शनि परिवर्तन – धनु रास
भाग्यासह यशाची प्राप्ती
साडेसातीतून थोडी मुक्ती
नमस्कार!
मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बऱ्याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या धनु राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.
ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. #bestastrologerinmaharashtra
आपल्याला माहितीच असेल की शनि महाराज हे सर्वात मंद ग्रह आहेत. तब्बल अडीच वर्ष ते राशीत विराजमान असतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या स्थितीचा प्रभाव हा जातकावर अडीच वर्ष असतो. म्हणूनच त्यांचं राशी परिवर्तन हे प्रत्येक राशीसाठी सदैवच महत्त्वपूर्ण असतं. शनि महाराज हे कर्म व न्यायाचे कारक म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणजे शनि देव होय. खरं सांगायचं तर शनि महाराजांबद्दल आपल्या समाजामध्ये समजापेक्षा गैरसमजच जास्त पसरलेले आहेत. भिती हे त्यामागील एक मोठं कारण असू शकतं. मात्र ज्याला शनि महाराज समजले, त्यांची कार्यपद्धती समजली त्याला माणूस समजला, त्याला ज्योतिषशास्त्र समजलं, असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांची कार्यपद्धती ही थोडी वेगळी आहे. तरीही अत्यंत सुसुत्रता असलेली कार्यपद्धती कोणत्या ग्रहाची असेल तर ते शनि महाराज होय. एखाद्या कामाला कितीही वेळ लागला तरी चालेल. मात्र ते काम अत्यंत पद्धतशीरपणे पूर्ण व्हायला हवं, अशी त्यांची मानसिकता असते. त्याला अनुसरुन शनि महाराज एका राशीत जवळपास अडीच वर्ष राहतात. म्हणूनच साडेसाती ही साडेसात वर्षांची असते.
शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते. #drjyotijoshi
मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार धनु राशीच्या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा हा संघर्षाचा असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करीत असतांना जातक नाकीनऊ येतो. या काळात एकीकडे खर्चाचं प्रमाण वाढलेलं असतं. तर दुसरीकडे त्या तुलनेत उत्पन्नाचा स्त्रोत कमी झालेला असतो. दुसऱ्या टप्प्यात मनात थोडी नकारात्मकता उत्पन्न होते. साडेसातीची भिती दाटून येते. कर्तव्याकडे पाठ फिरविण्याची मानसिकता तयार होते. ज्यामुळे त्रास अजून जास्त वाढतो. मात्र साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु झाल्यावर धनु जातकांना सुखद काळ मिळतो. या काळात साडेसातीचा त्रास बराच कमी झालेला असतो. आर्थिक प्रगती देखील सुरु होते. तेथून पुढील पाच वर्ष धनु जातकांना उत्तम प्रगतीचे प्राप्त होतात. #astrogurudrjyotijoshi
आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदाऱ्या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. यातही एक उपविभाग असा येतो की, नक्षत्र जसे बदलतात तसे साडेसातीचे प्रभाव देखील बदलतात. आता आपण विचार केला तर मकर राशीत जेव्हा शनि महाराजांनी प्रवेश केला सुरुवातीला रवि ग्रहाचं उत्तराषाढा नक्षत्र होतं. त्याच्या प्रभावानुसार साडेसातीचा प्रभाव जातकांवर झाला. रवि हा आत्माकारक ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या काळात माणसं अवस्थ झालीत. त्यानंतर चंद्राच्या नक्षत्रात शनि महाराजांनी प्रवेश केला. चंद्र हा मन आणि मातेचा कारक ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे माणसांची मनं विस्कळीत झाली. ज्याचा प्रभाव संपूर्ण मानवजातीवर झाला. आता शनि महाराज मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात आलेले आहेत. मंगळाचं हे नक्षत्र धन देणारं म्हणून ओळखलं जातं. मात्र शनि आणि मंगळ यांच्यात शत्रुत्वाचं नातं असल्यामुळे येथे एक विरोधाभास निर्माण होतो. मंगळ म्हणजे धडाडी आणि शनि म्हणजे शांतपणा असतो. मंगळ रोखठोक भूमिका घेणारा तर शनि शांत चालीने आपली कार्य करणारा असतो. हा विरोधाभास असल्यामुळे मंगळाच्या नक्षत्रात शनि महाराज आले की घात, अपघात निर्माण होण्याची शक्यता असते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. शांततेने प्रश्न सोडविण्यापेक्षा युद्धाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्यातून पुन्हा एकदा परिस्थिती अधिक बिघडते.
आता आपण तुमच्या धनु राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया. #bestastrologerinmaharashtra
धनु राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराजांकडे तुमच्या पत्रिकेतील द्वितीय आणि तृतीय या दोन स्थानांचं स्वामी आहे. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या या राशी परिवर्तनाबरोबरच तुमच्या राशीची साडेसाती देखील संपणार आहे. साडेसातीमध्ये सर्व परिक्षा घेऊन झाल्या, सर्व संकटे देऊन झालीत आणि आता कुठेतरी धनु राशीला सौम्य, लाभदायक फळं द्यावीत या उद्देशाने शनि महाराज तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील. शिवाय उपचय स्थान असल्यामुळे ते शनि महाराजांना विशेषत्वाने मानवतं. कारण ज्योतिष नियमांनुसार उपयच स्थानात पाप ग्रह शुभ फळं देतात. त्यानुसार या गोचरची तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होणार आहेत. शनि महाराजांचं हे स्वराशीतून, मूळत्रिकोण राशीतून होणारं गोचर खरं तर सर्वच राशींना फायदेशीर ठरणार आहे. त्यातही धनु राशीला त्याचा विशेषत्वाने लाभ होईल. कारण गत साडेसात वर्षांपासून तुम्ही संघर्ष करीत आहात. साडेसातीची वाटचाल तुम्ही पूर्ण केली आहे. अर्थात आधीही सांगितल्याप्रमाणे साडेसाती ही प्रत्येकाला वाईट जात नाही. किंबहूना अनेकांना ती लाभदायक, यशदायकही जाते. तुमच्या राशीसाठी साडेसाती कशी जाते? याचं विश्लेषण मी आधी केलेलंच आहे.
साडेसाती तुम्हाला जबाबदाऱ्या घ्यायला शिकवते. चंद्र म्हणजे मन आणि शनि म्हणजे जबाबदारी होय. मूळ पत्रिकेतील चंद्रावरुन जेव्हा शनिचं गोचर सुरु होतं तेव्हा शनि महाराज तुमच्या मनाला भौतिक आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पार करायला शिकवितात. मग ती जबाबदारी आई-वडील, जोडीदार, संतती अशा सर्वांप्रती असते. किंबहूना नातवंड, शेजारी, समाज, देश, मानवता अशा सर्वांप्रती देखील ती राहु शकते. मानवी आयुष्य म्हणून ज्या काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या तर शनि महाराज तुम्हाला दोन्ही हातांनी शुभ फळं द्यायला बाध्य होतात. तुमचे राशी स्वामी गुरु महाराज आणि शनि महाराज यांच्यात समत्वाचं नातं आहे. म्हणजे शनि गुरुला आपला मित्र मानतात. मात्र त्या तुलनेत गुरु शनिला मित्र मानत नाहीत. शनि महाराज त्यांच्या तर्फे तुमच्या राशीला फळं द्यायच्या विचारात असतात. कारण ते तुमच्या राशी स्वामीला मित्र मानतात. त्याची शुभ फळं देखील तुम्हाला प्रदान करतात. मात्र हे ही सत्य आहे की तुमच्या राशीला ते कारक ग्रह नाहीत. कारक नसल्यामुळे त्यांच्या शुभ फळं देण्याच्या सामर्थ्यात एक मर्यादा येते. त्या पद्धतीने त्यांचा प्रभाव तुमच्यावर होतो. तरी देखील आजच्या तारखेला आपण विचार केला तर सर्व राशींमध्ये सगळ्यात जास्त शुभ फळं धनु जातकांना प्राप्त होतील, हे आपण निश्चितपणे सांगू शकतो.
शनि महाराज आता तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत. मात्र तिथे ते अडीच वर्ष न राहता फक्त १२ जुलै पर्यंतच राहतील. त्यानंतर ते वक्री होऊन पुन्हा एकदा मकर राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करतील. तेथून पुन्हा तुम्हाला साडेसाती सुरु होईल. मात्र हा जो मधला कालखंड म्हणजे २९ एप्रिल ते १२ जुलै पर्यंतचा तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा, लाभदायक, प्रगतीदायक, सौख्यदायक असेल. किंबहूना पुढील कालखंड तुमच्यासाठी कसा राहिल? त्याचा हा छोटासा ट्रेलर असेल, असेही आपण म्हणू शकतो. असं म्हणतात की शनि महाराज जेव्हा द्यायला उठतात तेव्हा तुमचे दोन्ही हात कमी पडतात. तुमची झोळी फाटकी ठरते. कारण ते भरभरुन देतात. तर असे हे शनि महाराज तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत. अनेक प्रकारचे प्रवास या काळात तुम्हाला करावे लागू शकतात. त्यातूनही खूप मोठा लाभ तुम्हाला प्राप्त होईल.
आता आपण शनि महाराजांच्या दृष्ट्यांचा प्रभाव समजून घेऊया. तृतीय स्थानातून त्यांची तृतीय दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल. पत्रिकेतील पंचम स्थानावरुन शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी आपण बघतो. स्वराशी व मूळ त्रिकोण राशीतील शनि महाराजांची ही शुभ दृष्टी असल्यामुळे तिचे अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. मात्र शनि महाराजांची शुभ फळं मिळतील, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विलंब हा शब्द प्रत्येकाने स्वत: जोडून घ्यायचा आहे. अर्थात, पंचम स्थानाच्या कारकत्वानुसार शिक्षण, संतती, प्रणय या बाबतीत तुम्हाला शुभ फळं नक्कीच प्राप्त होतील. मात्र त्यात थोडा विलंब होईल. कारण विलंब हा शनि महाराजांचा स्थायी भाव आहे. #bestastrologerinmaharashtra
यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या भाग्य स्थानावर पडेल. जी तुमचं भाग्य समृद्ध करणार आहे. तिथे शनि महाराजांच्या आदर्श शत्रुची म्हणजे रवि ग्रहाची सिंह रास येते. तरी देखील येथे शनि महाराज योगकारक झालेले असतील. स्वत:च्या मूळ त्रिकोण राशीत ते असतील. त्यामुळे त्यांची भाग्य स्थानावर पडणारी दृष्टी तुमचं भाग्य समृद्ध करेल. सोबतच परदेशात जाण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात. ते बऱ्यापैकी स्ट्राँग आणि प्रगतीकारक असतील. कारण तृतीय स्थानातील शनि महाराजांची दृष्टी एकाच वेळी भाग्य आणि व्यय स्थानावर देखील पडते. परदेशगमन हा विषय जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यासाठी मुख्यत: तृतीय, नवम आणि द्वादश ही तीन स्थानं महत्त्वाची असतात. तृतीय स्थानातील शनि महाराज नवम आणि द्वादश या दोन्ही स्थानांवर दृष्टी टाकतात. म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकता. व्यवसायासाठी जाऊ शकता. नोकरीसाठी जाऊ शकतात. थोडक्यात तुम्ही कोणत्याही कारणासाठी परदेशात गेले तरी त्याची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढतील. #drjyotijoshi
यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या द्वादश स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील द्वादश स्थान हे व्यय स्थान म्हणून ओळखले जाते. तसेच आधी सांगितल्याप्रमाणे या स्थानावरुन परदेशगमन देखील बघितले जाते. व्यय स्थानाला आपण खरं तर नकारात्मक दृष्टीने बघतो. कारण व्यय म्हणजे खर्च, अनपेक्षित होणारे खर्च, हॉस्पिटलचे खर्च त्यावरुन बघितले जातात. मात्र तृतीय स्थानातून या स्थानावर पडणारी शनि महाराजांची शुभ दृष्टी ही तुमच्या परदेश प्रवासासाठी अत्यंत अनुकूल व प्रगदीदायक देखील ठरु शकते. अर्थात, काही खर्च निश्चितपणे होतील. मात्र शनि महाराज हे आपल्याला मार्गदर्शनच करीत आहेत की खर्च करा. जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पैसे कमविणं, त्याची बचत करणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकचं योग्य वेळी योग्य तितका पैसा खर्च करणं देखील महत्त्वाचं असतं. कारण पैसा हा माणसासाठी असतो. माणूस पैशांसाठी कधीही नसतो.
या सर्व बाबींचा जेव्हा आपण विचार करतो किंवा ही समज, हे ज्ञान शनि महाराज आपल्याला देतात, त्या सर्वांचा विचार आपण करतो तेव्हा व्यय स्थानावर पडणारी दृष्टी देखील तुम्हाला शुभता प्रदान करणार आहे. एकंदरीत तुमच्या तृतीय स्थानातून होणारं शनि महाराजांचं हे गोचर तुम्हाला भाग्यवर्धक, लाभवर्धक ठरेल. मात्र १२ जुलै रोजी शनि महाराज वक्री होऊन पुन्हा एकदा तुमच्या धन, कुटुंब, वाणीच्या स्थानात प्रवेश करणार आहेत. ग्रह वक्री अवस्थेत मागील राशीत जातो, म्हणजे त्याची काही तरी कामं तिथे अपूर्ण राहिलेली असतात, ती पूर्ण करण्यासाठी तो जातो. त्यानुसार मागील स्थानाची काही फळं वक्री अवस्थेतील ग्रह जास्त तीव्रतेने देतो. म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा साडेसाती सुरु होईल. त्यामुळे साडेसातीचे जे काही प्रभाव होते ते कदाचित अधिक तीव्रतेने तुमच्या समोर येतील. किंवा द्वितीय स्थानाशी संबंधित काही शुभ फळं देखील आहेत. कारण येथे पुन्हा शनि महाराजांचीच मकर रास येते. जी श्रमीक रास म्हणून ओळखली जाते. म्हणून त्याची शुभ फळं देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. मात्र जानेवारी २०२३ नंतर दीर्घकाळापर्यंत शनि महाराज तुम्हाला शुभ फळं देणार आहेत. आता केवळ त्याचा एक छोटासा ट्रेलर तुम्हाला बघायला मिळेल. त्यावरुन तुम्हाला भविष्यातील शुभ काळाचा अंदाज घेता येईल. #drjyotijoshi
या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात धनु जातकांनी कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन करावे. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. #astrogurudrjyotijoshi
अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन धनु राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.
धन्यवाद!
शुभम भवतु!
अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी