Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – कन्या राशी

राहु-केतु परिवर्तन – कन्या राशी

राहु-केतु देतील संघर्ष

तरी होईल मोठा उत्कर्ष

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. #astroguruma

राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत लग्न स्थानात किंवा चंद्राच्या सोबतीला राहु ग्रह विराजमान असेल किंवा राशि स्वामी सोबत राहु ग्रह विराजमान असेल तर अशा जातकाला जगातील प्रत्येक गोष्ट हवी असते. प्रत्येक ठिकाणी यश मिळविणं, सतत धडपड करणं, त्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरणं, काहीही करुन हवी असलेली गोष्ट आपल्याला मिळायलाच हवी, त्यासाठी वाटेल तेवढे परिश्रम करण्याची तयारी राहु त्या जातकाला प्रदान करतो. याच्या अगदी विरुद्ध स्थिती केतु सोबत असते. म्हणजे केतु ग्रह जर लग्न स्थानात असेल, राशी स्वामी सोबत असेल तर तो कुठेतरी निराशा देतो. विषयाकडे सोडून देणे, जास्तीचे परिश्रम न करणे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी काहीशी भूमिका अशा जातकांची असते. हा मुलभूत विरोधाभास राहु आणि केतु या दोन ग्रहांच्या प्रभावांमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. #rahuketuparivartan

राहु म्हणजे भौतिकता तर केतु म्हणजे आध्यात्मिकता होय. म्हणजे राहु हा ग्रह भौतिक सुखाचा कारक मानला जातो. तर केतु हा ग्रह आध्यात्म, विरक्ती, मोक्षाचा कारक ग्रह मानला जातो. आजचं जग हे भौतिक सुखांनी वेढलेलं आहे. त्या सर्व राहुच्या अखत्यारीत येतात. गाडी, बंगला, पैसा, लॉटरी, जुगार या सर्व गोष्टी राहुवरुन पाहिल्या जातात. इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापार, परदेशगमन या गोष्टीचं स्थायी कारकत्व राहुकडे आहे. म्हणजे एखाद्या पत्रिकेत राहु बिघडलेला आहे. त्याची महादशा सुरु आहे. अशी पत्रिका जर आमच्याकडे आली तर त्यावर उपाय म्हणून आम्ही सांगत असतो, या जातकाला तुम्ही लवकरात लवकर परदेशात पाठवा. जेणे करुन इतर दुष्प्रभाव कमी होतील आणि जातकाची प्रगती होऊ शकेल.

आजच्या जगात जातकाला जे जे हवं आहे, ते ते सर्व देण्याची प्रवृत्ती राहु ग्रहाकडे आहे. केतुच्या बाबतीत सांगायचं झाल्यास याच्या अगदी विरुद्ध ज्या गोष्टी येतात त्या सर्व केतुच्या अखत्यारीत येतात, असं म्हटलं जाऊ शकतं. केतु हा ग्रह आध्यात्मिक प्रवृत्तीचा ग्रह आहे. जातकाची आध्यात्मिक उन्नती ही केतुवरुन बघितली जाते. त्याला मोक्षाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळेच राहुच्या इतकाच तोही महत्त्वपूर्ण ठरतो. कारण जीवनाचं अंतिम ध्येय हे केवळ मोक्षचं असतं. माणसाला आध्यात्म्याच्या मार्गावर नेण्याचं कार्य केतु करीत असतो. एखाद्या जातकाच्या कुंडलीतील केतु प्रबळ असेल तर तो जातक संसारापासून, जीवनातील सर्व मोहांपासून लांब जातो. सर्वांपासून तो अलिप्त होतो. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा कन्या राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

      कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गेल्या दीड वर्षापासून कन्या जातक स्वत:च्या भाग्याशी संघर्ष करीत होते. कारण तुमच्या भाग्य स्थानात राहु ग्रह विराजमान होता. राहुला पत्रिकेतील भाग्य स्थान फारसं मानवत नाही. तरी देखील तिथे त्याच्या मित्राची म्हणजे शुक्राची वृषभ रास असल्यामुळे कन्या जातकांना फारसा त्रास झाला नाही. मात्र फारसं सौख्य देखील त्यापासून लाभलं नाही. आता राहु तुमच्या अष्टम स्थानात म्हणजे मेष राशीत प्रवेश करेल. त्याच्या राशी परिवर्तनाने भाग्यातील अडथळे जरी कमी होणार असले तरी अष्टमातील राहु विविध संघर्ष कन्या जातकांसाठी निर्माण करणार आहे. मुख्य म्हणजे कुटुंबापासून दूर जाणं. भरपूर प्रवास करावा लागणं. कुठल्या तरी कारणाने एकटं पडणं. या सारख्या गोष्टी येथे घडून येणार आहेत. कारण तुमच्या अष्टम स्थानात मंगळाची मेष रास येते. मंगळ आणि राहु यांच्या नैसगिर्क शत्रुत्वाचं नातं आहे. त्यामुळे या सर्व बाबतीत तुम्हाला स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे. #astroguruma

जसं आपल्याला माहिती आहेच की राहुला पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. अष्टम स्थानातून त्याची पंचम दृष्टी व्यय स्थानावर, सप्तम दृष्टी कुटुंब स्थानावर आणि नवम दृष्टी चतुर्थ स्थानावर पडणार आहे. ज्याचा परिणाम म्हणजे कौटुंबिक सौख्यात उणिव तयार होणं, घरात विसंवाद निर्माण होणं, आपल्या माणसांशी दुरावा निर्माण होणं, एकटेपण जाणवणं, परदेशात किंवा घरापासून अत्यंत लांब जाण्याची वेळ येणं. असे अनेक प्रभाव या राहुच्या दृष्टीने दिसून येतील. परदेशात जाण्याची वेळ येणं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याकडे एक काळ असाही होता, की परदेशगमन ही बाब तेव्हा अत्यंत वाईट समजली जायची. आपल्या माणासांपासून दुर जाणं ही खूप मोठी शिक्षा समजली जायची. मात्र आज काळ बदलला आहे. आज परदेशगमन ही बाब अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. त्यानुसार आपण त्या गोष्टीला शुभ फळ देखील म्हणू शकतो. त्यामुळे जे कन्या जातक परदेशात जाण्यासाठी इच्छूक असतील त्यांनी या काळात त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवायला हवेत. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल.

अष्टम स्थानातील राहुची अजून एक शुभ बाब निश्चितपणे सांगता येईल. ती म्हणजे जे कन्या जातक संशोधनात्मक कार्य करीत आहेत किंवा संशोधनात्मक शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक राहिल. अष्टमातील राहु त्यांना संशोधनात्मक कार्यात सर्वोतोपरी मदत करणार आहे. कारण १२ एप्रिल रोजी राहु तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करेल आणि १३ एप्रिल रोजी गुरु महाराज तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील. तिथे ते हंस या अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती करतील. जो कन्या जातकांसाठी अत्यंत शुभ व लाभदायक ठरेल. याशिवाय २९ एप्रिल रोजी शनि महाराज तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करतील. षष्ठ हे उपचय स्थान असल्यामुळे ते शनि महाराजांना विशेषत्वाने मानवतं. त्यामुळे त्यापासूनही तुम्हाला अत्यंत शुभ फळे प्राप्त होतील. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे तेथून शनि महाराजांची दृष्टी अष्टमातील राहुवर असणार आहे. शनि आणि राहु यांच्यात मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे एका मित्राची दुसऱ्या मित्रावर पडणारी दृष्टी ही तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. तेथून राहु तुमच्यासाठी कुठेतरी शुभत्वाकडे वळणार आहे. कारण शनि हा ग्रह कन्या राशीसाठी कारक ग्रह आहे. अशा शनि महाराजांची दृष्टी राहुवर पडणार असल्यामुळे राहुच्या त्रासाची तीव्रता निश्चितपणे कमी होईल. तो थोडा शुभ होईल. विशेष म्हणजे त्याचवेळी सप्तम स्थानात गुरु महाराज हंस योगाचे निर्माण करीत आहेत. तो देखील कन्या जातकांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल.

      एकंदरीत या सर्व गोष्टींमुळे कन्या जातकांसाठी राहुच्या त्रासाची तीव्रता कमी होईल. जो गेल्या दीड वर्षांपासून तुम्हाला सातत्याने सहन करावा लागला आहे. इतर ग्रहांच्या सहकार्याने देखील कन्या जातकांना प्रगतीच्या विविध संधी प्राप्त होणार आहेत. मात्र याच वेळी तुमच्या कुटुंब स्थानात येणारा केतु हा कौटुंबिक सौख्यात उणिव निर्माण करण्याचं काम करणार आहे. अनेक वेळा राहु आणि केतु या दोन ग्रहांपैकी एक ग्रह जातकासाठी लाभदायक तर दुसरा त्रासदायक ठरतो. मात्र कन्या जातकांच्या बाबतीत येथे हे दोन्ही ग्रह बऱ्यापैकी त्रासदायक ठरणार आहेत. कारण राहु तुमच्या अष्टम स्थानात तर केतु कुटुंब स्थानात प्रवेश करणार आहे. थोडक्यात हे दोन्ही ग्रह एकाच वेळी तुम्हाला नकारात्मक परिणाम देण्यासाठी आलेले आहेत. कुटुंब स्थानातील केतुचा प्रभाव म्हणजे कौटुंबिक वाद निर्माण करणं, कौटुंबिक दुरावा निर्माण करणं तर राहुचा प्रभाव म्हणजे घरापासून, आपल्या माणसांपासून लांब पाठवणं, मन अस्वस्थ करणं, कुठल्या तरी गोष्टीला घेऊन मानात भिती निर्माण करणं, असे सर्व परिणाम तुमच्यावर होणार आहेत. मात्र एप्रिल महिन्यातच गुरु व शनि महाराज हे दोन मोठे ग्रह देखील राशी परिवर्तन करणार आहेत. त्यांच्यामुळे राहु-केतुच्या संकटातून बाहेर पडण्याचंं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल.

अजून एक अत्यंत महत्त्वाचीबाब म्हणजे या एप्रिल महिन्यामध्ये रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतु असे सर्वच करीत ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. जी खरं तर ऐतिहासिक बाब ठरणार आहे. कारण अशी स्थिती सहसा निर्माण होत नाही. शिवाय मनुष्य जीवनावर कोणत्याही एकाच ग्रहाचा प्रभाव पडत नाही. तर सर्व ग्रहांचा सामुहिक परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजे राहु त्याचं कार्य करेल. गुरु त्याचं कार्य करेल. शनि महाराज त्याचं कार्य करतील. तसेच शनि महाराज षष्ठ स्थानात विराजमान होऊन राहुवर जी दृष्टी ठेवणार आहेत त्यामुळे राहु फारचा अशुभ प्रभाव कन्या जातकांना टाकू शकणार नाही. परिणाम तुमची प्रगतीकडे वाटचाल सातत्याने सुरु राहिल. म्हणून राहु-केतुच्या अशुभ स्थितीमुळे तुम्ही घाबरुन जाता कामा नये. त्याचवेळी गुरु व शनि महाराजांसह इतर सर्व ग्रह तुम्हाला सहकार्य करणार आहेत. त्याचा पुरेपुर लाभ घेण्यासाठी तुम्ही सज्ज राहायला हवं.

राहु-केतु परिवर्तनाचे कन्या राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *