Skip to content
Home » गुरु परिवर्तन – धनु रास

गुरु परिवर्तन – धनु रास

  • by

कर्मातून साधाल उन्नती

मिळेल सुखाची प्राप्ती

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रह सातत्याने भ्रमण करतात. गोचरद्वारे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांचे विश्लेषण आपण करतच असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामध्ये नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे अनेक अर्थाने सर्वच राशींसांठी अत्यंत शुभ ठणार आहे. कारण ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. १३ एप्रिल रोजी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होणार असून त्यांच्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण आपण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण धनु राशीसाठी गुरु महाराजाचं हे राशी परिवर्तन कसं राहिल? यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुरु ग्रह व त्यांच्या कारकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणे आवश्यक आहे. मानवी आयुष्यात जीवकारक गुरुचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. गुरु म्हणजे जीव होय. मानवी आयुष्याची निर्मिती जेथून होते तेथून गुरु ग्रहाचं कार्य सुरु होतं. म्हणजे मनुष्याच्या जन्मापासून तर शेवटापर्यंत गुरु ग्रहाचं कार्य अत्यंत महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण पत्रिकांचा अभ्यास करतो तेव्हा अनेक बाबी लक्षात येतात. गुरु हा जन्माचा, शिक्षणाचा, विवाहाचा, अर्थार्जनाचा आणि मोक्षाचा कारक ग्रह मानला जातो. थोडक्यात मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग गुरु ग्रहाने व्यापलेले आहेत. निसर्ग कुंडलीचा आपण विचार केला भाग्य स्थानाचं स्वामीत्व गुरु महाराजांकडे आहे. भाग्य, धर्म, लांबचे प्रवास आपण भाग्य स्थानावरुन पाहत असतो. गुरु महाराजांची धनु रास ही निसर्ग कुंडलीच्या नवम स्थानात येते. त्यामुळे या स्थानाचं स्थायी स्वामीत्व गुरु महाराजांकडे आहे. धर्माने जगा आणि मोक्षाकडे चला असे आपल्याला सूचित करीत असतात. कारण मोक्षाच्या स्थानाचं म्हणजे पत्रिकेतील द्वादश स्थानाचं स्वामीत्व देखील गुरु महाराजांकडे येतं. निसर्ग कुंडलीतील नवम म्हणजे भाग्य स्थान आणि द्वादश म्हणजे व्यय स्थानाचं स्वामीत्व गुरु महाराजांकडे आहे. कारण नवम स्थानात धनु तर व्यय स्थानात येणारी मीन रास या दोन्हीही गुरु महाराजांच्या राशी आहेत.

असे हे गुरु महाराज चतुर्थ स्थानात कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतात. कर्क रास ही मातृत्व दर्शविणारी रास आहे. सुख, समाधान, शांती या सर्व गोष्टी आपण पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरुन पाहतो. म्हणून त्याला सुख स्थान देखील म्हटलं जातं. मनुष्य आपल्या आयुष्यात जी काही धावपळ करतो, जे काही कार्य करतो त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक सुप्त इच्छा असते की मी सुखानं राहावं. पैशांच्या मागे पळत असतांना, शिक्षण घेत असतांना, कर्तृत्व करीत असतांना, विवाह करीत असतांना प्रत्येक वेळी माणसाच्या मनात एक सुप्त इच्छा असते की यानंतर माझं आयुष्य चांगलं व्हावं. सुखाने, समाधानाने, आनंदाने मला जगता यावं. असं हे पत्रिकेतील सुख स्थान जे निसर्गच तुम्हाला जन्मत: देऊन पाठवतो त्या स्थानात गुरु महाराज उच्चीचे होतात. कारण तुम्ही सुखाने, आनंदाने राहिलात तर गुरु महाराजांना देखील आनंद होतो. असे हे गुरु महाराज १३ एप्रिल रोजी कुंभ राशीतून मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा धनु राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

धनु रास किंवा लग्नाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी गुरु महाराजांचं स्थान व त्याचं गोचर हे नेहमीच अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. कारण ते तुमच्या राशीचे स्वामी आहेत. किंबहूना गुरु महाराजांची मूळ त्रिकोण रास म्हणजे धनु रास होय. तसेच चतुर्थ स्थानाचं स्वामीत्व देखील त्यांच्याकडेच आहे. म्हणजे ते तुमचे राशी स्वामी किंवा लग्नेश व चतुर्थेश आहेत. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे चतुर्थेश चतुर्थात ही स्थिती निर्माण होणार असून ती तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहिल. याशिवाय चतुर्थ स्थान हे केंद्र स्थान मानलं जातं. अशा या केंद्र स्थानात येणारा गुरु हा अनेक दोषांचा नाश करीत असतो. महत्त्वाची बाब म्हणजे गुरु महाराजांद्वारा तिथे पंचमहापुरुष योगांपैकी एक असलेल्या हंस योगाची निर्मिती होणार आहे. जो अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यादृष्टीने देखील तुम्हाला अत्यंत शुभ फळांची प्राप्ती होईल.

पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरुन वास्तु, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य या गोष्टी बघितल्या जातात. मागील काही वर्षांचा विचार केला असता या गोष्टी धनु राशीच्या वाट्याला फारशा आलेल्या नाहीत. या सर्व दृष्टीने तुम्ही संघर्ष करीत आलेला आहात. मात्र आता गुरु महाराजांच्या कृपेमुळे परिस्थितीत खूप मोठा बदल घडून येईल आणि चतुर्थ स्थानाच्या कारकत्वाने येणारी सर्व सौख्ये तुम्हाला भरभरुन प्राप्त होतील. म्हणजे उत्तम वास्तुयोग, वाहन योग निर्माण होतील. आईचं सौख्यही तुम्हाला लाभेल. घरातील सुखशांती अजून जास्त वृद्धींगत होईल. एकंदरीत गेली काही वर्ष तुम्ही जो त्रास सातत्याने सहन करीत होता, त्यातून तुमची कुठेतरी आता सुटका होईल. कारण गुरु महाराजाचं मागील गोचर हे तुम्हाला काहीसं त्रासदायक ठरलेलं आहे. शिवाय ते तुमचे राशी स्वामी असल्यामुळे त्यांच्या अशुभ स्थितीचा तुमच्यावर मोठा परिणाम झालेला होता. मात्र आता या सर्व परिस्थितीत मोठा बदल घडून येईल. चतुर्थ स्थानाची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतीलच. सोबतच राशी स्वामी प्रबळ झाल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही त्याचा खूप मोठा प्रभाव पडेल. म्हणून या स्थितीचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

गुरु महराजांचा केवळ एवढाच प्रभाव कधी पडत नसतो. कारण नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे आपल्या दृष्टींच्या साहाय्याने एकाच वेळी पत्रिकेतील अनेक स्थानं शुभ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. त्यांना पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन अत्यंत प्रभावशाली दृष्ट्या असतात. किंबहूना स्थानापेक्षा त्यांच्या दृष्टीला जास्त महत्त्व असतं. कारण गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. त्यानुसार चतुर्थातील गुरु महाराजांची पंचम दृष्टी अष्टम स्थानावर, सप्तम दृष्टी दशम स्थानावर आणि नवम दृष्टी व्यय स्थानावर पडेल. या सर्व दृष्ट्या तुम्हाला अनेक अर्थांनी अत्यंत लाभदायक ठरतील.

      गुरु महाराजांची पंचम दृष्टी अष्टम स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील अष्टम स्थान हे जरी नकारात्मक स्थान असलं तरी या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे तुम्हाला त्यापासूनही शुभ फळं नक्कीच प्राप्त होतील. त्यात जे जातक संशोधन क्षेत्राची संबंधित असतील त्यांना विशेष यश या काळात प्राप्त होईल. तुमच्या संशोधन कार्याला योग्य ती दिशा व गती प्राप्त होईल. कारण धनु रास ही मूळत: ध्येय निश्चित करुन त्यानुसार मार्गक्रमण करणारी रास म्हणून ओळखली जाते. एखादी गोष्ट ठरविल्यानंतर तिला पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहणे, हा तुमचा मूळ स्वभाव आहे. अशा कोणत्याही कार्यात जर तुम्ही मग्न असाल तर त्यात यश प्राप्त करण्याचा हा काळ असणार आहे. त्यामुळे या यशदायक काळाचा तुम्ही पुर्ण उपयोग करुन घ्यावा.

यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. व्यवसायातील प्रगती देखील याच स्थानावरुन बघितली जाते. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या अमृत दृष्टीमुळे तुमचे कर्म समृद्ध होणार आहेत. मूळातच धनु जातक हे अत्यंत कर्म प्रधान म्हणून ओळखले जातात. तुमचा तो स्वभाव या काळात अजून वृद्धिंगत होणार आहे. व्यावसायिक जातकांच्या व्यवसायात प्रचंड वृद्धी घडून येईल. व्यवसायात प्रगतीच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील. थोडक्यात गुरु महाराजांची दशम स्थानावर पडणारी दृष्टी तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी पोषक ठरणार आहे. विशेषत: तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असाल, मॅनेजमेंट क्षेत्रात असाल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करीत असाल तर ही दृष्टी तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरेल. तसेच ज्या जातकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर गुरु महाराजांच्या या गोचर काळात तुमचा व्यवसाय प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवेत. जेणे करुन यशाची टक्केवारी वाढू शकेल आणि जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होईल.

यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या व्यय स्थानावर पडणार आहे. व्यय म्हणजे खर्च होय. या स्थानावर पडणारी दृष्टी ही बऱ्याच गोष्टी अधोरेखित करीत असते. जसे की अनपेक्षितपणे येणारे खर्च, हॉस्पिटलचे खर्च, याशिवाय बंधन योग व परदेशगमन या गोष्टी व्यय स्थानावरुन पाहिल्या जातात. आजच्या काळात अनेक लोक परदेशातही वास्तव्याला असतात. त्यांच्या दृष्टीने हे गोचर विशेष लाभदायक ठरेल. कारण व्यय स्थानावर गुरु महाराजांची अमृत दृष्टी पडत असल्यामुळे परदेशात असलेल्या जातकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरेल. नोकरीत स्थैर्य प्राप्त होणं, व्यवसायात स्थैर्य प्राप्त होणं, विद्यार्थ्यांना शिक्षणात यश प्राप्त होणं, असे अनेक शुभ परिणाम परदेशातील धनु जातकांना प्राप्त होतील. त्याचा त्यांनी पुरेपुर लाभ घ्यायला हवा.

थोडक्यात प्रथम, चतुर्थ, अष्टम, दशम आणि व्यय अशी पत्रिकेतील एकूण पाच स्थानांवर गुरु महाराजांचा शुभ प्रभाव पडणार आहे. या पाचही स्थानांच्या कारकत्वानुसार तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होतील. जे तुमच्यासाठी उन्नतीदायक, प्रगतीदायक राहतील. तुमच्या कर्मात वृद्धी घडून येईल. सुख स्थानात येणारे गुरु महाराज तुम्हाला सुख प्रदान करतील. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्यायला हवा.

उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक असे छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे कोणीही अगदी सहज करु शकतो. त्यासाठी विशेष असं काहीच करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. फक्त अट एकच की पूर्ण श्रद्धेने ते उपाय करायला हवेत. त्यानुसार धनु राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता आधी सांगितल्याप्रमाणे धनु राशीच्या चतुर्थ स्थानात गुरु महाराज येणार असून तिथे ते हंस योगाचे निर्माण करणार आहेत. त्यानुसार तुम्ही घरगुती उपयुक्त वस्तू गरजवंतांना दान कराव्यात. जेणे करुन दैनंदिन जीवनात त्यांना त्यांचा उपयोग होऊ शकेल. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.

अशाप्रकारे गुरु परिवर्तनाचे धनु राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

धन्यवाद!

 

शुभम भवतु!

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *