Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – मीन रास

राहु-केतु परिवर्तन – मीन रास

परिश्रमाची जोड द्या कर्माला

आरोग्यासह सांभाळा परिवाराला

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण राशीचक्रातील शेवटच्या मीन राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. #astroguru

राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत राहु सोबत शुक्र हा ग्रह असेल तर तो जातकाच्या मनात पझेसिव्हनेस निर्माण करण्याचा काम करेल. माझा जोडीदारा कसा असावा? जो किती स्मार्ट असावा? तो टापटिप असावा किंवा त्याने इतरांशी बोलावं की बोलू नये? या सर्व बाबी दर्शविणारा ग्रह म्हणजे राहु होय. तर याच्या अगदी विरुद्ध मानसिकता केतुची असते. जोडीदार गबाळ असेल तरी चालेल. कसाही असला तरी चालेल. कोणताही कलर कॉम्बिनेशन नसलेला व्यक्ती देखील एखाद्याला मनापासून आवडू शकतो. कारण अशा जातकांच्या पत्रिकेत केतु आणि शुक्राची युती असते. त्यातहून महत्त्वाची बाब म्हणजे अशा जातकांचा संसार देखील अतिशय उत्तम असतो. कारण केतु या गोष्टींना महत्त्व देत नाही.

थोडक्यात राहु आणि केतु या दोन्ही ग्रह एकमेकांशी संबंधित असले तरी ते दोन्ही भिन्न टोकांना असतात. त्यामुळे त्यांचे प्रभावही एकमेकांच्या विरुद्ध असतात. राहुला आपण काळ पुरुषाचं दु:ख म्हणू शकतो. तो छाया ग्रह आहे. सूड घेण्याची प्रवृत्ती त्याच्यात आहे. दारुसह इतरही वाईट प्रवृत्तीचा कारक म्हणूनही त्याला ओळखलं जातं. घात, चोरी, अपघात, दरोडा, माणसाला विस्थापित करणं हे सर्व कारकत्व मानलं जातं. मात्र यामुळे राहु पूर्णपण वाईट होत नाही. त्याच्याकडे काही चांगल्या बाबी देखील येतात. राहु म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पाहिजे ते परिश्रम करुन ती गोष्ट साध्य करणं होय. पटकन, झटकन काही तरी मिळविणं, भौतिक सुखाचा पुरेपुर उपभोग घेणं म्हणजे राहु होय. म्हणूनच आजच्या २१ व्या शतकात, आजच्या आधुनिक युगात राहुचं महत्त्व जास्त आहे. #rahuketuparivartan

केतु हा ग्रह याच्या अगदी विरुद्ध प्रभाव दर्शवितो. तो मुक्तीचा, मोक्षाचा कारक ग्रह आहे. माणसाला आध्यात्म्याच्या मार्गावर नेण्याचं कार्य केतु करीत असतो. एखाद्या जातकाच्या कुंडलीतील केतु प्रबळ असेल तर तो जातक संसारापासून, जीवनातील सर्व मोहांपासून लांब जातो. सर्वांपासून तो अलिप्त होतो. आध्यात्म्याच्या कारक ग्रह खरं तर तीन आहे. शनि, गुरु आणि केतु हे तीन ग्रह होय. मात्र या तिघांच्या कारकत्वात एक मुलभूत फरक आढळून येतो. तो म्हणजे शनि महाराज जातकाला सांगतात कि, नीतीने, न्यायाने वागा आणि मोक्षाकडे जा. गुरु महाराज जातकाला सांगतात की आधी सर्व कर्म, सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि मोक्षाकडे चला. तर केतु जातकाला सांगतो की सर्व काही सोडून द्या आणि मोक्षाकडे चला. अर्थात, केतु हा ग्रह कुठेतरी जबाबदारी नाकारणारा ग्रह आहे, असं आपण म्हणू शकतो. त्याचा प्रभाव भयंकर असतो. तो पत्रिकेत ज्या स्थानात बसतो त्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचं काम करतो. ज्या ग्रहासोबत तो बसलेला असतो त्याचं कारकत्व खराब करण्याचं काम तो करीत असतो. तसेच ज्या स्थानावर त्याची दृष्टी असते त्या नात्यात तो दरी निर्माण करतो. मनुष्याला विरक्ती येते ती केतु या ग्रहामुळेच येते. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा मीन राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

      मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कुटुंब स्थानात राहुचं तर अष्टम स्थानात केतुचं आगमन होणार आहे. या स्थानांचा विचार केला असता राहु-केतुचं होणारं हे राशी परिवर्तन मीन राशीसाठी अत्यंत त्रासादयक ठरणार आहे, असं आपण म्हणू शकतो. कारण मागील काळात राहु तुमच्या तृतीय स्थानातून प्रवास करीत होता की जे स्थान त्याला मानवत होतं. आपण या आधीही बघितलं आहे की पत्रिकेतील उपचय स्थानं राहुला विशेषत्वाने मानवतात. तृतीय स्थानाला देखील उपचय स्थान म्हटलं जातं. त्यामुळे मागील काळात राहु तुमच्या राशीसाठी शुभ होता, असं आपण म्हणू शकतो. मात्र आता त्याचे आगमन तुमच्या कुटुंब स्थानात होणार आहे. तिथे मंगळाची मेष रास येते. मंगळ आणि राहु या दोन ग्रहांमध्ये नैसर्गिक शत्रुत्वाचं नातं आहे. त्याचा परिणाम म्हणजे कुटुंबाद वाद निर्माण होणं, कौटुंबिक ऐक्य, सुखशांती भंग पावणं सारखा प्रभाव राहु तुम्हाला देईल.

मीन जातकांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मागील तीन वर्षात त्यांनी कितीही संघर्ष केलेला असला तरी प्रत्येक वेळी कौटुंबिक ऐक्य टिकून होतं. जी अत्यंत महत्त्वाची बाब होती. कारण कुटुंबात सुखशांती असेल, कौटुंबाचं योग्य ते सहकार्य असेल तर व्यक्ती बाहेरील कुठल्याही आघाडीवर विजय प्राप्त करु शकतो. मीन जातकांचा मूळ स्वभाव लक्षात घेतला असता कौटुंबिक सुखशांती तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असते. जी तुम्हाला आतापर्यंत प्राप्त झाली आहे. म्हणूनच मागील काळात तुम्ही यशस्वीरीत्या संघर्षाचा सामना केला आहे. मात्र आता परिस्थिती बदलणार आहे. कारण तुमच्या कुटुंब स्थानात राहुचं आगमन होणार आहे. येथे येणारा राहु सर्वप्रथम तुमच्या कौटुंबिक ऐक्याला तडा देणार आहे. कौटुंबिक सुखशांती भंग करणार आहे. ज्याचा कुठेतरी त्रास तुम्हाला नक्कीच होईल. त्यामुळे याकाळात आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणं, कौटुंबिक ऐक्य, सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं ही तुमची पहिली गरज असायला हवी, अशी सूचना तुम्हाला देण्यात येत आहे. कारण तेच तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे. #drjyotijoshi

राहुच्या स्थानाबरोबरच त्याच्या दृष्टीचाही खूप मोठा प्रभाव मनुष्य जीवनावर होत असतो. राहुला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. त्यानुसार कुटुंब स्थानातील राहुची पंचम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. पत्रिकेतील षष्ठ स्थान हे आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रु यांचं स्थान मानलं जातं. या स्थानावर पडणाऱ्या राहुच्या दृष्टीमुळे तुमचं आरोग्य खालविण्याची बऱ्यापैकी शक्यता येथे निर्माण होत आहे. त्यामुळे या काळात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे, तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान धारणा यांची सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे. मागील काही महिन्यांपासून मासिक राशी भविष्यामध्ये देखील मी तुम्हाला याविषयी वारंवार सूचना केल्या आहे. त्यामुळे ज्यांनी या गोष्टींची सवय लावून घेतली असेल त्यांना त्याचा विशेष लाभ होईल. मात्र ज्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिलेलं नाही, त्यांच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच सावधा व्हा आणि या गोष्टींची सवय लावून घ्या. कारण त्याच तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. षष्ठ स्थानावर पडणाऱ्या राहुच्या दृष्टीचा अजून मोठा प्रभाव म्हणजे तुमच्या शत्रुंमध्ये देखील वाढ होऊ शकते. ते तुम्हाला त्रास देण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार आहेत. सोबतच जे मीन जातक नोकरी करीत आहेत त्यांना देखील विविध प्रश्नांचा, संघर्षाचा सामना करावा लागेल. सोबत काम करणाऱ्या सहकार्‍यांकडून विनाकारण त्रास दिला जाणं, वरिष्ठ तुमच्यावर नाराज असणं अशा परिस्थितीचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीनेही तुम्हाला अत्यंत सजग राहावे लागणार आहे.

यानंतर राहुची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील अष्टम स्थान हे आयुष्य देणारं स्थान मानलं जातं. तसेच जीवनातील अडथळे, अडचणी, संघर्ष व सासरची स्थिती देखील याच स्थानावरुन बघितली जाते. या स्थानावर पडणाऱ्या राहुच्या दृष्टीचा परिणाम म्हणजे सासुरवाडीमध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होणं. ज्यामुळे जोडीदार देखील तुमच्यावर नाराज असणं, यासारखा प्रभाव त्याच्यातून घडून येईल. थोडक्यात कौटुंबिक ऐक्य सांभाळणं या काळात तुमच्यासाठी निश्चितच कठिण होणार आहे. यानंतर राहुची नवम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावर पडणारी राहुची दृष्टी तुम्हाला कुठेतरी कर्मापासून लांब लोटण्याचा प्रयत्न करेल. एखादं काम करण्यापेक्षा त्याला टाळण्याची वृत्ती तुमच्यात विकसित होईल. नवनिर्मितीयुक्त काम करण्यापेक्षा रिकाम्या गोष्टींमध्ये किंवा अनावश्यक वादविवाद करण्यामध्ये तुम्हाला जास्त आनंद वाटेल आणि त्यात तुम्ही तुमचा महत्त्वपूर्ण वेळ वाया घालवाल. म्हणून या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं. आपलं संपूर्ण लक्ष नवनिर्मितीक्षम कार्य करण्याकडे द्यायलं हवं. हाती घेतलेलं काम वेळेच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि काहीही करुन आपला महत्त्वपूर्ण वेळ वाया जाणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी. ते तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहणार आहे. #drjyotijoshi

या सर्व काळामध्ये तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे १२ एप्रिल रोजी राहु-केतुचं परिवर्तन होत आहे आणि लगेचच १३ एप्रिल रोजी तुमचे राशी स्वामी गुरु महाराज तुमच्या राशीतच प्रवेश करणार आहेत. जी तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक स्थिती असेल. गुरु महाराज तुमच्या राशीत येऊन पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेल्या हंस योगाची निर्मिती करणार आहेत. ज्याची अत्यंत शुभ फळं तुम्हाला निश्चितच प्राप्त होतील. त्या प्रभावाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे करणारच आहोत. मात्र आता लक्षात घ्यायची बाब म्हणजे राशी स्वामी बळकट होणार असल्यामुळे इतर ग्रहांचा कितीही अशुभ प्रभाव असला तरी त्यातून सुखरुपपणे तुम्ही बाहेर पडणार आहात. ती क्षमता तुमच्यात राशी स्वामी निर्माण करणार आहे. किंबहूना जेव्हा तुमच्या राशीत हंस योगासारखा अत्यंत शुभ असलेला राजयोग निर्माण होतोय तेव्हा या काळात तुमची भरभरुन प्रगती होईल. तुम्हाला त्रास देणं हे राहुचं कार्यच आहे. त्यानुसार तो तुम्हाला त्रास देईलच. मात्र तुमचा राशी स्वामी तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे राहुच्या अशुभ फळांची किंवा संघर्षाची तुम्ही अधिक चिंता करु नका. त्या संघर्षाचा सामना करण्याचं सामर्थ्य तुम्हाला राशी स्वामी प्रदान करणार आहे.

केतु परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता अष्टमातील केतु देखील तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जाण्यासाठी भाग पाडणार आहे. विशेषत: सासरकडील मंडळी तुमच्या बाबतीत अनेक गैरसमज करुन घेतील. त्यांच्या मनात तुमच्या बद्दल नकारात्मक भाव तयार होतील. साहजिक त्याचा प्रभाव तुमच्या कुटुंबावर पडेल. एकंदरीत राहु आणि केतुचं हे गोचर मीन जातकांसाठी बऱ्यापैकी त्रासदायक ठरणार आहे. मात्र याच काळात होणारं गुरु महाराजांचं गोचर तुमच्यासाठी शुभदायक असल्यामुळे तुम्ही सर्व संकटातून मार्ग काढून प्रगतीकडे वाटचाल करणार आहात.

राहु-केतु परिवर्तनाचे मीन राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील नवीन व उपयुक्त माहितीसह पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *