गुरु परिवर्तन मेष रास
लाभासह भाग्यही घालेल साद
ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर मेष राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. ग्रहांचं भ्रमण व त्यामध्यमातून विविध राशींमध्ये त्यांचा होणारा प्रवेश हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. काही ग्रहांचा परिणाम तर दीर्घकाळ होणारा असतो. कारण ते एका राशीत दीर्घकाळ विराजमान असतात. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे ग्रह म्हणजे गुरु महाराज होय. ते आपल्या ग्रहमालेतील सर्वात शुभ ग्रह मानले जातात. मनुष्याला आयुष्यातील प्रत्येक वळणावर गुरु ग्रहाचं सहकार्य आवश्यक असतं. म्हणजे जन्म, शिक्षण, करिअरच्या माध्यमातून अर्थार्जन, विवाह, धर्म, संतती, भाग्य, धार्मिक-आध्यात्मिक विचार अशा विविध गोष्टींनी यशस्वी मानणसाचं आयुष्य घडत असतं. या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व एकाच ग्रहाकडे आहे. ते म्हणजे गरु महाराज होय.
आता आनंदाची बाब म्हणजे ते निसर्ग कुंडलीच्या लाभ स्थानात जाणार आहेत. लाभ हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्या स्थानाला गुरु महाराजांचं नैसर्गिक स्वामीत्व देखील लाभलेलं आहे. लाभ स्थान हे प्रत्येक गोष्टीत वाढ दर्शवितं. कौटुंबिक वाढ, एखादी इच्छापूर्ती होणं, आर्थिक लाभ प्राप्त होणं अशा गोष्टी तेथून घडतात. त्यात गुरु महाराज हे लाभाचे कारक ग्रह आहेत. म्हणजे लाभाचा कारक ग्रह लाभ स्थानात आता जाणार आहे. जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. ही विशेष शुभ बाब २० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी होणार आहे.
या दिवशी गुरु महाराज मकर या नीच राशीतून कुंभ या वायुतत्त्वाच्या राशीत जातील. या दोन्हीही राशी शनि महाराजांच्या आहेत. मात्र मकर आणि कुंभ राशीमध्ये काही मुलभूत फरक आहेत. मकर ही श्रमीक रास मानली जाते तर कुंभ ही बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. ज्ञानाचे कारक ग्रह असल्यामुळे गुरु महाराजांना बुद्धिमान असलेली कुंभ रास बर्यापैकी मानवते. तर मकर रास अजिबात मानवत नाही. अजून एक बाब म्हणजे कुंभ राशीनंतर मीन रास येणार असते. जी गुरु महराजांची रास आहे. कुंभ राशीतून जेव्हा त्यांचं मार्गक्रमण सुरु असतं तेव्हा त्यांना आपल्या घराचे वेध लागतात. स्वराशीकडे जाणारा ग्रह हा कुठेतरी आनंदात असतो की मी आता फिरुन फिरुन खूप थकलो. आता मी माझ्या घरी जाणार आहे. त्याचं देखील एक शुभत्व प्राप्त होतं. याशिवाय निसर्ग कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा कुंभ राशीत गुरु अकरावे होतात. ते स्थान गुरु महाराजांना विशेष मानवतं. कारण ते लाभ आणि इच्छापूर्तीचं स्थान आहे. शिवाय गुरु महाराजांचं सगळ्यात मोठं कारकत्व काही असेल तर गुरु म्हणजे देणारा, गुरु म्हणजे दाता होय. त्यामुळे लाभ आणि इच्छापूर्ती करणं हे त्यांचं नैसर्गिक कारकत्व ठरतं. नेमक्या त्याच स्थानात आता गुरु महाराज जाणार आहेत. त्यामुळे मागील काही काळात समाजात जी मरगळ आलेली आहे, ती आता दूर होऊ शकते. सोबतच आर्थिक बाबींना गती प्राप्त होईल. थोडक्यात, गुरु महाराजांच्या या राशी परिवर्तनाचे अत्यंत शुभ परिणाम विविध राशींवर होणार आहेत. त्यातल्या त्यात काही राशींसाठी हे राशी परिवर्तन विशेष भाग्योदयाचं, प्रगतीचं ठरणार आहे. काही राशींसाठी हे गोचर प्रचंड मोठा आर्थिक लाभ प्राप्त करुन देईल. कौटुंबिक लाभ देईल. किंबहूना काही राशी ज्या मागील काही वर्षांपासून अत्यंत त्रासात आहेत, त्यांच्यासाठी सौख्याचे, प्रगतीचे दरवाजे घडतील. त्यात मेष राशीवर गुरु महाराजांच्या या गोचरचा काय परिणाम पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराजाचं हे गोचर मेष जातकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कारण मेेष राशीसाठी गुरु महाराज हे भाग्येश आणि व्ययेश आहेत. भाग्येश असलेल्या गुरु महाराजांचं लाभ स्थानात आगमन होणार आहे. पत्रिकेतील लाभ स्थान हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. म्हणजे मानवी मनात ज्या विविध इच्छा असतात, काही व्यक्त असतात तर काही अव्यक्त देखील असतात. त्या पूर्ण करण्यासाठीच सर्व ग्रह एकदा गोचरीने लाभ स्थानात येतात आणि त्यांचे ते कार्य संपन्न करतात. म्हणजे जातकाला लाभ प्राप्त करुन देतात, इच्छापूर्ती करुन देतात. दुसर्या भाषेत सांगायचं झाल्यास ब्रम्हदेव जेव्हा एकाद्या ग्रहाला एकादश स्थानात पाठवतात तेव्हा ते ग्रहाला सांगून पाठवतात की तुला जातकाची इच्छापूर्ती करायची आहे. अन्यथा गुरु महाराज ज्या स्थानात बसतात त्या स्थानाचा नाश करतात आणि ज्या स्थानावर दृष्टी टाकतात त्या स्थानाची शुभ फळं देतात. मात्र अकराव्या स्थानातून गोचर करीत असतांना त्या स्थानाची देखील ते शुभ फळंच देणार आहेत.
गुरु महाराजांची दृष्टी ही अमृततुल्य मानली जाते. पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या त्यांना असतात. म्हणजे पत्रिकेतील बारा स्थानांपैकी चार स्थानं गुरु महाराजांमुळे शुभ होणार आहेत. साहजिकच त्याचे अत्यंत शुभ परिणाम मेष जातकांना प्राप्त होणार आहे. मुख्य म्हणजे लाभात वृद्धी होणं, त्यानंतर परिश्रमांना योग्य दिशा प्राप्त होऊन त्याच्यातून देखील लाभ प्राप्त होईल. कारण गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या तृतीय म्हणजे परिश्रमाच्या स्थानावर पडणार आहे. जी परिश्रमातून आर्थिक लाभ सूचित करीत आहे. यानंतर त्यांनी सप्तम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडणार आहे. तिचा परिणाम म्हणजे शिक्षणात यश, संततीच्या कर्तृत्वात वाढ होणं किंवा ज्या घरात पाळणा हलण्याची वाट बघितली जात असेल त्यांची इच्छापूर्ती होणं. असे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. याशिवाय गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडते आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान हे आयुष्याचा जोडीदार, व्यावसायिक भागिदाराचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्या दृष्टीने देखील अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. गेली काही महीने जोडीदारासोबत तुमचा सातत्याने विसंवाद सुरु होता. त्याचं आता सुसंवादात रुपांतर होईल. एकाचवेळी पंचम आणि सप्तम स्थानावर दृष्टी पडत असल्यामुळे ज्या प्रेमवीरांना आपल्या प्रेमाचं रुपांत विवाहात करायचं असेल त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आहे. कारण लाभ स्थानातून गुरु महाराज तुमच्या तृतीय, पंचम आणि सप्तम या तीन स्थानांवर दृष्टी टाकत आहेत. प्रेम विवाह करण्यासाठी एक इच्छाशक्ती असावी लागते. ती तृतीय स्थानातून व्यक्त होते. तिथे देखील गुरु महाराजांची शुभ दृष्टी पडत आहे.
एकंदरीत विचार केला असता प्रवासाचे योग निर्माण होणं, कर्तृत्वात वाढ होणं, शिक्षणात यश मिळणं, इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त होणं, संतती सौख्य प्राप्त होणं, कुटुंबात संततीचं आगमन होणं, उपवर जातकांचे विवाह जुळून येणं, घरात शांतता व सौख्याचं वातावरण वाढणं, आर्थिक लाभ प्राप्त होणं या सर्व बाबी गुरु महाराजांच्या या गोचरमुळे होणार आहेत. ज्यांचा मेष जातकांनी पुरेपुर लाभ घ्यायला हवा.
येथे अजून एक बाब महत्त्वाची आहे. ती म्हणजे गुरु महाराजांचं गोचर हे मीन राशीत होणार आहे. मीन ही गुरु महाराजांची स्वत:ची रास आहे. कदाचित म्हणून असेल की त्यांना स्वत:च्या घरी जाण्याची विशेष ओढ लागलेली आहे. ऐरवी तेरा महिने एका राशीत राहणारे गुरु महाराज अतिचार गतीने १३ एप्रिल २०२१ रोजी स्वत:च्या मीन राशीत जातील. थोडक्यात काय तर आपल्या गोचर मध्ये ते १३ महिन्यात जे काम करीत असतात ते आता पुढील सहा महिन्यात भरभर पूर्ण करतील आणि पुढच्या प्रवासाला निघतील. ते अतिशय आनंदात असतील की आपण आपल्या घरी जातोय. नीच राशीतून ते आता आपला प्रवास संवणार आहेत. जिथे त्यांना अजिबात मानवत नव्हतं. आता ते कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. ती वायुतत्त्वाची बुद्धिमान रास असली तरी ती शनि महाराजांची रास आहे. गुरु आणि शनि यांच्यात समत्वाचं नातं आहे. त्यानंतर मात्र गुरु महाराजांचा स्वत:च्या घरी जाण्याची ओढ लागल्यामुळे अतिचार गतीने ते स्वत:च्या राशीत प्रवेश करतील. मधला हा जो कालखंड आहे तो मेष राशीसाठी अनेक दृष्टीने लाभाचा, भाग्याचा, इच्छापूर्तीचा, स्वप्नपूर्तीचा ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मेष जातकांना भाग्याकडून असहकार्य प्राप्त होत होतं. त्याला छेद देऊन भाग्याचं संपूर्ण सहकार्य मिळवून देणारं असं हे गुरु महाराजाचं गोचर आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत मकर राशीत शनि महाराज त्यांचा नीचभंग करीत होते. शनि महाराज तिथेच असून गुरु महाराज राशी परिवर्तन करीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. तसेच पुढील वर्षी १३ एप्रिलला ते मीन राशीत प्रवेश करतील. त्यानंतर लगेचच म्हणजे २९ एप्रिल २०२२ रोजी शनि महाराज देखील राशी परिवर्तन करुन कुंभ राशीत प्रवेश करतील. ती एक खूप सुंदर ग्रहस्थिती असेल. त्यांच्या परिणामाचं देखील आपण निश्चितच विश्लेषण करणार आहोत. कारण गुरु महाराज स्वराशीचे आणि शनि महाराज मूळ त्रिकोण राशीचे ही एक खूप सुंदर ग्रहस्थिती तेव्हा निर्माण होणार आहे. गेली काही वर्ष, काही दिवस सर्वांनाच जो एक सामुहिक त्रास होतो आहे, त्या त्रासातून सुटका होऊन एका शुभ स्थितीकडे वाटचाल सुरु होणार आहे. योग्य वेळी त्यावरही आपण स्वतंत्रपणे विडिओ नक्कीच देऊ.
एकंदरीत मेष राशीसाठी हा अत्यंत उत्तम कालखंड असणार आहे. मेष जातकांनी याचा पुरेपुर लाभ घ्यावा. या शुभ काळाची शुभता अजून जास्त वाढविण्यासाठी एक अत्यंत छोटा उपाय मेष जातकांनी अवश्य करायला हवा. तो म्हणजे दररोज सकाळी कपाळाला केशरचा टिळा लावावा. जेणे लाभात बसलेला भाग्येश भाग्याने तुमच्या लाभात वृद्धी करत राहिल.
एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
९८५००९८६८८