Skip to content
Home » गुरु परिवर्तन – कुंभ रास

गुरु परिवर्तन – कुंभ रास

होईल कर्मात वृद्धी

धनलाभाच्या संधी

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रह सातत्याने भ्रमण करतात. गोचरद्वारे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांचे विश्लेषण आपण करतच असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामध्ये नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे अनेक अर्थाने सर्वच राशींसांठी अत्यंत शुभ ठणार आहे. कारण ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. १३ एप्रिल रोजी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होणार असून त्यांच्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण आपण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशीसाठी गुरु महाराजाचं हे राशी परिवर्तन कसं राहिल? यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुरु ग्रह व त्यांच्या कारकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणे आवश्यक आहे. सर्व ग्रहांपैकी चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे चार नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखले जातात. मात्र चंद्राला अट लागू आहे की पौर्णिमेजवळचा चंद्र हा शुभ असतो तर अमावस्येजवळचा चंद्र हा अशुभ मानला जातो. चंद्र हा सूर्यापासून जितका लांब असेल, जितकी घरं तो पुढे असेल तितका तो शुभ ठरतो. याशिवाय देखील शुभत्त्वाच्या बाबतीत चंद्राला अनेक अटी लागू आहेत. बुध ग्रह देखील नैसर्गिक शुभ ग्रह आहे. मात्र तो ज्या ग्रहासोबत असतो त्या ग्रहाला अनुसरुन त्याच्या प्रवाभावाची दिशा बदलते. त्यामुळे त्याच्या नैसर्गिक शुभत्वात कुठेतरी उणिव निर्माण होते. मग गुरु आणि शुक्र हे सगळ्यात शुभ ग्रह दोनच उरले. शुक्र साधारणपणे महिन्याभरात राशी बदल करतो. म्हणजे त्याचे जे काही शुभ-अशुभ परिणाम असतील ते तो एका महिन्यात देतो. म्हणजे छोट्या घटनांसाठी शुक्राचं गोचर हे शुभत्व देतं. मात्र गुरु महाराज एका राशीत जवळपास १३ महीने विराजमान असतात. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

सोबतच त्यांच्या दृष्ट्यांचाही खूप मोठा परिणाम होत असतो. इतर सर्व शुभ ग्रहांना सप्तम ही केवळ एकच दृष्टी असते. मात्र गुरु महाराजांकडे पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. महत्त्वाची बाब म्हणजे नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे स्थानापेक्षा त्यांच्या दृष्टीला जास्त महत्त्व असते. किंबहूना त्यांच्या दृष्टीला अमृततुल्य मानले जाते. म्हणजे राशी राशीत १३ महीने राहून एकाच वेळी पत्रिकेतील चार स्थानं शुभ करण्याचं सामर्थ्य गुरु महाराजांमध्ये आहे. त्या चारही स्थानांच्या कारकत्वानुसार अत्यंत शुभ फळं जातकांना प्राप्त होतात. म्हणूनच गुरु महाराजाचं गोचर किंवा त्यांचं राशि परिवर्तन हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. आता तर ते विशेेषत्वाने महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण गेली तीन वर्ष सातत्याने नकारात्मक, संघर्षदायक प्रवासातून आता ते सुखदायक प्रवासाला आता ते सुरुवात करणार आहेत. आपल्या भाषेत सांगायचं झाल्यास गुरु महाराज गत तीन वर्षांपासून खडकाळ रस्त्यावर मार्गक्रमण करीत होते. स्वत: खडकाळ रस्त्यावर असतांना देखील जमेल तेवढी शुभ फळं त्यांनी जातकांना दिलेली आहेत. मात्र त्यांचाच प्रवास संघर्षमय स्थितीत असल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर पडत होता. स्वत:च्या मीन राशीत प्रवेश केल्यानंतर आता ते छानपैकी चौपदरी रस्त्यावरुन वाटचाल सुरु करणार आहेत. परिणामी त्यांची अत्यंत शुभ फळं सर्वांनाच प्राप्त होणार आहेत. असे हे गुरु महाराज १३ एप्रिल रोजी कुंभ राशीतून मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या द्वितीय स्थानात गुरु महाराजांचं आगमन होणार आहे. वास्तविक पाहता, गुरु महाराज तुमच्या राशीचे कारक ग्रह नाहीत. तरी देखील गुरु महाराजांची स्थिती, त्यांचं राशी परिवर्तन हे तुमच्यासाठी नेहमीच अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कारण ते तुमचे धनेश आणि लाभेश आहेत. कुंभ पत्रिकेतील द्वितीय व एकादश या स्थानांचं स्वामीत्व त्यांच्याकडे आहे. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन, कुटुंब वाणी यांचं स्थान मानलं जातं. तर एकादश स्थानाला आपण लाभ व इच्छापूर्तीचं स्थान मानतो. या दोन्ही स्थानांच्या कारकत्वाचा विचार केला असता अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी गुरु महाराजांच्या अखत्यारीत येतात. आता ते गोचरने स्वत:च्या मीन राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे धनेश धनात ही स्थिती निर्माण होईल. जी अत्यंत शुभ मानली जाते. त्याची अत्यंत शुभ फळे तुम्हाला या काळात प्राप्त होतील. तुमच्या वाणीला ज्ञान व आध्यात्मिक दर्जा प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाची मांडणी कराल त्या मांडणीतून तुमचा अभ्यास, तुमचं ज्ञान दिसून येईल. जे कुंभ जातक लेखक असतील त्यांच्या लेखनात सखोलता येईल. जे वक्ता असतील त्यांच्या वाणीत ज्ञान प्रकर्षाने दिसून येईल.

एकंदरीत द्वितीय स्थानात प्रवेश करणारे गुरु महाराज हे अनेक अर्थाने तुम्हाला लाभ प्रदान करतील. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे द्वितीय स्थानातील गुरु महाराज हे एकटे पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करण्याला समर्थ ठरतील. कारण धन स्थान हे अर्थत्रिकोणाच्या स्थानांपैकी एक असतं आणि अर्थत्रिकोणाच्या कोणत्याही स्थानात येणारे गुरु महाराज हे एकटेच अर्थत्रिकोण पूर्ण करण्याची क्षमता ठेवतात. शिवाय ते तुमचे धनेश आणि लाभेश असल्यामुळे या अर्थत्रिकोणाचा लाभ तुम्हाला भरपूर प्रमाणात प्राप्त होईल. पत्रिकेत विविध योग असतात. त्यातील अर्थत्रिकोण हा अत्यंत महत्त्वपूर्ण व लाभदायक असा योग असतो. द्वितीय, षष्ठ आणि दशम या तीन स्थानांनी मिळून हा योग निर्माण होत असतो. आता गुरु महाराज तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार असल्यामुळे त्यांची दृष्टी षष्ठ आणि दशम स्थानावर पडणार आहे. त्यामुळे हा अर्थत्रिकोण येथे पूर्ण होणार आहे. हा त्रिकोण अर्थप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण अर्थप्राप्ती ही संसाराची, जीवनाची प्राथमिक गरज असते. पुरेसं उत्पन्न असलं तर इतर बहुतेक प्रश्न सहज सोडविले जातात, हे कोणीही नाकारु शकत नाही. विशेषत: आजच्या आधुनिक युगात जगतांना अर्थप्राप्ती ही अत्यंत महत्त्वाची ठरते. जी आता तुम्हाला प्राप्त होणार आहे. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

      अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या काळात तुमच्या कुटुंबात वाढ देखील होऊ शकते. हा देखील एक शुभ प्रभाव म्हणता येईल. अर्थात, ही वाढ वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते. कुटुंबात नवीन बाळ जन्माला येऊ शकतं. मुलाचा किंवा मुलीचा विवाह होणं. या पद्धतीने देखील कुटुंब वृद्धी होऊ शकते. थोडक्यात द्वितीय स्थानातील गुरु महाराज तुम्हाला अर्थप्राप्तीसह भरभरुन शुभ फळं, लाभ देणार आहेत. त्याचा तुम्ही सदुपयोग करायला हवा.

असं म्हणतात की चांगला काळ जेव्हा सुरु होतो तेव्हा अनेक बाबतीत आपल्या सोबत चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. गुरु महाराजाचं द्वितीय स्थानातील आगमन म्हणजे तुमच्यासाठी चांगल्या काळाची सुरुवात असं म्हणता येईल. कारण गुरु महाराज तुम्हाला केवळ अर्थप्राप्ती करुन देणार नाही आहेत. तर त्यासोबत इतर अनेक बाबतीतही ते तुमच्यासाठी शुभ ठरणार आहेत. त्यांना पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृट्या असतात. त्यांच्या स्थानापेक्षा त्यांची दृष्टी ही अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. त्यानुसार द्वितीय स्थानातील गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. पत्रिकेतील षष्ठ स्थानावरुन आपण आरोग्य, नोकरी, कर्ज, स्पर्धक, शत्रु या सर्व गोष्टी बघतो. या स्थानावरील गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीचा परिणाम म्हणजे नोकरी स्थैर्य लाभणं, प्रगतीच्या संधी निर्माण होणं, कामाच्या ठिकाणी तुमचं कर्तृत्व प्रामुख्याने समोर येणं, कर्तृत्वाची दिशा बदलणं या सारखे परिणाम प्राप्त होतात. सोबतच योग्य जातकांना प्रमोशनच्या संधी देखील मिळतील. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते अगदी सहज मिळू शकेल. विरोधक तुम्हाला फारसे त्रास देऊ शकणार नाहीत. ते त्यांच्याच कार्यात जास्त व्यस्त असतील. कारण तुमच्या षष्ठ स्थानात चंद्राची कर्क रास येते. गुरु आणि चंद्र हे मित्र ग्रह आहेत. त्यामुळे या दृष्टीचे तुम्हाला अधिक शुभ परिणाम प्राप्त होतील.

यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल. कुंभ ही तशीही बुद्धिमान रास आहे. त्यानुसार या दृष्टीचा प्रभाव म्हणजे जे जातक एखादं बौद्धिक काम करीत असतील, संसोधन करीत असतील, एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास तुम्ही करीत असाल तर त्या कामातील यशाची शक्यता बऱ्यापैकी वाढणार आहे. सोबतच कौटुंबिक धनलाभ, अचानक प्राप्त होणाऱ्या धनलाभाच्या शक्यता वाढणार आहेत. अगोदर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातूनही लाभ प्राप्त होण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. थोडक्यात अष्टम स्थान नकारात्मक मानलं जात असलं तरी गुरु महाराजांच्या कृपादृष्टीमुळे या स्थानाचेही तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत.

यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील दशम स्थानाला कर्म स्थान म्हटलं जातं. कुंभ राशीच्या पत्रिकेत येथे मंगळाची वृश्चिक रास येते. मंगळ आणि गुरु हे मित्र ग्रह आहेत. त्यामुळे धनेश आणि दशमेश यांच्यातील सौख्य विशेष यश देणारं ठरेल. महत्त्वाची बाब म्हणजे मंगळाचं गोचर जेव्हा जेव्हा मीन राशीतून, कर्क राशीतून, वृश्चिक राशीतून होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला या वर्षी अचानक धनलाभ प्राप्त होण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. कारण दशमेश हा तुमचा कर्मेश असतो. त्याच्यावर गुरु महाराजांची शुभ दृष्टी दशम स्थानावर पडतेच आहे आणि गोचरने मंगळ साधारपणे दीड महिन्यात राशी परिवर्तन करतो. तर गुरु महाराज तेरा महीने एका राशीत विराजमान असतात. त्यामुळे मंगळ जेव्हा जेव्हा गुरु महाराजांच्या दृष्टीत येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला विशेष लाभ प्राप्त होईल. त्याहुन महत्त्वाची बाब म्हणजे या लाभाची दिशा ही मुख्यत: आर्थिक असेल. थोडक्यात धन स्थानात येणारे गुरु महाराज तुम्हाला भरभरुन धनलाभ प्रदान करणार आहेत. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा.

उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक असे छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे कोणीही अगदी सहज करु शकतो. त्यासाठी विशेष असं काहीच करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. फक्त अट एकच की पूर्ण श्रद्धेने ते उपाय करायला हवेत. त्यानुसार कुंभ राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता कुंभ जातकांनी वृद्धाश्रमामध्ये जेवण द्यावे. कारण तुमच्या द्वितीय स्थानात गुरु महाराज प्रवेश करणार आहेत. तिथे ते मीन या आपल्या स्वराशीत असणार आहेत. त्यानुसार तुम्ही वृद्धाश्रमात अन्नदान करावं. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.

अशाप्रकारे गुरु परिवर्तनाचे कुंभ राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

धन्यवाद!

 

शुभम भवतु! 

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *