होईल थोडा विलंब जरी
शनि करतील प्रगती खरी
नमस्कार!
मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बऱ्याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या सिंह राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. #drjyotijoshi
ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. #bestastrologerinmaharashtra
आपल्याला माहितीच असेल की शनि महाराज हे सर्वात मंद ग्रह आहेत. तब्बल अडीच वर्ष ते राशीत विराजमान असतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या स्थितीचा प्रभाव हा जातकावर अडीच वर्ष असतो. म्हणूनच त्यांचं राशी परिवर्तन हे प्रत्येक राशीसाठी सदैवच महत्त्वपूर्ण असतं. शनि महाराज हे कर्म व न्यायाचे कारक म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणजे शनि देव होय. खरं सांगायचं तर शनि महाराजांबद्दल आपल्या समाजामध्ये समजापेक्षा गैरसमजच जास्त पसरलेले आहेत. भिती हे त्यामागील एक मोठं कारण असू शकतं. मात्र ज्याला शनि महाराज समजले, त्यांची कार्यपद्धती समजली त्याला माणूस समजला, त्याला ज्योतिषशास्त्र समजलं, असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांची कार्यपद्धती ही थोडी वेगळी आहे. तरीही अत्यंत सुसुत्रता असलेली कार्यपद्धती कोणत्या ग्रहाची असेल तर ते शनि महाराज होय. एखाद्या कामाला कितीही वेळ लागला तरी चालेल. मात्र ते काम अत्यंत पद्धतशीरपणे पूर्ण व्हायला हवं, अशी त्यांची मानसिकता असते. त्याला अनुसरुन शनि महाराज एका राशीत जवळपास अडीच वर्ष राहतात. म्हणूनच साडेसाती ही साडेसात वर्षांची असते. #drjyotijoshi
शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते.
मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा अनेक प्रकारे खर्च देणारा, जबाबदाऱ्या निभावतांना नाकीनऊ आणणारा असतो. दुसऱ्या टप्प्यात जातकाची मानसिकता कुठेतरी खालावते. व्यक्तिमत्त्व विस्कळीत होतं. योग्य निर्णय घेता येत नाहीत. तिसऱ्या टप्प्यात मात्र या जातकांची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती झालेली दिसून येते.
आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदाऱ्या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. यातही एक उपविभाग असा येतो की, नक्षत्र जसे बदलतात तसे साडेसातीचे प्रभाव देखील बदलतात. आता आपण विचार केला तर मकर राशीत जेव्हा शनि महाराजांनी प्रवेश केला सुरुवातीला रवि ग्रहाचं उत्तराषाढा नक्षत्र होतं. त्याच्या प्रभावानुसार साडेसातीचा प्रभाव जातकांवर झाला. रवि हा आत्माकारक ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या काळात माणसं अवस्थ झालीत. त्यानंतर चंद्राच्या नक्षत्रात शनि महाराजांनी प्रवेश केला. चंद्र हा मन आणि मातेचा कारक ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे माणसांची मनं विस्कळीत झाली. ज्याचा प्रभाव संपूर्ण मानवजातीवर झाला. आता शनि महाराज मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात आलेले आहेत. मंगळाचं हे नक्षत्र धन देणारं म्हणून ओळखलं जातं. मात्र शनि आणि मंगळ यांच्यात शत्रुत्वाचं नातं असल्यामुळे येथे एक विरोधाभास निर्माण होतो. मंगळ म्हणजे धडाडी आणि शनि म्हणजे शांतपणा असतो. मंगळ रोखठोक भूमिका घेणारा तर शनि शांत चालीने आपली कार्य करणारा असतो. हा विरोधाभास असल्यामुळे मंगळाच्या नक्षत्रात शनि महाराज आले की घात, अपघात निर्माण होण्याची शक्यता असते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. शांततेने प्रश्न सोडविण्यापेक्षा युद्धाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्यातून पुन्हा एकदा परिस्थिती अधिक बिघडते.
आता आपण तुमच्या सिंह राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया.
सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराजांचं मागील मकर राशीतील गोचर तुम्हाला बऱ्यापैकी लाभदायक ठरलं. कारण तुमच्या पत्रिकेत मकर रास षष्ठ या उपचय स्थानात येते. तुमचा राशी स्वामी रवि आणि शनि हे आदर्श शत्रु मानले जातात. त्यामुळे उपयच स्थान हे शनि महाराजांना विशेेषत्वाने मानवलं. परिणामी त्यांनी तेथून शुभ फळं तुम्हाला प्रदान केली. म्हणजे मागील गोचर बघितल्यास पंचमेश तुम्हाला सहकार्य करीत नव्हते. मात्र षष्ठेश आणि सप्तमेश असलेल्या शनि महाराजांकडून तुम्हाला बऱ्यापैकी सहकार्य मिळालं. ज्यामुळे तुम्हाला वाटचाल करणं सोपं झालं. आता जेव्हा २९ एप्रिल रोजी शनि महाराज राशी परिवर्तन करुन तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील. तिथे शनि महाराजांचीच कुंभ रास येते. जसं मी आधीही सांगितलं की शनि आणि रवि हे आपसात आदर्श शत्रु मानले जातात. सप्तम स्थानातील शनि महाराज शश योगाचे निर्माण करतील. जो पंचमहापुरुष योगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यामुळे अनेक सिंह जातक अत्यंत आनंदात असतील की माझ्या पत्रिकेत राजयोग निर्माण होईल आणि मला त्याची अत्यंत शुभ फळं प्राप्त होतील.
मात्र एक गोष्ट येथे आपण लक्षात घेतील पाहिजे की येथे हा राजयोग शत्रु ग्रहाद्वारे होणार आहे. मानवी आयुष्य आणि ग्रहांचं आयुष्य या फार काही फरक नसतो. मानवी आयुष्यात शत्रुने आपला कितीही सत्कार, सन्मान केला तरी शत्रुने केलेला सन्मान आणि मित्राने केलेला सन्मान याच्यात एक मुलभूत फरक असतो. म्हणजे शश योग या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शनि महाराज कुंभ राशीत जातील तेव्हा वृषभ आणि सिंह या दोन राशींमध्ये शश योग निर्माण होईल. मात्र या दोन्ही राशींच्या फळांमध्ये प्रचंड तफावत येईल. कारण वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा शनि महाराजांचा मित्र ग्रह मानला जातो. याऊलट रवि आणि शनि यांच्या शत्रुत्वाचं नातं आहे. त्यामुळे येथे एक विरोधाभास निर्माण होईल. तरीही शश योग निर्माण करणारे शनि महाराज काही बाबतीत तुम्हाला अत्यंत शुभ फळं नक्कीच प्रदान करतील. #bestastrologerinmaharashtra
तुमच्या सप्तम स्थानात शनि महाराजांचं आगमन होणार आहे. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार व व्यवसायाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तिथे वायुतत्त्वाची कुंभ ही बुद्धिमान रास येते. जिला शनि महाराजांची आवडती किंवा मूळ त्रिकोण रास म्हटली जाते. तेथून शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या भाग्य स्थानावर पडेल. तिथे मंगळाची मेष रास येते. महत्त्वाची बाब म्हणजे शनि महाराजांचं हे गोचर मंगळाच्या नक्षत्रातून होणार असल्यामुळे निश्चितच तुम्हाला शुभत्व प्राप्त होईल. तुमच्या भाग्यात वृद्धी घडून येईल. अनेक गोष्टी तुम्ही आपल्या भाग्याने साध्य करु शकाल. त्याआधी म्हणजे १२ एप्रिल रोजी राहु राशी परिवर्तन करुन तुमच्या भाग्य स्थानात आलेला असेल. शनि आणि राहु हे मित्र ग्रह म्हणून ओळखले जातात. या गोचरमध्ये ते एकमेकांशी ३-११ म्हणजे ज्याला आपण लाभयोग म्हणतो, तो निर्माण करणार आहेत. ज्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. मात्र हे जरी सर्व खरं असलं शनि म्हणजे विलंब होय. त्यामुळे भाग्य वृद्धी नक्कीच होईल. मात्र ती विलंबाने होईल. शनिला जे जे द्यायचं असतं ते सर्व तो नक्कीच देतो. मात्र विलंबाने देतो. तो त्याचा स्थायी भाव आहे. अगोदर एखाद्या गोष्टीची पूर्ण चिकित्सा करणं, कर्म तपासणं आणि त्यानंतर फळं देणं, हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म किंवा कारकत्व आपण म्हणू शकतो. एकंदरीत तुमच्या सप्तमात शश योगाचं निर्माण होईल. भाग्य वृद्धी घडून येईल.
यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल. येथे एक छानसा विरोधाभास घडून येईल. तुमची सिंह रास म्हणजे राजा लोकांची रास होय. सिंह जातक हे सदैव कार्यान्वित असतात. प्रत्यक्ष कृती करण्याकडे तुमचा भर जास्त असतो. याऊलट शनि महाराज मंद ग्रह आहेत. ते शांतपणे विचार करुन कृती करतात. त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आल्यामुळे तुमच्या मूळ स्वभावात कुठेतरी फरक पडेल. एरवी तुम्ही झटपट किंवा योग्य निर्णय जे घेऊ शकत होता त्या तुमच्या निर्णय क्षमतेवर या दृष्टीचा प्रभाव होईल. प्रत्येक निर्णयात तुम्हाला विलंबाचा सामना करावा लागेल. #astrogurudrjyotijoshi
यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरुन वास्तु, वाहन, जमीन, सुखशांती या बाबी बघितल्या जातात. तिथे देखील मंगळाची वृश्चिक ही जलत्त्वाची रास येते. वायुतत्त्वाच्या राशीतून जलत्त्वाच्या राशीत येणारी ही दृष्टी कुठेतरी नकारात्मक प्रभाव देखील देणार आहे. त्यात प्रामुख्याने घरातील सुखशांती हरवेल. सुसंवाद कमी होईल. वास्तुयोग नक्कीच निर्माण होतील. मात्र ते तुमच्यासाठी फारसे लाभदायक ठरणार नाहीत. किंवा त्यात विलंब घडून येईल. अर्थात शनि महाराज अत्यंत महत्त्वपूर्ण असले तरी पत्रिकेवर सर्वच ग्रहांचा प्रभाव पडत असतो, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. हे सर्व २९ एप्रिल ते १२ जुलै या काळात घडून येईल. त्यानंतर ते वक्री होऊन पुन्हा एकदा मकर राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा मागील परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. मात्र आता जी शुभ फळं तुम्हाला प्राप्त होणार आहेत त्यांना आपण जानेवारी २०२३ मध्ये शनि महाराज जेव्हा पुन्हा एकदा कुंभ राशीत प्रवेश करतील, तेव्हाच्या शुभ फळांचा छोटासा ट्रेलर म्हणू शकतो. त्याआधी ते पुन्हा मकर राशीत प्रवेश करतील आणि आपली अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करतील. कारण ग्रह वक्री होऊन जेव्हा मागील राशीत जातो तेव्हा तो राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठीच जात असतो. त्यानुसार ते राहिलेली कामे पूर्ण करुन जानेवारी २०२३ मध्ये पुन्हा एकदा तुमच्या राशीत येतील.
१२ जुलै रोजी शनि महाराज वक्री अवस्थेत जेव्हा तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करतील तेव्हा त्यांच्या शुभ फळांमध्ये पुन्हा एकदा वाढ घडून येईल. तेथून त्यांची तृतीय दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर, सप्तम दृष्टी व्यय स्थानावर तर दशम दृष्टी तुमच्या परिश्रमाच्या, पराक्रमाच्य, लहान मोठ्या प्रवासाच्या स्थानावर पडेल. या काळात तुम्ही अनेक लहान मोठे प्रवास करणार आहात. जबाबदाऱ्या पूर्ण कराल आणि आयुष्यात प्रगती करीत राहाल. कारण शनि महाराज तुम्हाला योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा देत असतात. तुमच्या पत्रिकेला ते अकारक जरी असले तरी तरी त्यांच्या अखत्यारीत महत्त्वपूर्ण स्थानं येतात. म्हणजे नोकरी, कर्ज, जोडीदार, व्यवसाय असे अनेक महत्त्वपूर्ण विभाग त्यांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे त्यांचं गोचर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतं. त्यामुळे पुढील काळात शनि महाराजांचे होणारे दोन्ही गोचर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील. मात्र ग्रह कधीही पूर्णपणे शुभ किंवा पूर्णपणे अशुभ परिणाम देत नाही. काही बाबतीत ते शुभ परिणाम देतात तर काही बाबतीत अशुभ परिणाम देतात. त्यात अकारक ग्रहाचा अशुभ परिणाम देण्याकडे कल थोडा जास्त असतो. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.
या काळातील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज हे कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळं देणारा ग्रह म्हणजे शनि होय. त्याचा अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी व शुभ फळांमध्ये वृद्धी करण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे शिव उपासना हा होय. त्यानुसार शनि महाराजांच्या या गोचर काळात सिंह जातकांनी महादेवाला गुळ किंवा साखर वाहावी. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. #astrogurudrjyotijoshi
अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन सिंह राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.
धन्यवाद!
शुभम भवतु!
अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी