Skip to content
Home » *ज्ञान व परिश्रमाद्वारे मिळविलेली गती* *हीच शास्रीय अभ्यासातील खरी प्रगती….*

*ज्ञान व परिश्रमाद्वारे मिळविलेली गती* *हीच शास्रीय अभ्यासातील खरी प्रगती….*

 

नमस्कार! कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य, तिचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी , त्यातील उत्साह टिकून राहण्यासाठी त्यात गती असणे अत्यंत आवश्यक असते. गती नसल्यास ती गोष्ट रेंगाळली जाऊ शकते. तिचं गांभीर्य, महत्त्व कमी होऊ शकतं. त्यात ज्ञान प्राप्तीचा विषय असेल तर उत्साह, आवड देखील महत्त्वाची ठरते. त्यासाठीही गती महत्त्वपूर्ण ठरते. त्यानुसार शास्त्रीय अभ्यास करतांना, ज्ञान प्राप्त करीत असतांना जितके सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक असतात, तितकीच त्याद्वारे प्राप्त झालेली गती देखील महत्त्वाची असते. कारण तीच आपल्या अभ्यासातील खरी प्रगती ठरते. आता ज्ञान किंवा शिक्षणाच्या संबंधातील प्रत्येक गोष्टीचे आपण एकाच पद्धतीने मूल्यमापन करु शकत नाही. कारण शालेय शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण किंवा ज्योतिषशास्त्रासारखे विशेष शिक्षण या अत्यंत भिन्न बाबी आहेत. शालेय शिक्षणामध्ये पहिली, दुसरी, तिसरी या क्रमाने अगदी वर्षभर शांततेने अभ्यास अपेक्षित असतो. तेव्हाचं वय देखील तसंच असतं. तेव्हा ज्ञानप्राप्ती बरोबरच इतरही अनेक विषयातील जडणघडण होणं आवश्यक ठरतं. मनुष्य जेव्हा मोठा होतो आणि व्यावसायिक शिक्षणाकडे वळतो, तेव्हा शालेय शिक्षणाचे नियम लागत नाहीत. किंबहुना ते लावायला देखील नकोत. कारण व्यावसायिक शिक्षण हे पूर्णपणे वेगळं असतं. ते मुख्यत: तुमच्या इंटरनल क्वॉलिफिकेशनवर अवलंबून असतं. तुमच्या परिश्रमावर, इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. आपल्याच शास्त्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास प्रत्येकाने अगदी बेसिकपासून म्हणजे बाराखडी पासून सुरुवात करावी हे गरजेचे नाही. कारण काही अभ्यासकांचा बेसिकचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने आधीच झालेला असतो. त्याद्वारे या ज्ञानाचं महत्त्व व गांभीर्य त्यांना पूर्णपणे कळालेलं असतं. म्हणूनच अजून पुढील ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांचा उत्साह प्रचंड असतो. परिश्रम करण्याची तयारी देखील असते. कारण त्यानुसार त्यांनी भविष्यातील नियोजन केलेलं असतं. एक ध्येय निश्चित करुन ते त्यानुसार मार्गक्रमण करीत असतात. म्हणून त्यांच्या अभ्यासात एक प्रकारची गती बघायला मिळते. जी बघुन कित्येकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. माझ्याकडे असे अनेक अभ्यासक आहेत की ज्यांची अभ्यासातील गती बघुन मला स्वत:ला मोठे आश्चर्य वाटते. सोबतच त्यांचा अभिमान देखील वाटतो. कारण असे विद्यार्थी मिळायला भाग्य देखील लागतं. पूर्वीच्या काळातील अभ्यास पद्धतीचा विचार केला असता आधी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अभ्यास करुन, जिथे ज्ञान प्राप्त होईल तेथून ग्रहन करुन, गुरुजनांचे मार्गदर्शन प्राप्त करुन, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांचे वाचन करुन ज्योतिषी व्हायचे. त्यानंतर मग प्रत्यक्ष सेवा देत असतांना वेगवेगळ्या पत्रिकांचा अभ्यास करायचा व त्यातून आपले ज्ञान अजून समृद्ध करायचे, अशा पद्धतीने त्यांचं ज्ञान विकसित व्हायचं. या गोष्टीला कुठे तरी शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न आपली संस्था करीत आहे. कारण एक भाग इकडून वाचला, दुसरा भाग तिकडून वाचला तर दोघांचा क्रम व्यवस्थित जुळत नाही. ज्याचा थेट परिणाम आपल्या अभ्यासावर होतो. या गोष्टीचा बराच त्रास त्या काळातील ज्योतिषांना देखील व्हायचा. त्यातून मार्ग काढत त्यांची वाटचाल सुरु होती. कारण त्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय देखील नव्हता. मग आपल्या संस्थेने जेव्हा प्रत्यक्ष कार्य सुरु केलं तेव्हा या विषयावर सर्वप्रथम विचार करण्यात आला. त्यामागील सगळ्यात मुख्य उद्देश म्हणजे सगळ्या ज्योतिष अभ्यासकांना अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, योग्य क्रमाने अभ्यासक्रम प्राप्त व्हावा, हा होय. मग यासाठी काय करायला हवं? तर आपण योग्य क्रमाने नियमांची आखणी केली आणि अभ्यासक्रम तयार केला. ज्योतिष प्रविण या बेसिक अभ्यासक्रमाचं आपण एक पुस्तक तयार केलं. २५० ते ३०० पानांचं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकातील अभ्यासक्रमावर आपण जवळपास ५० व्हिडिओ बनवून युट्युब चॅनलवर सर्वांसाठी उपलब्ध करुन दिले. त्यानंतर ज्योतिष विशारदच्या अभ्यासक्रमावर देखील आपण 2 पुस्तक आणि ५० व्हिडिओ बनविले. या पद्धतीने एकेक विषयाचा अभ्यास आपण अभ्यासकांना देत गेलो. ज्योतिष भास्करसाठी मात्र जवळपास २०० ते २५० व्हिडिओ आणि एकूण सहा पुस्तके या पद्धतीने आपण अभ्यासक्रमाची आखणी केली. म्हणजे विषयांची काठिण्य पातळी हळूहळू वाढविली. बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत आपण अभ्यासक्रमाला घेऊन गेलो. याच पद्धतीने आपली सर्व यंत्रणा सुरळीतपणे कार्य करीत आहे. आता यात होतं काय की व्यावसायिक अभ्यासक्रमाची पद्धत वेगळी असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला डॉक्टरेट एका वर्षात मिळू शकते तर एखाद्या व्यक्तीला चार वर्ष परिश्रम घेऊनही ती मिळत नाही. एखादा व्यक्ती तर ७-८ वर्ष सातत्याने परिश्रम करुनही त्याला ती मिळतेच असं नाही. यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरतात. एक म्हणजे त्याचं कौशल्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिश्रम होय. आपल्या संस्थेच्या बाबतीत किंवा आपल्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुम्ही दररोज किमान अर्धा तास अभ्यास केला तर सहा महिन्यात एक पदवी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत आपण अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. त्यानुसार सगळ्यात आधी ज्योतिष प्रविण, त्यानंतर ज्योतिष विशारद, त्यानंतर ज्योतिष भास्कर हे तीन अभ्यासक्रम तुम्ही सहा-सहा महिन्यात पूर्ण करु शकता. त्यासाठी दररोज केवळ अर्धा तास ते एक तास अभ्यास पुरेसा आहे. मात्र काही अभ्यासक हे मूळात अत्यंत बुद्धिमान असतात. त्यांना तीव्र ओढ असते की आपल्याला ज्योतिष क्षेत्रात खूप अभ्यास करायचा आहे. खूप प्रगती करायची आहे. खूप पुढे जायचं. माझ्याकडे दिवसाला सहा ते आठ तास अभ्यास करणारे किंबहुना दहा तास अभ्यास करणारे अभ्यासक देखील आहेत. मग ते काय करतात की, संपूर्ण दिवसभरासाठी त्यांचं केवळ एकच टार्गेट असतं की शास्त्राचा सखोल अभ्यास करायचा. इतका की हा सहा महिन्याचा अभ्यासक्रम ते अक्षरश: एका महिन्यात पूर्ण करतात. त्यात अगदी सर्व नियम तोंडी पाठ असणारे विद्यार्थी आपल्या संस्थेला लाभलेले आहेत. तेवढा ते अभ्यास करीत असतात. या पद्धतीने मार्गक्रमण करीत राहिल्यावर मग त्यांचा भराभर अभ्यासक्रम पुढे सरकत राहतो. अशावेळी मग आपण जी पद्धत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आहे, तीच वापरतो. जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही एका वेळी दोन किंवा तीन परिक्षा देऊ शकतात. मात्र परिक्षेतील प्रश्नांची तुम्ही योग्य उत्तरे दिलीत तरच तुम्हाला गुण मिळतील. आश्चर्याची बाब म्हणजे जे दिवसाला आठ-दहा तास अभ्यास करतात, सहा-सहा महिन्यांचा अभ्यासक्रम अवघ्या एका महिन्यात, दीड महिन्यात पूर्ण करतात ते खूप उत्तम गुण देखील मिळवितात. कारण त्यांनी अल्पावधीत परिपूर्ण अभ्यास केलेला असतो. मात्र केवळ नियम किंवा अभ्यासक्रम पाठ करुन परिपूर्ण ज्ञान प्राप्त होत नाही. त्यासाठी आपण ‘कुंडली सोडवा’ हा पर्याय देखील दिलेला आहे. आपल्या वेबसाईटवर कायम स्वरुपी कुंडल्या आहेत. त्यातील कोणतीही कुंडली तुम्ही घेऊ शकता. त्याचा अभ्यास करु शकता आणि सोडवू शकता. मग ज्या अभ्यासकांना अभ्यासाची ओढ असते. शास्त्राचं महत्त्व ज्यांना पूर्णपणे कळतं ते तिकडे देखील वळतात. तिथेही तेवढ्याच उत्साहाने एकेक कुंडली घेऊन तिचा सखोल अभ्यास करतात. तिचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची आदर्श उत्तरे आपण तिथे दिलेली आहेत. ती तपासून घेतात. चुकले तर पुन्हा नव्याने सोडवितात. असे केल्याने या अभ्यासकांची प्रगती ही दिवसाला अर्धा तास अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. ते आपण मान्य करायला हवं. त्यांचं कौतुक करायला हवं. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला हवी. हा त्यांचा पळण्याचा वेग झाला. ज्ञान प्राप्त करण्याचा, यश मिळविण्याचा वेग झाला. या वेगाने ते जात आहेत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने, नियमबद्ध पद्धतीने शास्त्राचा अभ्यास करुन प्रगती करीत आहेत. अशा अभ्यासकांचा मला खूप अभिमान वाटतो आणि सांगतांना अतिशय आनंद होतोय की, आपल्या संस्थेत असे अनेक विद्यार्थी आहेत. आपण जो ‘कुंडली सोडवा’ अभ्यासक्रम सुरु केला आहे, त्यावर दिवसातून आठ ते दहा तास अभ्यास करणारे अभ्यासक आपल्याकडे आहेत. कुंडलीतील प्रत्येक स्थानानुसार, ग्रहानुसार विवेचन करणारे, अत्यंत सुक्ष्म पद्धतीने अभ्यास करणारे अभ्यासक आहेत. तसेच असेही अभ्यासक आहेत जे आठ दिवसात केवळ एकच कुंडली पूर्ण सोडवू शकतात. तर असेही आहेत की जे दिवसाला एक कुंडली परिपूर्ण पद्धतीने सोडवितात. अनेकांनी लिहून कुंडल्या माझ्याकडे पाठविल्या आहेत. हे तुमचं वैयक्तिक क्वॉलिफिकेशन असतं की तुम्ही किती प्रगती कराल. याच पद्धतीने परिक्षेत काही अभ्यासक दैदिप्यमान यश मिळवितात तर काही अपयशी ठरतात. शेवटी हे तुमच्या परिश्रमावर, तुमच्या ज्ञानावर अवलंबून आहे. थोडक्यात परिश्रम आणि ज्ञानाच्या बळावर योग्य ती गती प्राप्त करुन आकाशाला गवसणी घालू पाहणारे अभ्यासक मला प्राप्त झाले, या गोष्टीचा मला अत्यंत अभिमान आहे.धन्यवाद!शुभम भवतु!ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *