Skip to content
Home » शनि परिवर्तन – मीन रास

शनि परिवर्तन – मीन रास

शनि परिवर्तन – मीन रास

यशासह संघर्षाची स्थिती

सुरु होईल साडेसाती

 

नमस्कार!

      मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बऱ्याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या मीन राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

      ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. #drjyotijoshi

      एक महत्त्वाचा विषय म्हणजे शनि महाराजांना राशीचक्र फिरण्यासाठी २९ ते ३० वर्ष लागतात. म्हणजे तब्बल ३० वर्षांनी शनि महाराज कुंभ या आपल्या आवडीच्या राशीत प्रवेश करणार आहेत. मात्र लगेचच काही दिवसांनी पुन्हा एकदा वक्री होऊन मकर राशीत परत जातील. आपल्या आवडत्या घरातून बाहेर निघायला फारसं कुणाला आवडत नाही. शनि महाराजांनाही ते आवडणार नाही. तरीही आपल्या अपूर्ण राहिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी ते मागे येतील. १२ जुलै २०२२ रोजी ते मकर राशीत आले की जानेवारी २०२३ पर्यंत ते तिथेच राहतील. त्यानंतर पुन्हा एकदा ते कुंभ राशीत येतील. तेव्हा त्यांची शुभता बऱ्यापैकी वाढलेली असेल. आता आपण राशीनुसार जेव्हा त्यांच्या फळांचा विचार करु तेव्हा आपल्याला त्यांच्या या दोन्ही गोचरचा विचार करावा लागेल. तरच आपण योग्य फलकथनार्पंत पोहचू शकू. तेव्हाच तुमच्या राशीसाठी त्यांची काय भूमिका असेल? हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. त्यानुसार तुम्ही आपल्या कार्याचं, उपायाचं योग्य ते नियोजन करु शकाल आणि शनि महाराजांच्या या प्रवासाची सुखद फळं मिळवू शकाल. अजून एक बाब म्हणजे जे जेष्ठ व्यक्ती आहेत म्हणजे वयवर्ष ४५ च्या किंवा ५० च्या पुढील जे आहेत त्यांनी ३० वर्षापूर्वीच्या काळातील त्यांचं आयुष्य आठवून घ्यावं. त्याच पद्धतीने सर्वसामान्य परिणाम तुमच्यावर पुन्हा घडून येतील. अर्थातच थोडा फरक हा असतो की तेव्हाची महादशा वेगळी असेल आणि आताची महादशा वेगळी असेल. कोणताही ग्रह महादशानाच्या अनुषंगाने फळं देत असल्यामुळे त्यानुसार थोडा फरक निश्चित घडून येईल. मात्र त्याची मूळ प्रवृत्ती तिच राहते. म्हणजे तुम्ही मूळ अभ्यास केला की शनि काय फळं देणार आहे? तर तुम्ही ३० वर्षांपूर्वीचं आयुष्य आठवून घ्या. तुम्हाला तीच फळं लक्षात येतील. एकंदरीत शनि महाराजांची साडेसाती, त्यांची ढैय्या, त्याचं राशी परिवर्तन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो.

      शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते.

      मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा प्रगतीचा, यशाचा, विविध मार्गानी आर्थिक लाभ देणारा, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करणारा असतो. तर दुसरा टप्पा मात्र संघर्षाचा जातो. या काळात जातक एकटा पडतो. मनात निराशा उत्पन्न करतो. या काळात मीन जातकांनी जर स्वत:च्या मानसिक ताकदीतून संघर्ष करुन स्वत:च्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या तर शेवटचा म्हणजे तिसरा टप्पा उत्तम जातो. अन्यथा मीन जातकांना साडेसातीचा सर्वात जास्त त्रास शेवटच्या टप्प्यात होतो. आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदाऱ्या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. #drjyotijoshi

      आता आपण तुमच्या मीन राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया.

      मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराजांनी आता राशी परिवर्तन केल्यानंतर तुमच्या राशीला त्यांनी साडेसाती सुरु होणार आहे. आतापर्यंत ते तुमच्या लाभ स्थानातून प्रवास करीत होते. त्यांचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत लाभकारक व इच्छापूर्ती करणारं ठरलं आहे. त्याचे शुभ परिणाम तुम्हाला निश्चितच प्राप्त झाले असतील. आता २९ एप्रिल रोजी शनि महाराज कुंभ राशीत म्हणजे तुमच्या व्यय स्थानात प्रवेश करणार आहेत. मी तुम्हाला आधीही सांगितलं की कुंभ रास ही शनि महाराजांची आवडती व मूळत्रिकोण रास आहे. त्यामुळे मकर राशीपेक्षा कुंभ राशीतील शनि महाराजांची शुभ फळं अधिक मिळतात. असं असलं तरी आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील व्यय स्थान हे नकारात्मक स्थान मानलं जातं. परिणामी शनि महाराज आवडत्या राशीत असले तरी त्यांचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडेल.

      महत्त्वाची बाब म्हणजे येथून तुम्हाला साडेसातीचा पहिला टप्पा देखील सुरु होईल. त्याचा त्रास देखील तुम्हाला कुठेतरी जाणवणार आहे. तरीही मीन जातकांनी या सर्व प्रश्नांची अजिबात काळजी करु नये. कारण याच काळात तुमचे राशी स्वामी गुरु महाराज हे तुमच्या राशीतच येऊन बसलेले आहेत. तिथे ते हंस योगाचे निर्माण करीत आहेत. जो पंचमहापुरुष योगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यामुळे शनि महाराजांनी व्यय स्थानातून थोडा संघर्ष जरी वाढवला तरी तुमचे राशी स्वामी त्या संघर्षाचा सामना करण्याचं बळ तुम्हाला प्रदान करतील. थोडक्यात शनि महाराजांचं गोचर अशुभ स्थानातून असलं, साडेसातीची सुरुवात होणार असली तरी तुम्ही या काळात धैर्याने वाटचाल करायला हवी. प्रामाणिकपणे आपलं काम करायला हवं. तेच तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. #bestastrologerinmaharashtra

      व्यय स्थानातून शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या कुटुंब स्थानावर पडणार आहे. मीन राशीसाठी शनि महाराज हे कारक ग्रह नाहीत. अकारक ग्रह आणि व्यय स्थानातून त्याची पडणारी दृष्टी यामुळे कौटुंबिक विवाद उत्पन्न होणं, चर्चा भरकटली जाणं, कुटुंबात विसंवाद निर्माण होऊ शकतात. किंबहूना या काळात आर्थिक हानी होण्याची योग देखील निर्माण होण्याची संभावना नाकारता येणार नाही. सोबतच तुमच्या वाणीत उग्रता येईल. त्याचाही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात शनि महाराजांची ही दृष्टी तुमच्यासाठी अशुभ फलदायी ठरणार आहे. त्यामुळे द्वितीय स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व गोष्टींची तुम्ही अत्यंत जागरुक राहून काळजी घ्यायला हवी. तेच तुमच्यासाठी उपयुक्त राहिल.

      यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल. पत्रिकेतील षष्ठ स्थानावरुन आपण नोकरी, आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रु या सर्व गोष्टी बघतो. ही दृष्टी व्यय स्थानातून पडणारी व्ययेशाची दृष्टी असल्यामुळे मीन जातकांना परदेशात नोकरीची संधी मिळू शकते. तसे योग तुमच्यासाठी तयार होतील. त्यामुळे जे मीन जातक नोकरीच्या उद्देशाने परदेशात जाण्यास इच्छुक असतील त्यांनी या काळाचा सदुपयोग करत त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवायला हवेत. स्पर्धक व हितशत्रुंना पराभूत करुन तुम्ही यशाचा पल्ला गाठणार आहात. नोकरीमध्ये तुम्ही कर्तृत्व गाजविणार आहात. अशा छोट्या मोठ्या लाभदायक घटना या काळात तुमच्यासाठी घडू शकतात. थोडक्यात शनि महाराजांची ही दृष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तिचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा.

      यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या भाग्य स्थानावर पडेल. शनि महाराज स्वराशीत असले तरी ते व्यय स्थानात विराजमान असतील. या दृष्टीचा परिणाम म्हणजे तुम्ही धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकतात. आध्यात्मिक दृष्टीने वाटचाल करणार आहात. आध्यात्मिक दृष्टीने जेव्हा आपण ग्रहांचा विचार करतो तेव्हा गुरु, शनि, केतु आणि चंद्र हे चार ग्रह अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. पूर्नजन्माचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा देखील याच चार ग्रहांची स्थिती बघितली जाते. या सर्व दृष्टीने विचार केला असता शनि महाराज तुमच्या व्यय स्थानात प्रवेश करणार आहेत. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या भाग्य म्हणजे धर्म स्थानावर पडणार आहे. या स्थानावरुन आपण पूर्नजन्म देखील बघत असतो. त्यामुळे शनि महाराजांची दृष्टी ते स्थान समृद्ध करणार आहे. या काळात तुमच्या हातून लहान-मोठ्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन घडून येणं, धर्मासाठी काही खर्च होणं, धर्मासाठी महत्त्वाचं म्हणून तुमचं नाव पुढे येणं, समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा लाभणं यासारखे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. #bestastrologerinmaharashtra

      एकंदरीत विचार केला असता मीन राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होईल. तरी तुम्ही घाबरुन जाऊ नये. कारण साडेसाती ही सगळ्यांनाच काही वाईट जात नाही. किंबहूना साडेसातीमध्ये ज्यांनी दैदिप्यमान प्रगती केली आहे अशा शेकडो लोकांची नावे मी तुम्हाला अगदी तोंडी देखील सांगू शकते. कारण साडेसाती ही तुम्हाला कर्तव्य शिकविण्यासाठी, जबाबदारींची जाणीव करुन देण्यासाठीच लागलेली असते. त्यामुळे साडेसाती सुरु झाल्यावर तुम्ही प्रामुख्याने कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, तर ते म्हणजे कर्तव्य, जबाबदार्‍यांकडे द्या. ते जर तुम्ही केलं तर यश तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊ शकतं.

      १२ जुलै २०२२ रोजी शनि महाराज वक्री होऊन पुन्हा एकदा मागच्या राशीत तुमच्या तुमच्या लाभ स्थानात प्रवेश करतील. १७ जानेवारी २०२३ पर्यंत ते तिथेच विराजमान असतील. या काळात ते तुमच्यासाठी पुन्हा एकदा लाभाच्या, इच्छापूर्तीच्या भरभरुन संधी निर्माण करतील. लाभ स्थानातून शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या राशीवर, सप्तम दृष्टी पंचम स्थानावर आपण दशम दृष्टी अष्टम स्थानावर पडेल. या सर्व स्थानांची अत्यंत शुभ फळं १२ जुलै २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या काळात प्राप्त होतील. कारण तेव्हा शनि महाराज मकर या आपल्या स्वराशीत आणि लाभ स्थानात असतील. जे उपचय स्थान असल्यामुळे शनि महाराजांना विशेषत्वाने मानवतं. मात्र त्यापूर्वी आताचं गोचर जेव्हा आपण पाहतो तेव्हा लाभ आणि व्यय या दोन स्वस्थानांची फळे ते तुम्हाला देतील. याशिवाय आपल्या दृष्टीद्वारे द्वितीय, षष्ठ आणि भाग्य स्थानाची फळे देखील ते तुम्हाला प्रदान करतील. #astrogurudrjyotijoshi

      शनि महाराज हे तुमच्या राशी स्वामीचे समग्रह म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्याकडून अधिक शुभ फळांची अपेक्षा मीन जातकांनी करु नये. या काळातील सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे तुमचा राशी स्वामी राशीत येणार आहे. १३ एप्रिलाच गुरु महाराज तुमच्या राशीत प्रवेश करुन तिथे हंस योगाचे निर्माण करतील. त्याची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. ज्योतिष नियमांनुसार राशी स्वामी जेव्हा भक्कम अवस्थेत असतो तेव्हा इतर ग्रहांकडून योग्य ते सहकार्य मिळालं किंवा नाही मिळालं तरी जातकाला त्याचा भरभरुन लाभ प्राप्त होतो. कारण राशी स्वामी जेव्हा स्वत: बळकट असतो तेव्हा इतर छोटे मोठे प्रश्न सोडविण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतं. मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता आधी सांगितल्याप्रमाणे १३ एप्रिल रोजीच गुरु महाराज तुमच्या राशीत प्रवेश करणार आहेत. सोबत शुक्र ग्रह देखील तिथे येऊन उच्चीचा होणार आहे. त्यांच्या या स्थितीचे तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होतील.

      शनि महाराजांची देखील काही प्रमाणात तुम्हाला शुभ फळं निश्चितच मिळतील. मात्र काही बाबतीत जसं मी आता तुम्हाला सविस्तर माहिती दिली त्या सर्व बाबींमध्ये अशुभ फळांचं प्रमाण निश्चितच वाढलेलं असेल. या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात मीन जातकांनी महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. #astrogurudrjyotijoshi

      अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन मीन राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन विषयाला घेऊन आपण पुन्हा भेटूया. तसेच सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मन:पूर्वक आभार! तुम्हा सर्वांच्या सहकार्याने शास्त्राच्या प्रचार-प्रसाराच्या कार्यात बरीच प्रगती होत आहे. अनेक ज्योतिषप्रेमींच्या मनात शास्त्राला घेऊन जागरुकता वाढत आहे. आवड वाढत आहे. व्हिडिओच्या खालील कमेंट्स, फोन, व्हॉट्सअ‍ॅप, मेल अशा विविध माध्यमातून ज्योतिषप्रेमी माझ्याशी संपर्क साधतात. परंतु मी तुम्हाला एक विनंती करु इच्छिते की तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा किंवा अत्यावश्यक असेल तर व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज करत चला. त्यावर तुम्हाला रिप्लाय अवश्य दिला जाईल. फोन मी उचलू शकत नाही. मला ते शक्य देखील होत नाही. कारण तेवढा वेळ नसतो. म्हणून सर्व ज्योतिषप्रेमींना नम्र विनंती आहे की तुम्ही फक्त आणि फक्त व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माझ्याशी संपर्क साधावा.

धन्यवाद!

 

शुभम भवतु!  

अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *