Skip to content
Home » शनि परिवर्तन – मेष रास

शनि परिवर्तन – मेष रास

  • by

शनि परिवर्तन – मेष रास

शनि करतील इच्छापूर्ती

लाभासह होईल उन्नती

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. मी या आधी बऱ्याचदा सांगितलं आहे की एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामध्ये राहु-केतु व गुरु महाराज यांच्या परिवर्तनाचं विश्लेषण आपण राशीनुसार स्वतंत्रपणे केलं आहे. आता आपण शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यांच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या मेष राशीवर काय परिणाम होईल? यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. #astroguru

ग्रहांचं भ्रमण, त्यांची स्थिती आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आपण ज्योतिषशास्त्रात करीत असतो. ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा त्यांचा खूप मोठा परिणाम राशीनुसार प्रत्येक जातकावर होतो. अर्थातच तो परिणाम शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. त्यानुसार येत्या २९ एप्रिल रोजी फार मोठी घटना घडणार आहे. कारण या दिवशी शनि महाराज राशी परिवर्तन करणार आहेत. मकर राशीतून कुंभ राशीत असा त्यांचा हा प्रवास राहिल. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शनि महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया.

आपल्याला माहितीच असेल की शनि महाराज हे सर्वात मंद ग्रह आहेत. तब्बल अडीच वर्ष ते एका राशीत विराजमान असतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या स्थितीचा प्रभाव हा जातकावर अडीच वर्ष असतो. म्हणूनच त्यांचं राशी परिवर्तन हे प्रत्येक राशीसाठी सदैवच महत्त्वपूर्ण असतं. शनि महाराज हे कर्म व न्यायाचे कारक म्हणून ओळखले जातात. कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणजे शनि देव होय. खरं सांगायचं तर शनि महाराजांबद्दल आपल्या समाजामध्ये समजापेक्षा गैरसमजच जास्त पसरलेले आहेत. भिती हे त्यामागील एक मोठं कारण असू शकतं. मात्र ज्याला शनि महाराज समजले, त्यांची कार्यपद्धती समजली त्याला माणूस समजला, त्याला ज्योतिषशास्त्र समजलं, असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांची कार्यपद्धती ही थोडी वेगळी आहे. तरीही अत्यंत सुसुत्रता असलेली कार्यपद्धती कोणत्या ग्रहाची असेल तर ते शनि महाराज होय. एखाद्या कामाला कितीही वेळ लागला तरी चालेल. मात्र ते काम अत्यंत पद्धतशीरपणे पूर्ण व्हायला हवं, अशी त्यांची मानसिकता असते. त्याला अनुसरुन शनि महाराज एका राशीत जवळपास अडीच वर्ष राहतात. म्हणूनच साडेसाती ही साडेसात वर्षांची असते.

शनि महाराजांची साडेसाती हा देखील एक स्वतंत्र व अत्यंत सखोल असा विषय आहे. साडेसातीचे नाव ऐकल्याबरोबर भल्याभल्यांना घाम सुटतो. कारण एक प्रकारची भिती समाजात त्याविषयी पसरलेली असते. शनि महाराजांचा विषय साडेसाती शिवाय अपूर्ण ठरतो. म्हणून आता आपण त्याविषयी देखील थोडक्यात समजून घेऊया. त्यानुसार साडेसाती ही वाईटच असते, हा गैरसमज आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे. काही राशींना साडेसाती ही शुभ देखील असते. इतकेच नव्हे तर काही लोकांची साडेसातीत दैदिप्यमान प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. मूळात साडेसातीच्या माध्यमातून शनि महाराज आपल्याला समज देत असतात. जबाबदारी घेणे ते आपल्याला शिकवितात. चांगल्या-वाईटाचं भान ते आपल्यात जागृत करतात. अर्थात मूळ पत्रिकेतील शनिची स्थिती देखील त्याला कारणीभूत असते. मात्र साडेसातीविषयी थोडक्यात सांगाये झाल्यास पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असेल त्याच्या मागील राशीत शनि महाराज आले म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होतो. त्यांचा राशीत प्रवेश झाल्यानंतर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होतो आणि आपल्या राशीच्या पुढील राशीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरु होतो. अशा प्रकारे तीन राशींमधील त्यांच्या प्रवासाला साडेसाती म्हटले जाते.

मग आता प्रश्न असा उभा राहतो की सर्वच राशींवर शनि महाराजांच्या साडेसातीचा प्रभाव एक सारखा होतो का? तर असे अजिबात होत नाही. प्रत्येक राशीला प्रभावाच्या दिशा अत्यंत वेगवेगळ्या असतात. त्यानुसार मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा त्रासदायक जातो. दुसरा टप्पा अजून थोडा जास्त म्हणजे अतिरीक्त त्रासाचा असतो. तर तिसरा टप्पा हा सौम्य, प्रगतीकारक, आर्थिक लाभ देणारा ठरतो.

आता जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीला साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीला दुसरा टप्पा तर मीन राशीला साडेसातीची सुरुवात होईल. तसेच धनु राशी साडेसातीतून मुक्त होईल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की साडेसातीचा त्रास सर्वांना सारखा होत नाही. किंबहूना काही राशींसाठी तर साडेसाती लाभदायक देखील ठरते. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात जर जातकाने आपलं संपूर्ण लक्ष जबाबदाऱ्या, कर्तव्यांकडे ठेवलं तर साडेसातीत होणारी प्रगती ही आपल्या कल्पनेपेक्षाही खूप मोठी असते. ही बाब सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. यातही एक उपविभाग असा येतो की, नक्षत्र जसे बदलतात तसे साडेसातीचे प्रभाव देखील बदलतात. आता आपण विचार केला तर मकर राशीत जेव्हा शनि महाराजांनी प्रवेश केला सुरुवातीला रवि ग्रहाचं उत्तराषाढा नक्षत्र होतं. त्याच्या प्रभावानुसार साडेसातीचा प्रभाव जातकांवर झाला. रवि हा आत्माकारक ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या काळात माणसं अवस्थ झालीत. त्यानंतर चंद्राच्या नक्षत्रात शनि महाराजांनी प्रवेश केला. चंद्र हा मन आणि मातेचा कारक ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे माणसांची मनं विस्कळीत झाली. ज्याचा प्रभाव संपूर्ण मानवजातीवर झाला. आता शनि महाराज मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात आलेले आहेत. मंगळाचं हे नक्षत्र धन देणारं म्हणून ओळखलं जातं. मात्र शनि आणि मंगळ यांच्यात शत्रुत्वाचं नातं असल्यामुळे येथे एक विरोधाभास निर्माण होतो. मंगळ म्हणजे धडाडी आणि शनि म्हणजे शांतपणा असतो. मंगळ रोखठोक भूमिका घेणारा तर शनि शांत चालीने आपली कार्य करणारा असतो. हा विरोधाभास असल्यामुळे मंगळाच्या नक्षत्रात शनि महाराज आले की घात, अपघात निर्माण होण्याची शक्यता असते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. शांततेने प्रश्न सोडविण्यापेक्षा युद्धाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्यातून पुन्हा एकदा परिस्थिती अधिक बिघडते.

आता आपण तुमच्या मेष राशीवर शनि महाराजांच्या राशी परिवर्तनाचा काय परिणाम होईल? हे समजून घेऊया. #astrogurudrjyotijoshi

मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनि महाराज कुंभ राशी अर्थात तुमच्या एकादश स्थानात प्रवेश करतील. पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभ व इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. ज्योतिष नियमांनुसार लाभ स्थानात प्रवेश करणारा प्रत्येक ग्रह अत्यंत शुभ फळं देतो. त्याच्या कारकत्वानुसार लाभ व इच्छापूर्ती करतो. किंबहूना इच्छापूर्ती करण्यासाठीच तो तिथे आलेला असतो. त्यानुसार लाभ स्थानात प्रवेश करणारे शनि महाराज तुम्हाला भरभरुन लाभ प्रदान करतील. तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती करतील. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयास केले पाहिजेत. जेणे करुन या लाभदायक काळाचा तुम्हाला सदुपयोग करुन जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. #drjyotijoshi

जसं आपल्याला माहितीच आहे की शनि महाराजांना एकूण तीन दृष्ट्या असतात. स्थानाबरोबरच त्यांच्या दृष्ट्यांचाही खूप मोठा प्रभाव जातकावर होतो. तृतीय, सप्तम आणि दशम अशा तीन दृष्ट्या तसेच पत्रिकेतील दोन स्थानाचं स्वामीत्व त्यांच्याकडे असतं. म्हणजे दोन स्थानं आणि तीन दृष्ट्या अशी एकूण पाच स्थानांवर एकाच वेळी प्रभाव टाकण्याचं सामर्थ्य शनि महाराजांमध्ये असतं. मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता ते तुमचे दशमेश आणि लाभेश आहेत. म्हणजे कर्म आणि लाभ स्थानाचं स्वामीत्व त्यांच्याकडे आहे. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या लाभ स्थानात प्रवेश करणार आहेत. तेथून त्यांची तृतीय दृष्टी तुमच्या राशीवर, सप्तम दृष्टी पंचम स्थानावर तर दशम दृष्टी अष्टम स्थानावर पडेल. या तीनही दृष्ट्या लाभ स्थानातून पडणार असल्यामुळे तसेच शनि महाराज स्वराशीत विराजमान असल्यामुळे त्यांची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील.

      लाभ स्थानातील शनि महाराज तुमच्या अनेक इच्छांची पूर्ती करतील. गेले अनेक दिवस तुम्ही जी स्वप्ने पाहिली असतील, ज्या इच्छा तुमच्या मनात असतील त्या अगदी सहजच पूर्ण होण्याचा हा काळ असेल. लाभ स्थानातून शनि महाराजांची तृतीय दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व कनखर बनेल. कर्तव्य, जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची भावना अधिक वाढेल. सर्व कर्तव्ये, सर्व जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण कराल. त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल. यानंतर शनि महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल. पत्रिकेतील पंचम स्थानावरुन आपण शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी बघतो. ही दृष्टी मात्र संततीच्या बाबतीत विलंब निर्माण करणं किंवा शिक्षणात अडथळे निर्माण करण्याचं कार्य देखील करु शकते. कारण येथे शनि महाराजांच्या आदर्श शत्रुची म्हणजे रविची सिंह रास येते. त्यामुळेच या दृष्टीने मेष जातकांवर नकारात्मक प्रभाव देखील होऊ शकतात.

यानंतर शनि महाराजांची दशम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल. पत्रिकेतील अष्टम स्थानावरुन जीवनातील अडथळे, अडचणी, संघर्ष बघितला जातो. तसेच अचानकपणे होणारा आर्थिक लाभही याच स्थानावरुन बघितला जातो. महत्त्वाची बाब म्हणजे अष्टम स्थानाची नैसर्गिक मालकी शनि महाराजांकडे आहे. त्यामुळे आरोग्य उत्तम असणं, अचानक धनलाभाच्या संधी प्राप्त होणं या प्रकारची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. हे सर्व तुम्हाला १२ जुलै २०२२ पर्यंत प्राप्त होईल. त्यानंतर शनि महाराज वक्री अवस्थेत पुन्हा एकदा तुमच्या दशम स्थानात प्रवेश करतील. शनि सारखा मोठा ग्रह जेव्हा वक्री होऊन मागे येतो तेव्हा त्याला आपली राहिलेली कामं आठवतात. किंवा ब्रम्हदेव त्याला सांगतात की बाबारे तू पुढच्या घरात गेलास. मात्र मागच्या घरातील तुझी काही कामं अपूर्ण राहिलेली आहेत. ती तुला पूर्ण करावी लागतील. #drjyotijoshi

शिवाय शनि महाराज हे कर्माकडे अधिक लक्ष देणारे ग्रह आहेत. त्यामुळे ते दशम स्थानात येऊन पुन्हा एकदा आपल्या कर्माकडे लक्ष देतील. परिणामी मेष जातक पुन्हा एकदा कर्मप्रधान बनतील. ज्या जातकांना व्यवसाय किंवा नोकरी परदेशाशी संबंधित असेल त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होईल. वास्तुतून, वाहनातून तुम्हाला या काळात लाभ प्राप्त होऊ शकतो. अनेक प्रकारच्या सुसंधी कर्म स्थानात येणारे शनि महाराज तुमच्यासाठी निर्माण करतील. कारण शनि महाराज जेव्हा तुमच्या कर्म स्थानात असतात, तेव्हा ते शश योगाचे निर्माण करतात. जो अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. दशमेश दशम स्थानात आणि तेथून त्याची दशम दृष्टी सप्तम स्थानावर म्हणजे व्यवसायाच्या स्थानावर पडेल. ज्यामुळे या काळात तुमच्या व्यवसायात वृद्धी घडून येईल. म्हणजे मागील काळात जर शनि महाराजांनी तुमच्या व्यवसायात वृद्धी केलेली नसेल, व्यवसायात यश दिलेले नसेल तर ते त्या काळात तुम्हाला देण्यासाठीच कर्म स्थानात पुन्हा येणार आहेत. शनि महाराज त्यांचं कार्य निश्चितपणे पूर्ण करतील. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवेत.

एकंदरीत शनि महाराजांचं हे संपूर्ण गोचर मेष जातकांसाठी लाभदायक, प्रगतीदायक, सुखदायक ठरेल. या काळाचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा. जानेवारी २०२३ मध्ये ते मार्गी होऊन पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करतील. तो काळ देखील तुमच्यासाठी निश्चित लाभदायक राहिल. मात्र ते जेव्हा मीन राशीत प्रवेश करतील तेव्हापासून तुम्हाला साडेसाती सुरु होईल. ज्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. ही बाब आधीच लक्षात घेऊन त्याआधीच्या लाभदायक काळाचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करायला हवा व स्वत:ची उन्नती साधून घ्यायला हवी. #bestastrologerinmaharasht

अशाप्रकारे शनि महाराजांचं राशी परिवर्तन मेष राशीसाठी कसं राहिल? हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचं सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणून पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया.

धन्यवाद! शुभम भवतु! 

अँस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *