Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – सिंह रास

राहु-केतु परिवर्तन – सिंह रास

राहु देईल संघर्ष

केतु करेल उत्कर्ष

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण सिंह राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. #astrogurudrjyotijoshi

ज्योतिषीय दृष्टिकोनातून येणारा एप्रिल हा सर्वांसाठीच विशेषत्वाने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात जवळपास सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. अशा घटना सहसा इतिहासात लवकर आढळून येत नाहीत. याला आपण युग परिवर्तन असं म्हटलं तरी अजिबात अतिशोयोक्ती ठरणार नाही. कारण हे परिवर्तन म्हणजे येणाऱ्या खूप मोठ्या बदलांची पूर्वपिठीका ठरणार आहेत. एकाच महिन्यात सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन ही खूप मोठी घटना ठरणार आहे. हा महिना म्हणजे एप्रिल महिना होय. त्यात सर्वप्रथम राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन घडून येणार आहे. राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि केतु हे दोन्हीही छाया ग्रह आहेत. म्हणजे ते एक प्रकारे बिंदू आहेत. खरं तर ते ग्रह नाहीत. तरी मनुष्य जीवनावर त्यांच्या खूप मोठा प्रभाव दिसून येतो. इतका की सर्व ग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य या दोन ग्रहांमध्ये आहे. २१ व्या शतकात राहु आणि केतु या दोघांचं विशेषत्वाने महत्त्व समोर येतं. कारण या शतकात प्रामुख्याने जी क्रांती घडून आली आहे, म्हणजे विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मीडियाची विविध माध्यमं, टेक्नॉलॉजी, टेलिकम्युनिकेश या सर्व गोष्टी राहुच्या अखत्यारीत येतात. आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं झाल्यास राहु म्हणजे अटॅचमेंट आणि केतु म्हणजे डिटॅचमेंट होय. राहु म्हणजे जी गोष्ट आपल्याला हवी आहे, ती कोणत्याही परिस्थितीत मिळवणं होय. कसंही करुन ती गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे, ही भावना म्हणजे राहु ग्रह होय. तसेच जे आहे, जसं आहे त्याला तसंच्या तसं स्विकारायचं आणि वाटचाल करत राहायची, ही भावना म्हणजे केतु होय. कारण केतु हा ग्रह मुक्ती, मोक्षाचा, विरक्तीचा कारक ग्रह मानला जातो. जातकाची आध्यात्मिक उन्नती ही केतुवरुनच बघितली जाते. त्यामुळे त्याचा प्रभाव हा राहुच्या अगदी विरुद्ध असतो. #rahuketuparivartan

एखाद्या जातकाच्या पत्रिकेत राहु सोबत शुक्र हा ग्रह असेल तर तो जातकाच्या मनात पझेसिव्हनेस निर्माण करण्याचा काम करेल. माझा जोडीदारा कसा असावा? जो किती स्मार्ट असावा? तो टापटिप असावा किंवा त्याने इतरांशी बोलावं की बोलू नये? या सर्व बाबी दर्शविणारा ग्रह म्हणजे राहु होय. तर याच्या अगदी विरुद्ध मानसिकता केतुची असते. जोडीदार गबाळ असेल तरी चालेल. कसाही असला तरी चालेल. कोणताही कलर कॉम्बिनेशन नसलेला व्यक्ती देखील एखाद्याला मनापासून आवडू शकतो. कारण अशा जातकांच्या पत्रिकेत केतु आणि शुक्राची युती असते. त्यातहून महत्त्वाची बाब म्हणजे अशा जातकांचा संसार देखील अतिशय उत्तम असतो. कारण केतु या गोष्टींना महत्त्व देत नाही. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा सिंह राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

      सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या भाग्य स्थानात राहुचं तर परिश्रमाच्या स्थानात केतुचं आगमन होणार आहे. भाग्य स्थानात येणारा राहु हा तुमच्यासाठी संघर्षाची स्थिती निर्माण करणारा राहिल. किंबहूना पायाला भिंगरी लागल्यासारखं तो तुम्हाला फिरविण्याचं काम करणार आहे. कारण राहुला भाग्य स्थान मानवत नाही. भाग्य स्थान हे त्रिकोण स्थानातील अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान मानलं जातं. तेथून जातकाचं भाग्य समृद्ध होत असतं. सिंह पत्रिकेला भाग्य स्थानात मंगळाची मेष रास येते. मंगळ हा ग्रह तुमच्या पत्रिकेचा राजयोगकारक मानला जातो. अशा या राजयोगकारक ग्रहाच्या राशीत येणारा राहु ‘मोठ्या संघर्षाचा सामना करा’ असं तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात राहुचं हे परिवर्तन सिंह जातकांसाठी संघर्ष निर्माण करणारं राहिल.

राहुला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. त्या दृष्टींचाही खूप मोठा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे राहुच्या प्रभावांचा विचार करीत असतांना त्याच्या दृष्ट्यांचाही विचार करणे आवश्यक ठरते. राहुची पंचम दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. जी तुम्हाला अनेक वेळा विपरीत बुद्धी देईल. कुठेतरी अहंकार वाढवायला लावेल. कुठेतरी राग वाढेल. संतापात वाढ होईल. त्यामुळे या दृष्टीने तुम्हाला योग्य ती काळजी घ्यायला हवी. यानंतर राहुची सप्तम दृष्टी तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर पडेल. या स्थानावरुन भावंडांचं सौख्य बघितलं जातं. या स्थानावर पडणारी राहुची दृष्टी तुमच्या भावंडांसोबत मतभेद निर्माण करण्याचं काम करेल. त्यामुळे भावंडांसोबत कुठल्याही गोष्टीवरुन वाद होणार नाही किंवा झालाच तर तो वाढणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. यानंतर राहुची नवम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडणार आहे. जी तुमच्या संतती सौख्यात उणिव निर्माण करण्याचं काम करेल.

थोडक्यात अशा प्रकारे सिंह राशीसाठी राहुच्या गोचरचे परिणाम त्यातही मुख्यत: अशुभ परिणाम सांगता येतील. अर्थात, हे अशुभ परिणाम असले तरी यावेळी एक बाब घडते. ती म्हणजे राहु जेव्हा अशुभ होतो तेव्हाच दुसऱ्या टोकाला असणारा केतु शुभ फळ देणारा ठरतो. कारण ते दोघं एकमेकांच्या १८० अंशातून भ्रमण करतात. एका वेळी एका ग्रहाचा त्रास असतो तर दुसऱ्याकडून शुभ प्रभाव प्राप्त होतात. तुमच्या तृतीय या उपचय स्थानात जाणारा केतु तुमच्या आयुष्यातील संघर्ष आणि परिश्रम कमी करुन लाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण करणार आहे. केतु ज्या स्थानात जातो, त्या स्थानाची तो हानी करीत असतो. तृतीय हे स्थान परिश्रमाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे साहजिकच तुमच्या परिश्रमात, पराक्रमात उणिव निर्माण होईल. भावंडांशी मतभेदही निर्माण होऊ शकतात. तरी देखील तृतीय स्थानातील केतु हा त्यातल्या त्यात शुभ म्हणता येईल.

      भाग्य स्थानातील राहु हा मंगळाच्या राशीत आलेला आहे. मंगळ हा ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राहुचे गत तीन वर्षांपासून जो भ्रम उभा केलेला आहे, त्या भ्रमाला छेद देण्याचं कार्य सेनापती मंगळ करेल. राहु जेव्हा मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा तो कृतिका नक्षत्रात असेल. त्यामुळे त्याचा प्रभाव तीव्र राहिल. मात्र तो जेव्हा भरणी नक्षत्रात जाईल म्हणजे ३ अंश २० कला पार केल्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल. कारण राहु सर्वप्रथम कृतिका नक्षत्रात असेल. त्यानंतर तो भरणी नक्षत्रात जाईल आणि त्यानंतर तो अश्विनी नक्षत्रात प्रवेश करेल. चौथ्या चरणातून तो तिसऱ्या चरणात येतो. तिसऱ्यातून दुसऱ्या आणि दुसऱ्यातून प्रथम चरणात येतो. कारण राहु हा कायम स्वरुपी वक्री अवस्थेत भ्रमण करणारा ग्रह आहे. #astroguruma

राहुच्या या गोचरचा सिंह जातकांवर पुढील दीड वर्ष प्रभाव होणार आहे. शुभ आणि अशुभ प्रभावांची एकंदरीत जर आपण तुलना केली तर कुठेतरी अशुभता जास्त, संघर्ष जास्त, भाग्यात थोडीशी उणिव अशा अनेक गोष्टींचा सामना सिंह जातकांना या कालखंडात करावा लागणार आहे. मात्र हा सामना केल्यानंतर यशाच्या संधी देखील वाढणार आहेत. कारण एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. विशेषत: राहुचा मित्र शनि हा सिंह जातकांसाठी सप्तम स्थानात शश योगाची निर्मिती करणार आहे. हा अत्यंत शुभ असा राजयोग असल्यामुळे साहजिकच त्याचे अत्यंत शुभ परिणाम सिंह जातकांना प्राप्त होणार आहेत. विशेषत: शनि आणि राहु यांच्यात लाभ योग निर्माण होणार आहे. हा योग तुम्हाला कौटुंबिक, आर्थिक लाभ प्राप्त करुन देण्याचं काम करेल. किंबहूना या काळात तुम्हाला प्रवासातूनही लाभ होईल. खूप लांबचे प्रवास तुम्हाला करावे लागण्याची शक्यता येथे नाकारता येणार नाही. सोबतच या काळात तुमच्या हातून एखादं धार्मिक कार्य होण्याची देखील शक्यता आहे. तुम्ही ते केलंही पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही धार्मिक कार्य कराल तेव्हा बरेचशे अशुभ परिणाम कमी होऊन शुभता वृद्धींगत नक्कीच होईल.

सोबतीला या काळात तुमच्या घरात असंतोष वाढण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. मात्र या सगळ्या स्थितीमध्ये उपाय म्हणून राहुचं दान किंवा भगवान शंकराचं नामस्मरण या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यांचा तुम्हाला फार मोठा लाभ होऊ शकतो. राहुच्या नकारात्मक बाजुवर विजय मिळविण्याचं सामर्थ्य यातून तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. म्हणून हे उपाय तुम्ही अवश्य करायला हवेत. परदेशात स्थाईक असलेल्या सिंह जातकांच्या दृष्टीने सांगायचं झाल्यास त्यांच्या कर्तृत्वात भर पडणार आहे. राहुचं हे गोचर त्यांना घरापासून विस्थापित करण्याचं कार्य देखील करु शकतं. तुम्ही घरापासून दूर जाल. आपल्या माणसांपासून दूर जाल. या पद्धतीने देखील एक प्रभाव तुमच्यावर पडू शकतो. #astroguruma

राहु-केतु परिवर्तनाचे सिंह राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु! 

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *