहु हा कुठेतरी जोडीदाराचा ईगो वाढविण्याचं काम करतो. जोडीदाराला तुमच्यापासून लांब करतो किंवा दोघांमध्ये वितुष्ठ आणतो. सोबतच कौटुंबिक स्वास्थ्य हरवतो. कौटुंबिक शांती भंग करतो. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. संसार म्हटला म्हणजे भांड्याला भांड लागणारच असतं. मात्र कुठलाही वाद विकोपाला जाणार नाही, याची काळजी घेणं तुमच्यासाठी या काळात अत्यंत आवश्यक राहिल. जसं आपल्याला माहिती आहे की राहुला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. म्हणजे एक स्थान जिथे तो विराजमान आहे आणि तीन स्थानांवर पडणारी त्याची दृष्टी अशा एकूण चार स्थानांवर राहुच्या स्थितीचा प्रभाव पडत असतो. त्यानुसार सप्तम स्थानातील राहुची पंचम दृष्टी एकादश स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील एकादशम स्थान हे लाभ व इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर म्हणजे प्रथम स्थानावर पडणार आहे व नवम दृष्टी तृतीय म्हणजे पराक्रम, परिश्रमाच्या स्थानावर पडणार आहे. सप्तम स्थानातून इच्छापूर्तीच्या स्थानावर पडणाऱ्या राहुच्या दृष्टीमुळे तुमची इच्छापूर्ती न होऊ देणं किंवा तुमची जी इच्छा असेल ती वस्तू सोडून इतर सर्व वस्तू तुम्हाला प्राप्त करुन देणं या पद्धतीचं कार्य राहु करतो. कारण त्याची भूमिका ही मुख्यत: त्याची इच्छापूर्ती न होणं या दृष्टीने असते.

राशीवर पडणाऱ्या राहुच्या दृष्टीमुळे तुमच्या मनातील राग वाढीस लागेल. सोबतच निराशा देखील वाढू शकते. कारण तिथे केतु देखील बसलेला आहे. केतु हा ग्रह नैराश्याचा कारक आहे. एखाद्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं किंवा मनात एखादी बाब दाबून ठेवून शांत बसणं, अशी काहीशी तुमची भूमिका राहिल. या भूमिकेचा तुम्हाला बऱ्यापैकी त्रासही सहन करावा लागेल. कारण आपल्यावर जेव्हा सातत्याने, अन्याय, अत्याचार होतो किंवा त्रास होतो, नातेवाईकांकडून त्रास होतो तेव्हा माणूस मनातल्या मनात सातत्याने विचार करीतो. किंबहूना मनातून तो पूर्णपणे खचलेला असतो. तेव्हा त्याची कार्यक्षमता कुठेतरी कमी झालेली असते. हे तुमच्या बाबतीत घडू शकतं. कारण सप्तमातील राहुची दृष्टी ही तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर देखील पडणार आहे. तेथून तो तुमच्या परिश्रमामध्ये उणिव निर्माण करण्याचं काम करेल. मात्र हे जरी सर्व खरं असलं तरी त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे २९ एप्रिल रोजी शनि महाराज राशी परिवर्तन करुन तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील. तेथून त्यांची तृतीय दृष्टी राहुवर पडेल. शनि व राहु हे मित्र ग्रह आहेत. तसेच शनि महाराज तुमच्या पत्रिकेचे राजयोगकारक ग्रह आहेत. त्यामुळे राहुचे हे जे काही दुष्प्रभाव मी तुम्हाला आता सांगितले त्यांची तीव्रता कमी करण्याचं काम शनि महाराज करतील. त्यामुळे तुम्हाला फारसा त्रास या गोष्टीचा होणार नाही. #bestastrologerinmaharashtra

केतु परिवर्तनाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्या राशीत येणारा केतु तुमचं मन परिवर्तन करण्याचं काम करेल. सतत नकारात्मक विचार तुमच्या मनात भरविण्याचं काम तो करेल. जगातील सगळ्या वाईट गोष्टी केवळ माझ्या सोबतच होत आहेत, ही भावना तुमच्या मनात निर्माण होईल. ही भावना जेव्हा जेव्हा तुमच्या मनात निर्माण होईल, तेव्हासाठी मी तुम्हाला एक सूचना देत आहे कि तुम्ही अशावेळी कर्ण आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवाद आठवून घ्यावा. जो मी मागे एक दोन व्हिडिओमध्ये सांगितला देखील आहे. त्यात कर्ण म्हणतो की, “हे सर्व माझ्या सोबतच का झालं? मला जन्मत: आईने सोडून दिलं. यात माझा काय दोष?” यासह आयुष्यातील सर्व दु:खे त्याने श्रीकृष्णांसमोर मांडले. तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतात की, “तू हे अशा माणसाला सांगतोय ज्याच्या जन्मापूर्वीच ज्याला मारण्याची योजना आखली गेली होती. जन्म झाल्या बरोबर आईपासून लांब नेण्यात आलं होतं.” अशा पद्धतीने श्रीकृष्ण त्याला सर्व गोष्टी सांगून त्याचं मन शांत करण्याचा प्रयत्न करतात.

त्यानुसार ‘हे माझ्याच बाबतीत का?’ असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा खरं तर हे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नसतो. कारण त्यावेळी इतर अनेक शुभ गोष्टी फक्त तुमच्या बाबतीत घडलेल्या असतात. त्यामुळे तुळ जातकांना स्वत:च्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला विशेषत्वाने देण्यात येत आहे. राशी व लग्न स्थानात येणारा केतु हा तुम्हाला स्वत:पासून लांब नेण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या मनात निराशा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करेल. अशा विपरीत परिस्थितीत तुम्हाला स्वत:च्या इच्छाशक्तीने या सर्व गोष्टींवर मात करुन प्रगतीकडे वाटचाल करायची आहे. या कामात तुम्हाला शनि महाराज निश्चितच सहकार्य करणार आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे गुरु व शनि परितवर्तनाचेही स्वतंत्र व्हिडिओ आपण याच युट्युब चॅनलवर लवकरच देणार आहोत. म्हणून या व्हिडिओमध्ये केवळ राहु-केतु परिवर्तनाच्या प्रभावाचेच विश्लेषण देण्यात आले आहे. एकंदरीत पाहता तुळ जातकांवर नकारात्मक प्रभाव असला तरी शनि महाराजांच्या कृपेने मदतीने तुम्ही यशस्वी वाटचाल करणार आहात.

राहु-केतु परिवर्तनाचे तुळ राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *