Skip to content
Home » राहु-केतु परिवर्तन – धनु रास

राहु-केतु परिवर्तन – धनु रास

संघर्ष अटळ जरी

लाभ होईल तरी

 

नमस्कार!

मी ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्यांच्या प्रभावांचं विश्लेषण आपण नेहमीच वेळोवेळी करीत असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यात जे राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन होणार आहे त्यांचा आपण अभ्यास करीत आहोत. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांचा नेमका प्रभाव काय असेल? याचा आपण राशीनुसार अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण धनु राशीवर या परिवर्तनाचा काय प्रभाव होईल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. #astroguru

ज्योतिषीय दृष्टिकोनातून येणारा एप्रिल हा सर्वांसाठीच विशेषत्वाने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात जवळपास सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. अशा घटना सहसा इतिहासात लवकर आढळून येत नाहीत. याला आपण युग परिवर्तन असं म्हटलं तरी अजिबात अतिशोयोक्ती ठरणार नाही. कारण हे परिवर्तन म्हणजे येणाऱ्या खूप मोठ्या बदलांची पूर्वपिठीका ठरणार आहेत. एकाच महिन्यात सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन ही खूप मोठी घटना ठरणार आहे. हा महिना म्हणजे एप्रिल महिना होय. त्यात सर्वप्रथम राहु आणि केतु या दोन ग्रहांचं १२ एप्रिल रोजी परिवर्तन घडून येणार आहे. राहु आणि केतु यांच्या राशी परिवर्तनाचे परिणाम, त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम या दोन ग्रहांविषयी माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि केतु हे दोन्हीही छाया ग्रह आहेत. म्हणजे ते एक प्रकारे बिंदू आहेत. खरं तर ते ग्रह नाहीत. तरी मनुष्य जीवनावर त्यांच्या खूप मोठा प्रभाव दिसून येतो. इतका की सर्व ग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य या दोन ग्रहांमध्ये आहे. २१ व्या शतकात राहु आणि केतु या दोघांचं विशेषत्वाने महत्त्व समोर येतं. कारण या शतकात प्रामुख्याने जी क्रांती घडून आली आहे, म्हणजे विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मीडियाची विविध माध्यमं, टेक्नॉलॉजी, टेलिकम्युनिकेश या सर्व गोष्टी राहुच्या अखत्यारीत येतात. आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं झाल्यास राहु म्हणजे अटॅचमेंट आणि केतु म्हणजे डिटॅचमेंट होय. राहु म्हणजे जी गोष्ट आपल्याला हवी आहे, ती कोणत्याही परिस्थितीत मिळवणं होय. कसंही करुन ती गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे, ही भावना म्हणजे राहु ग्रह होय. तसेच जे आहे, जसं आहे त्याला तसंच्या तसं स्विकारायचं आणि वाटचाल करत राहायची, ही भावना म्हणजे केतु होय. कारण केतु हा ग्रह मुक्ती, मोक्षाचा, विरक्तीचा कारक ग्रह मानला जातो. जातकाची आध्यात्मिक उन्नती ही केतुवरुनच बघितली जाते. त्यामुळे त्याचा प्रभाव हा राहुच्या अगदी विरुद्ध असतो. #bestastrologerinmaharashtra

एखाद्या जातकाच्या पत्रिकेत राहु सोबत शुक्र हा ग्रह असेल तर तो जातकाच्या मनात पझेसिव्हनेस निर्माण करण्याचा काम करेल. माझा जोडीदारा कसा असावा? जो किती स्मार्ट असावा? तो टापटिप असावा किंवा त्याने इतरांशी बोलावं की बोलू नये? या सर्व बाबी दर्शविणारा ग्रह म्हणजे राहु होय. तर याच्या अगदी विरुद्ध मानसिकता केतुची असते. जोडीदार गबाळ असेल तरी चालेल. कसाही असला तरी चालेल. कोणताही कलर कॉम्बिनेशन नसलेला व्यक्ती देखील एखाद्याला मनापासून आवडू शकतो. कारण अशा जातकांच्या पत्रिकेत केतु आणि शुक्राची युती असते. त्यातहून महत्त्वाची बाब म्हणजे अशा जातकांचा संसार देखील अतिशय उत्तम असतो. कारण केतु या गोष्टींना महत्त्व देत नाही. तर अशा या राहु आणि केतुचे १२ एप्रिल रोजी राशि परिवर्तन घडून येत आहे. राहु ग्रह वृषभ राशीतून मेष राशीत तर केतु हा ग्रह वृश्चिक राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या या परिवर्तनाचा धनु राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

धनु राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पंचम स्थानात राहुचं तर इच्छापूर्तीच्या स्थानात केतुचं आगमन होणार आहे. पत्रिकेतील लाभ व इच्छापूर्तीचं स्थान हे उपयच स्थान असतं. ज्योतिष नियमांनुसार उपचय स्थानात सर्व पाप ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य होतात. तसेच लाभ स्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी किंवा जातकाच्या इच्छापूर्तीसाठीच तिथे आलेला असतो. त्यानुसार या स्थानात येणारा केतु तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. किंबहूना गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या ज्या सुप्त इच्छा होत्या, प्रयत्न करुनही ज्या पूर्ण होत नव्हत्या, त्या पूर्णत्वाकडे नेण्यास येथील केतु तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे त्याचा धनु जातकांनी पुरेपुर उपयोग करुन घ्यावा.

राहु परितर्वनाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पंचम स्थानात येणारा राहु तुमच्यासाठी संघर्षदायक ठरेल. पत्रिकेतील पंचम स्थान हे शिक्षण, संतती, प्रणय यांचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्यानुसार या सर्वांच्या संदर्भात प्रश्न निर्माण करण्याचं काम राहु करु शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला थोडं जागरुक राहावं लागणार आहे. पुढील तब्बल अठरा महिने त्याचं वास्तव्य तुमच्या पंचम स्थानात असणार आहे. तर हे संपूर्ण अठरा महिने तो प्रश्न निर्माण करेल का? तर असं होत नाही. त्यातही नक्षत्रांनुसार, चरणांनुसार थोडा बदल निश्चितच होत असतो. तरी सुद्धा धनु राशीसाठी राहुचं हे गोचर बऱ्यापैकी त्रासदायक ठरणारं आहे. त्यामुळे पंचम स्थानाच्या कारकत्वात ज्या ज्या गोष्टी येतात त्या सर्व दृष्टीने तुम्ही अत्यंत काळजी घ्यायला हवी.

      राहुचं फक्त स्थानच नव्हे तर त्याची दृष्टी देखील मोठा परिणाम करते. राहुला पंचम, सप्तम, नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. त्यानुसार पंचम स्थानातील राहुची पंचम दृष्टी तुमच्या नवम स्थानावर म्हणजे भाग्य स्थानावर पडेल. त्यानंतर सप्तम दृष्टी लाभ स्थानावर आणि नवम दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. थोडक्यात पत्रिकेतील चार अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानं त्यामध्ये पंचम स्थान, भाग्य स्थान, लाभ म्हणजे इच्छापूर्तीचं स्थान आणि प्रथम स्थान, हे चारही स्थानं राहुच्या या गोचरमुळे कुठेतरी दूषित होत आहेत. साहजिकच त्यांचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार आहे. ही स्थिती असली तरी तुमच्यासाठी अत्यंत सुखदायक बाब म्हणजे १२ एप्रिल रोजी राहु-केतुचं गोचर होत आहे आणि १३ एप्रिल रोजी गुरु महाराज देखील राशी परिवर्तन करुन तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे. तिथे ते हंस योगाचे निर्माण करतील. जो पंचमहापुरुष योगांमध्ये एक अत्यंत शुभ राजयोग मानला जातो. #rahuketuparivartan

इतकेच नव्हे तर शनि महाराज देखील तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यापासून देखील तुम्हाला अत्यंत शुभ फळांची प्राप्ती होईल. मात्र तृतीय स्थानातील शनिची तृतीय दृष्टी तुमच्या पंचम स्थानातील राहुवर पडेल. त्याचा प्रभाव म्हणजे या काळात अपेक्षित नसतांना, कुठलेही विशेष कारणं नसतांना अडथळे निर्माण होणं, शिक्षणाची दिशा बदलणं, संपूर्ण अभ्यास केलेला असतांनाही परिक्षेत यश न मिळणं या सारख्या स्थितीचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. तसेच या काळात संततीची काळजी घेणं देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण संतती योग्य किंवा पुरेसा अभ्यास करणं, त्यांची कर्तव्ये न करणं, तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होणं, संततीचं न ऐकणं या सारखे प्रभाव प्रामुख्याने समोर येऊ शकतात. किंबहूना संततीच्या आरोग्याकडे देखील तुम्हाला लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात पंचम स्थानात आलेला राहु हा तुमच्यासाठी बऱ्यापैकी त्रासदायक, संघर्षदायक ठरणार आहे. मात्र निसर्ग जेव्हा एकीकडे त्रास देतो, तेव्हा दुसरीकडे शुभ परिणाम देखील देतो. म्हणजे तो समतोल राखण्याचा, संतुलन बनवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.

त्यानुसार राहु जरी तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार असला तरी केतु, शनि आणि गुरु सारखे तीन मोठे ग्रह तुमच्यासाठी अत्यंत शुभदायक ठरणार आहेत. म्हणजे खूप मोठा कठिण प्रसंग तुमच्यावर येणार नाही. संकटे निश्चितच येतील. मात्र त्यातून तुम्ही यशस्वीपणे मार्ग काढू शकाल आणि यशस्वी देखील व्हाल. राहु आणि तुमचा राशी स्वामी गुरु यांच्यात तसंही शत्रुत्वाचं नातं आहे. त्यामुळे राहु हा ग्रह धनु राशीसाठी कधीही पाठबळ देणारा ठरत नाही. त्यात आता अशा स्थितीमध्ये की तो मंगळाच्या राशीत व तुमच्या पंचम स्थानात विराजमान होणार आहे तेव्हा धनु जातकांना या गोचरचा बऱ्यापैकी नकारात्मक प्रभाव सहन करावा लागेल. मात्र यातूनही तुम्ही सहज पुढे मार्गक्रमण करीत राहाल. कारण तुमचा राशी स्वामी किंवा लग्नेश तुम्हाला त्यासाठी पाठबळ देणार आहे. तसेच केतु देखील तुम्हाला कुठेतरी शुभ फळं नक्कीच प्रदान करेल. कारण तो लाभ म्हणजे इच्छापूर्तीच्या स्थानातून प्रवास करीत आहे. त्यामुळे इच्छापूर्तीच्या दृष्टीने केतुचं पूर्ण सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. किंबहूना धनलाभाचे योगही तुमच्यासाठी निर्माण होतील. थोडक्यात तुमच्यासाठी राहुचं गोचर त्रासदायक तर केतुचं गोचर लाभदायक ठरणार आहे.

या सोबतच तुम्ही अजून एक बाब लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही एका ग्रहाचा मनुष्यावर पूर्णपणे परिणाम होत नाही. तर पत्रिकेतील सर्व ग्रहांचा एकत्रित परिणाम जीवनावर होत असतो. त्यानुसार राहुची स्थिती अशुभ असली तरी राशी स्वामीसह इतर ग्रहांचं योग्य ते पाठबळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. त्यामुळे राहु जी संघर्षाची स्थिती निर्माण करेल त्याचा सामना करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आलेलं असेलच. म्हणून परिस्थितीचा बाऊ न करता तिच्याशी दोन हाथ करण्याची तुम्ही मानसिक तयारी केली पाहिजे. त्यात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल व तेच तुमच्यासाठी लाभदायक देखील राहिल. ही बाब धनु जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.  #rahu #ketu

राहु-केतु परिवर्तनाचे धनु राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *