Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – मकर रास

राहु-केतु परिवर्तन – मकर रास

लक्ष ठेवा कर्मावर

मात कराल संघर्षावर

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत.

राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत लग्न स्थानात किंवा चंद्राच्या सोबतीला राहु ग्रह विराजमान असेल किंवा राशि स्वामी सोबत राहु ग्रह विराजमान असेल तर अशा जातकाला जगातील प्रत्येक गोष्ट हवी असते. प्रत्येक ठिकाणी यश मिळविणं, सतत धडपड करणं, त्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरणं, काहीही करुन हवी असलेली गोष्ट आपल्याला मिळायलाच हवी, त्यासाठी वाटेल तेवढे परिश्रम करण्याची तयारी राहु त्या जातकाला प्रदान करतो. याच्या अगदी विरुद्ध स्थिती केतु सोबत असते. म्हणजे केतु ग्रह जर लग्न स्थानात असेल, राशी स्वामी सोबत असेल तर तो कुठेतरी निराशा देतो. विषयाकडे सोडून देणे, जास्तीचे परिश्रम न करणे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी काहीशी भूमिका अशा जातकांची असते. हा मुलभूत विरोधाभास राहु आणि केतु या दोन ग्रहांच्या प्रभावांमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. #drjyotijoshi

राहु म्हणजे भौतिकता तर केतु म्हणजे आध्यात्मिकता होय. म्हणजे राहु हा ग्रह भौतिक सुखाचा कारक मानला जातो. तर केतु हा ग्रह आध्यात्म, विरक्ती, मोक्षाचा कारक ग्रह मानला जातो. आजचं जग हे भौतिक सुखांनी वेढलेलं आहे. त्या सर्व राहुच्या अखत्यारीत येतात. गाडी, बंगला, पैसा, लॉटरी, जुगार या सर्व गोष्टी राहुवरुन पाहिल्या जातात. इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापार, परदेशगमन या गोष्टीचं स्थायी कारकत्व राहुकडे आहे. म्हणजे एखाद्या पत्रिकेत राहु बिघडलेला आहे. त्याची महादशा सुरु आहे. अशी पत्रिका जर आमच्याकडे आली तर त्यावर उपाय म्हणून आम्ही सांगत असतो, या जातकाला तुम्ही लवकरात लवकर परदेशात पाठवा. जेणे करुन इतर दुष्प्रभाव कमी होतील आणि जातकाची प्रगती होऊ शकेल.

आजच्या जगात जातकाला जे जे हवं आहे, ते ते सर्व देण्याची प्रवृत्ती राहु ग्रहाकडे आहे. केतुच्या बाबतीत सांगायचं झाल्यास याच्या अगदी विरुद्ध ज्या गोष्टी येतात त्या सर्व केतुच्या अखत्यारीत येतात, असं म्हटलं जाऊ शकतं. केतु हा ग्रह आध्यात्मिक प्रवृत्तीचा ग्रह आहे. जातकाची आध्यात्मिक उन्नती ही केतुवरुन बघितली जाते. त्याला मोक्षाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळेच राहुच्या इतकाच तोही महत्त्वपूर्ण ठरतो. कारण जीवनाचं अंतिम ध्येय हे केवळ मोक्षचं असतं. माणसाला आध्यात्म्याच्या मार्गावर नेण्याचं कार्य केतु करीत असतो. एखाद्या जातकाच्या कुंडलीतील केतु प्रबळ असेल तर तो जातक संसारापासून, जीवनातील सर्व मोहांपासून लांब जातो. सर्वांपासून तो अलिप्त होतो. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा मकर राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात राहुचं आणि दशम स्थानात केतुचं आगमन होणार आहे. मूळातच या गोचरला परस्पर विरुद्ध स्थिती आपण म्हणू शकतो. कारण पत्रिकेतील दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. अशा कर्म स्थानात आलेला आध्यात्म्याचा कारक ग्रह केतुचं आपण होणार आहे. अर्थात जिथे कर्म प्रधान ग्रह आला पाहिजे तिथे आध्यात्म कारक ग्रह येणार आहे. या स्थितीचा प्रभाव म्हणजे कर्म प्रधान मानल्या जाणाऱ्या मकर राशीच्या कर्मात न्यूनता येईल. साहजिकच त्याचा अत्यंत नकारात्मक परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. याशिवाय चतुर्थ स्थानात येणारा राहु तुमच्या घरातील शांतता भंग करण्याचं काम करेल. कारण राहु म्हणजे अ‍ॅटचमेंट असं म्हणता येईल. राहुला प्रत्येक गोष्ट हवी असते. तो पत्रिकेत ज्या स्थानात विराजमान असतो, त्या स्थानाच्या कारकत्वाचा नाश करतो. तसेच ज्या स्थनावर तो दृष्टी टाकेल तिथे देखील नकारात्मक परिणाम देईल. त्यात आता तर तो मंगळाच्या म्हणजे शत्रु ग्रहाच्या राशीत प्रवेश करणार आहे. तसंही चतुर्थातील राहु हा अशुभच मानला जातो. त्यामुळे अशा राहुपासून तुम्ही चांगल्या फळांची अपेक्षा करु शकत नाही. किंबहूना चतुर्थ स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या गोष्टींची काळजी घेणं, ही या काळतील तुमची प्राथम गरज असायला हवी, असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. #bestastrologerinmaharashtra

      राहुच्या स्थानासह त्याची दृष्टी देखील खूप मोठा परिणाम करीत असते. राहुला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. म्हणजे एकाच वेळी तो पत्रिकेतील चार स्थानांवर आपला प्रभाव टाकत असतो. त्यानुसार चतुर्थातील राहुची पंचम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडणार आहे. यानंतर सप्तम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर आणि नवम दृष्टी तुमच्या व्यय स्थानावर पडणार आहे. या दृष्टीतून एक नकारात्मक स्थिती समोर येणार आहे. थोडक्यात राहुच्या या गोचरचा तुम्हाला नकारात्मक परिणाम प्राप्त होणार आहेत. अर्थात निसर्ग जेव्हा एकीकडे नकारात्मक प्रभाव निर्माण करतो तेव्हा दुसरीकडे काही सकारात्मक प्रभाव देखील निर्माण करीत असतो. कारण संतुलन बनवून ठेवणं, योग्य तो समतोल राखणं हे निसर्गाचं मुख्य कारकत्व आहे, असं आपण म्हणू शकतो. त्यानुसार राहुचे काही शुभ परिणाम देखील तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. त्याकामी तुम्हाला शनि महाराज मदत करणार आहेत.

शनि महाराज हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत. ते आता तुमच्या राशीतच विराजमान आहेत. मात्र एप्रिल महिन्यात तेही राशी परिवर्तन करुन तुमच्या धन स्थानात प्रवेश करतील. तेथून त्यांची तृतीय दृष्टी चतुर्थातील राहुवर पडेल. स्वराशीच्या शनि महाराजांची दृष्टी ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. तसेही शनि आणि राहु हे मित्र ग्रह आहेत. सोबतच ते पत्रिकेत लाभ योग देखील बनविणार आहेत. त्यामुळे राहुच्या अशुभ प्रभावांची तीव्रता कमी करण्याचं काम ते करणार आहेत. म्हणजे नकारात्मक प्रभाव देत असतांना कुठेतरी शुभ प्रभाव देखील द्यायला राहु बाध्य होणार आहे. राहुची पंचम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडणार आहे. या दृष्टीचा शुभ प्रभाव म्हणजे अचानक धनलाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. यानंतर राहुची सप्तम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर म्हणजे कर्म स्थानावर पडणार आहे. या दृष्टीचा शुभ प्रभाव म्हणजे व्यवसायात किंवा कर्मात वृद्धी करण्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम कराल. मूळात मकर जातकांचा तो मूळ स्वभाव देखील आहे. त्यामुळे या काळात तो स्वभाव अधिक समृद्ध होणार आहे. यानंतर राहुची नवम दृष्टी तुमच्या व्यय स्थानावर पडणार आहे. या दृष्टीमुळे तुमचे एकीकडे सातत्याने प्रवास वाढतील व त्यामुळे दुसरीकडे खर्च देखील वाढणार आहेत. व्यवसाय वृद्धीसाठी तुम्ही खूप जास्त परिश्रम कराल. मात्र तुमच्या घरातील सुखशांती भंग पावेल. एकंदरीत राहुच्या तीनही दृष्टींचे शुभ आणि अशुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील.

एप्रिल महिन्यात राहु-केतुसह सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यानुसार मकर राशीचे तृतीयेश गुरु महाराज तृतीयात, राशी स्वामी व द्वितीयेश असलेले शनि महाराज द्वितीय स्थानात येणार असल्यामुळे त्यांचेही शुभ प्रभाव तुमच्यावर निश्चित स्वरुपात पडतील. त्यांच्याही प्रभावांचे आपण राशीनुसार स्वतंत्र व्हिडिओ करीत आहोत. लवकर तेही तुम्हाला दिले जातील. या व्हिडिओमध्ये आपण फक्त राहु आणि केतु परितर्वनाचं विश्लेषण करीत आहोत. त्यानुसार तुमच्या पत्रिकेत राहु हा नकारात्मक स्थितीत असणार आहे. मात्र एक राहु संपूर्ण पत्रिका किंवा संपूर्ण भविष्य ठरवित नाही. राहुसह पत्रिकेत इतर ग्रह देखील असतात. त्यामुळे राहुचं हे गोचर तुमच्यासाठी जरी शुभदायक नसलं तरी इतर जे ग्रह आहेत ते सर्व महत्त्वपूर्ण आहेत. त्यांचेही गोचर अत्यंत महत्त्वाचे आहेत. विशेषत: तुमचा राशी स्वामी प्रबळ असणार आहे. कारण तो आपल्या मूळ त्रिकोण राशीत जाणार असल्यामुळे त्याचं सहकार्य बऱ्यापैकी वाढणार आहे. तसेच राशी स्वामीची राहुवर पडणारी दृष्टी ही राहुला फारसं नुकसान करु देणार नाही. तरीही सावधनता म्हणून या काळात तुम्हाला आपल्या आईच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. घरातील शांतता भंग पावू शकते. त्याबाबतीतही तुम्हाला जागरुक राहावं लागणार आहे. #rahuketuparivartan

विशेष म्हणजे या काळात वास्तु किंवा वाहन घेण्यासारखे विषय तुम्ही टाळायला हवेत. कारण राहु जेव्हा चतुर्थ स्थानातून गोचर करतो तेव्हा वास्तुयोग किंवा वाहन योग फारसे निर्माण होत नाही. तसेच घेतलेल्या वास्तुतून नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. म्हणजे वास्तु घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही आपल्याला महाग पडली आहे. जागा चुकली आहे. या फारशा सोयी सुविधा नाहीत किंवा यासारख्या अनेक बाबी पुढे येतील. एक मात्र नक्की की त्या वास्तुतून तुम्हाला समाधान प्राप्त होणार नाही. कारण चतुर्थ स्थानातील राहु हा कधीही सुख, समाधान लाभू देत नाही. त्यामुळे शक्यतोवर या काळात मकर जातकांनी वास्तु किंवा वाहन घेऊ नये. ते तुमच्यासाठी लाभदायक राहणार नाही. तशाही या गोष्टी काही आपण रोज घेत नाही. त्यामुळे थोडी प्रतिक्षा करा. शुभ काळाची वाट बघा आणि मगच या गोष्टींची खरेदी करा. जेणे करुन त्यातून तुम्हाला लाभासह सुखशांती, समाधान देखील प्राप्त होऊ शकेल.

अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या काळात व्यावसायिक मकर जातकांनी विशेषत्वाने एक बाब लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे अनेक वेळा तुम्हाला व्यवसायातून निवृत्त होण्याची भावना तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. अर्थात हे दशम स्थानात विराजमान केतुमुळे होईल. त्यामुळे ठामपणे व्यवसायात कार्यरत राहणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण आता घेतलेला निर्णय पुढे तुमच्यावर पश्चातापाची वेळ देखील आणू शकतो. केतु त्याचं कार्य नक्कीच करेल. तुमच्या मनात नकारात्मकता भरविण्याचं काम तो प्रामुख्याने करेल. ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित करायला हवं. तेच तुमच्यासाठी लाभदायक देखील राहिल.

राहु-केतु परिवर्तनाचे मकर राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *