Skip to content
Home » गुरु परिवर्तन – वृश्चिक रास

गुरु परिवर्तन – वृश्चिक रास

ज्ञानासह भाग्यात वृद्धी

लाभासह होईल उन्नती

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रह सातत्याने भ्रमण करतात. गोचरद्वारे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांचे विश्लेषण आपण करतच असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामध्ये नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे अनेक अर्थाने सर्वच राशींसांठी अत्यंत शुभ ठणार आहे. कारण ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. १३ एप्रिल रोजी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होणार असून त्यांच्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण आपण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण वृश्चिक राशीसाठी गुरु महाराजाचं हे राशी परिवर्तन कसं राहिल? यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

मागील काही भागांमध्ये आपण गुरु ग्रह व त्याच्या परिवर्तनाचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे. आता आपण पत्रिकेच्या रचनेच्या बाबतीत आधी थोडी माहिती समजून घेऊया. जेणे करुन या गुरु परिवर्तनाचे महत्त्व तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. खरं तर आपण केवळ निसर्ग कुंडलीचाच जरी अभ्यास केला तरी ती आपल्याला अनेक वेळा वेगवेगळे संकेत देत असते. पत्रिकेतील नवम स्थानाला आपण भाग्य स्थान म्हणून ओळखतो. पूर्व जन्माचं आपण जे संचित घेऊन आलेलो असतो ते संचित देखील या स्थानातून दिसतं. अशा नवम स्थानाचं स्थायी कारकत्व गुरु महाराजांकडे आहे. त्यानंतर दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तुम्ही मिळालेल्या आयुष्यात जे काही कर्म करणार आहात त्या सर्व कर्माच्या नोंदी येथे केल्या जातात. ते नोंदी करण्याचं काम शनि महाराजांकडे असतं. म्हणजे आपल्या कर्माचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. कारण निसर्ग कुंडलीच्या कर्म स्थानाचं स्वामीत्व त्यांच्याकडे असतं. आता या दोघांचा सामुहिक होणारा परिणाम एकादश स्थानातून म्हणजे लाभ आणि इच्छापूर्तीच्या स्थानातून व्यस्त होतो. भाग्य आणि कर्म या दोघांचा परिणाम म्हणजे लाभ होय. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही सर्व कर्तव्ये पूर्ण करतात. सर्वांना सर्व देऊन टाकतात. मोकळेपणाने खर्च करतात. सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करतात आणि ते केल्यानंतर तुम्ही मोक्षाकडे जातात. तिकडे नेणारं स्थान म्हणजे पत्रिकेतील व्यय स्थान होय.

महत्त्वाची बाब म्हणजे या व्यय स्थानाचं कारकत्व देखील गुरु महाराजांकडे आहे. थोडक्यात पत्रिकेतील भाग्य, कर्म, लाभ आणि व्यय या चार स्थानाचं खूप सुंदर असं सुसुत्र आहे. हे चारही स्थानं धर्म, अर्थ, काम, मोक्ष या क्रमाने देखील येतात. नवम हे धर्म स्थान, दशम हे कर्म स्थान, एकादश हे लाभ तर द्वादश हे व्यय स्थान असतं. अशी छानशी रचना आपल्या पत्रिकेत असते आणि त्यानुसारच आपलं जीवन व्यतीत होत असतं. जेव्हा आपण ग्रहांच्या गोचरचा अभ्यास करीत असतो तेव्हा ती आपल्या दृष्टीस पडते आणि अत्यंत प्रसन्नता प्रदान करते. कारण प्रत्येक ग्रहाची दिशा याच पद्धतीने होते. त्यांचे प्रत्येक जातकावर होणारे परिणाम देखील याच पद्धतीने होतात. याचा सखोल अभ्यास केल्यास यातून आपल्याला आयुष्याचं सूत्र सापडतं. ही आपल्या ऋषीमुनींची शक्ती आहे, की ज्यांच्या परिश्रमाने, संशोधनाने अशी सुसुत्रित पत्रिका आपल्याला प्राप्त होत असते. याद्वारे गुरु महाराजांचं राशी भ्रमण व राशी परिवर्तनाच्या महत्त्वाचा तुम्ही अंदाज तुम्ही घेऊ शकता. तर गुरु महाराज १३ एप्रिल रोजी कुंभ राशीतून मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

वृश्चिक रास किंवा लग्नाच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराजांची स्थिती किंवा त्यांचं गोचर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण ते तुमच्या पत्रिकेला धन, कुटुंब, वाणी, शिक्षण, संतती, प्रणय अशा सर्व गोष्टींचं कारकत्व त्यांच्याकडे असतं. म्हणजे पत्रिकेतील द्वितीय आणि पंचम या दोन महत्त्वापूर्ण स्थानांचं स्वामीत्व गुरु महाराजांकडे आहे. याशिवाय गुरु महाराजांच्या कारकत्वाखाली आयुष्यातील महत्त्वपूर्ण विषय असतातच. ते तुमच्या राशीला धनेश आणि पंचमेश असल्यामुळे त्यांचं गोचर हे तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण असतं. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहेत. तिथे त्यांची मीन ही जलतत्त्वाची स्वराशी येते. ज्यामुळे पंचमेश पंचमात ही स्थिती निर्माण होईल. जी तुमच्यासाठी अत्यंत शुभदायक, लाभदायक राहिल. त्यामुळे या परिवर्तनाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील.

या गुरु परिवर्तनाचा शुभ प्रभाव म्हणजे जे जातक गेली अनेक दिवस घरात पाळणा हलण्याची वाट बघत असतील त्यांची मनोकामना पूर्ण होईल. जे जातक शिक्षण घेत आहेत ते कुठल्याही क्षेत्रात असले तरी फार मोठं शैक्षणिक यश त्यांना या काळात प्राप्त होऊ शकतं. शिक्षणात, अभ्यासात तुम्ही उन्नती करणार आहात. तुमच्या अभ्यासाला योग्य ती दिशा प्राप्त होणार आहे. तसेच या काळात केलेला अभ्यास हा तुमच्या दीर्घकाळापर्यंत उपयोगात पडणारा असेल. सोबतच प्रेमवीरांच्या प्रेमाचं रुपांतर विवाहात होण्यासाठी देखील हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या प्रेमाला घरुन मान्यता प्राप्त होऊ शकते. म्हणून प्रेमविरांनी त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. पत्रिकेतील पंचम स्थान हे इष्टदेवांचं स्थान म्हणून देखील ओळखलं जातं. येथे आलेल्या गुरु महाराजांमुळे इष्टदेवांचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतील. थोडक्यात गुरु महाराजांचं गोचर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहिल. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

गुरु महाराज हे नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखले जातात. एकाचवेळी पत्रिकेतील अनेक स्थानांना शुभ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं. कारण त्यांना पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. त्या अत्यंत प्रभावशाली समजल्या जातात. किंबहूना स्थानापेक्षा त्यांच्या दृष्टीला जास्त महत्त्व असतं. कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हणतात. त्यानुसार पंचम स्थानातील गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या नवम स्थानावर पडेल. पत्रिकेतील नवम स्थान हे भाग्य स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे या काळात तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे. मनुष्य जीवनात भाग्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. कारण कधी कधी खूप कष्ट करुनही आपल्याला अपेक्षित यश प्राप्त होत नाही. कारण तेव्हा आपल्याला भाग्याची साथ मिळालेली नसते. येणारे तेरा महीने गुरु महाराज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळवून देणार आहेत. म्हणजे तुम्हाला केवळ योग्य ते कर्म करायचे आहेत. थोडक्यात भाग्य वृद्धीच्या दृष्टीने, धार्मिक कार्याच्या दृष्टीने, प्रवासाच्या दृष्टीने गुरु महाराजांची ही पंचम दृष्टी तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. या काळात तुमचे काही प्रवास देखील घडून येतील. त्यातूनही तुम्हाला लाभ प्राप्त होईल. त्याचा तुम्ही पूर्ण उपयोग करुन घ्यावा.

      यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या एकादश स्थानावर पडेल. पत्रिकेतील एकादश स्थानाला लाभ व इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. गत दोन-तीन वर्षांपासून तुम्ही सातत्याने संघर्ष केलेला आहे. अनेक गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या होत्या, त्या होऊ शकल्या नव्हत्या. त्या सर्व गोष्टी या काळात अगदी सहजतेने घडून येतील. म्हणजे तुमच्या छोट्या मोठ्या इच्छा सहज पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या तुमच्या ज्या काही सुप्त इच्छा असतील, त्या देखील पूर्ण होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला हवेत. जेणे करुन इच्छापूर्तीच्या या कालखंडांचा तुम्हाला उपयोग करुन घेता येईल. सोबतच विविध मार्गांनी तुम्हाला लाभ प्राप्त होईल. साहजिकच त्यात आर्थिक लाभ देखील असेल. म्हणून या लाभदायक काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा.

यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या प्रथम स्थानावर पडेल. पत्रिकेतील प्रथम स्थान हे जातकाचं स्वत:चं स्थान असतं. त्यावरुन व्यक्तिमत्त्वाचा बोध होत असतो. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात अत्यंत सकारात्मक बदल होतील. मागील काळात तुम्हाला विनाकारण खूप राग येत होता. त्या स्वभावातही आता बदल होणार आहे. तुमच्या विचारांमध्ये सुस्पष्टता येणार आहे. त्याचा शुभ परिणामही तुमच्या व्यक्तिमत्त्वावर पडणार आहे.

अशाप्रकारे एकंदरीत विचार केला असता द्वितीय, पंचम ही गुरु महाराजांची दोन स्थाने तर शुभ होणारच आहेत. त्याच बरोबर नवम, लाभ आणि प्रथम स्थान म्हणजे तुमची राशी अशी एकूण पाच स्थानं गुरु महाराज शुभ करणार आहेत. त्यामुळे गुरु महाराजांचं हे गोचर येणारे तेरा महीने तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक, प्रगतीदायक, भाग्यकारक, धनदायक, शैक्षणिक यश देणारं ठरणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षणातील यश हे दीर्घकाळ किंवा संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारं असतं. त्यामुळे जे वृश्चिक जातक शिक्षण घेत आहेत त्यांनी ही बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन जास्तीत जास्त अभ्यास करावा, अशी सूचना त्यांना देण्यात येत आहे. सोबतच स्पर्धा परिक्षांमध्ये देखील यश प्राप्त करण्याचा हा कालखंड असेल. त्यादृष्टीनेही तुम्ही प्रयत्न करायला हवेत.

याच काळात म्हणजे २९ एप्रिल रोजी शनि महाराज देखील राशी परिवर्तन करुन तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेला शश योगाचे निर्माण करणार आहेत. तसेच तिथे केंद्र त्रिकोण राजयोग देखील निर्माण होणार आहे. त्यामुळे त्याचेही तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. सोबतच तुमचा राशी स्वामी मंगळाचं जेव्हा जेव्हा तुम्हाला शुभ गोचर मिळेल, म्हणजे मंगळ जेव्हा जेव्हा शुभ स्थानांमध्ये येईल त्या प्रत्येक वेळी तुमचं भाग्य अजून जास्त समृद्ध होईल. एकंदरीत येणारे तेरा महीने वृश्चिक जातकांसाठी अत्यंत लाभदायक, प्रगतीदायक ठरणार आहेत. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा. समृद्धीच्या नवीन वाटा शोधाव्यात व यश मिळवावे.

उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक असे छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे कोणीही अगदी सहज करु शकतो. त्यासाठी विशेष असं काहीच करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. फक्त अट एकच की पूर्ण श्रद्धेने ते उपाय करायला हवेत. त्यानुसार वृश्चिक राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता आधी सांगितल्याप्रमाणे वृश्चिक राशीच्या पंचम स्थानात गुरु महाराजांचं आगमन होणार आहे. त्यानुसार तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करावं. तसेच काही गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही स्वत: मोफत शिकविण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आवर्जुन वेळ काढावा. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.

अशाप्रकारे गुरु परिवर्तनाचे वृश्चिक राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *