Skip to content
Home » गुरु परिवर्तन –  मकर रास

गुरु परिवर्तन –  मकर रास

वृद्धी परिश्रमासह भाग्यातही

लाभासह होईल स्वप्नपूर्तीही

 

नमस्कार!

मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रह सातत्याने भ्रमण करतात. गोचरद्वारे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांचे विश्लेषण आपण करतच असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामध्ये नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे अनेक अर्थाने सर्वच राशींसांठी अत्यंत शुभ ठणार आहे. कारण ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. १३ एप्रिल रोजी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होणार असून त्यांच्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण आपण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीसाठी गुरु महाराजाचं हे राशी परिवर्तन कसं राहिल? यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुरु ग्रह व त्यांच्या कारकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणे आवश्यक आहे. नैसर्गिक शुभ ग्रह किंवा सर्व ग्रहांमध्ये सगळ्यात जास्त शुभ असणारा ग्रह म्हणजे गुरु होय. म्हणूनच पत्रिकेतील गुरुच्या स्थितीवरुन त्या पत्रिकेची किंवा त्या जातकाच्या जीवनाचे यश-अपयश निर्धारीत होत असते. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पत्रिकेतील बारा स्थानांपैकी चार स्थानांना शुभ करण्याचं सामर्थ्य गुरु महाराजांकडे असतं. कारण त्यांच्या स्थानाबरोबरच त्यांच्या तीन दृष्टींचाही खूप मोठा परिणाम होत असते. किंबहूना त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. संतती, शिक्षण, विवाह, अर्थार्जना सोबत आयुष्याचा शेवट ज्याला आपण मृत्यू म्हणू शकतो किंवा मोक्ष देखील म्हटलेलं जास्त उत्तम राहिलं, या सर्वांचं कारकत्व गुरु महाराजांकडे आहे. अशा या गुरु महाराजांच्या कारकत्वामध्ये गत तीन-चार वर्षात कुठेतरी कमी निर्माण झालेली होती. त्यांचा प्रवास त्रासदायक पद्धतीने सुरु होता. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

अर्थात, सर्व प्रथम जेव्हा स्वत:च्या धनु राशीत त्यांनी प्रवेश केला त्यावेळी तिथे त्यांच्या सोबत केतु देखील विराजमान होता. परिणामी गुरु – केतु युती तिथे घडून आली होती. किंबहूना तिथे या दोघांमध्ये ग्रहयुद्ध घडून आलं होतं. ज्यात गुरु महाराजांचा पराभव झाला होता. परिणामी स्वराशीत असून देखील गुरु महाराज आपली शुभ फळं सर्वार्थाने देऊ शकले नव्हते. त्यानंतर गुरु महाराजांची मकर राशीत प्रवेश केला. मकर ही त्यांची नीच रास आहे. त्यानंतर अतिचार गतीने त्यांनी कुंभ राशीत प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा ते मकर राशीत परत आलेत आणि नीचीचे झालेत. पुन्हा अतिचार गतीने त्यांनी कुंभ राशीत प्रवेश केला. वर्तमान स्थितीतही कुंभ राशीतूनच त्यांचा प्रवास सुरु आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी ते पुन्हा राशी परिवर्तन करुन मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाची अत्यंत शुभ फळे सर्वच राशींना प्राप्त होतील. अर्थात, शुभ फळे काही राशींना कमी मिळतील तर काही राशींना जास्त मिळतील. मात्र शुभ फळं मिळतील, हे नक्की! कारण गुरु महाराज हे नैसर्गिक शुभ ग्रहांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे ग्रह आहेत. सोबतच ते दीर्घकाळ एका राशीत राहतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा प्रकर्षाने समोर येतो. असे हे गुरु महाराज १३ एप्रिल रोजी कुंभ राशीतून मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा मकर राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.

मकर रास किंवा लग्नाच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज तुमच्या पत्रिकेतील तृतीय आणि व्यय या दोन स्थानांचे स्वामी असतात. म्हणजे ते तुमचे तृतीयेश आणि व्ययेश आहेत. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम, परिश्रमाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. सोबतच लहान-मोठे प्रवास, शेजारी व बंधुसौख्य देखील याच स्थानावरुन बघितलं जातं. येथे गुरु महाराजांची मीन ही स्वरास येत असली तरी पत्रिकेतील तृतीय स्थान हे त्यांना फारसं मानवत नाही. कारण नैसर्गिक शुभ ग्रह उपचय स्थानात फारशी शुभ फळं देऊ शकत नाही. मात्र कितीही झालं तरी ते गुरु महाराज हे सर्व ग्रहांमध्ये अत्याधिश शुभ ग्रह मानले जातात. शिवाय ते येथे स्वराशीचे असल्यामुळे देखील त्यांची काही शुभ फळं तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या बंधुसौख्यात वृद्धी घडून येईल. भावंडांकडून तुम्हाला प्रेम, सहकार्य भरपूर प्रमाणात प्राप्त होईल. त्यांच्या सोबत असलेलं तुमचं नातं समृद्ध होईल. सोबतच प्रवासाचे देखील अनेक योग येतील. तो प्रवास तुमच्यासाठी लाभदायक देखील राहिल. किंबहूना तुमच्यासाठी परदेशगमनाचे योग देखील येथून तयार होत आहेत. धार्मिक कार्यासाठी देखील तुमचा प्रवास होऊ शकतो. म्हणजे या काळात तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेला जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या परिश्रमात प्रचंड वृद्धी घडून येईल. जो तुमचा मूळ स्वभाव देखील आहे. कारण मकर ही अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून ओळखली जाते. तुमच्या त्या स्वभावात वृद्धी घडून येईल.

गुरु महाराजांचा पत्रिकेवरील प्रभाव हा केवळ स्थानापुरता कधीही नसतो. आपल्या दृष्टींद्वारे ते एकाच वेळी पत्रिकेतील अनेक स्थानांवर प्रभाव टाकतात. त्यांना पंचम, सप्तम व नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. ज्या अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात. किंबहूना स्थानापेक्षा त्यांच्या दृष्टीला जातं महत्त्व दिलं जातं. कारण त्यांची दृष्टी ही अमृत दृष्टी मानली जाते. त्यानुसार तृतीय स्थानातील गुरु महाराजांची पंचम दृष्टी ही तुमच्या सप्तम स्थानावर, सप्तम दृष्टी नवम स्थानावर आणि नवम दृष्टी एकादश स्थानावर पडेल. या दृष्ट्यांचा विचार केला असता तुमच्या तृतीय स्थानात येणारे गुरु महाराज तुम्हाला फारशी शुभ फळं देऊ शकत नसले तरी त्यांच्या अमृत दृष्ट्यांपासून तुम्हाला अत्यंत शुभ फळांची प्राप्ती नक्कीच होईल.

      गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान मानलं जातं. तसेच व्यवसाय देखील याच स्थानावरुन बघितला जातो. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या दृष्टीमुळे जोडीदाराशी तुमचा योग्य तो सुसंवाद राहिल. दोघांमध्ये एकवाक्यता दिसून येईल. दोघांच्या विचारांमध्ये ऐक्य निर्माण होईल. तुमच्यातील प्रेमभावना वाढीस लागेल. योग्य त्या दिशेने तुमचे सर्व निर्णय होतील. या सर्वांचा परिणाम म्हणजे तुमच्या वैवाहिक सौख्यात वाढ घडून येईल. किंबहूना तुमचं वैवाहिक जीवन समृद्ध होईल, असं देखील आपण म्हणू शकतो. या शुभ स्थितीचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा.

यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या नवम स्थानावर पडेल. पत्रिकेतील नवम स्थान भाग्याचं स्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावर पडणाऱ्या गुरु महाराजांच्या शुभ दृष्टीमुळे तुमचं भाग्य समृद्ध होईल. भाग्याचं पूर्ण सहकार्य तुम्हाला या काळात प्राप्त होईल. सोबतच योग्य वेळी सुयोग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात वाढीस लागेल. वास्तविक पाहता भाग्य हे अनेक पद्धतीने कार्य करतं. एखादी कृती करावी की करु नये? असा विचार आपण अनेक वेळा करीत असतो. तसेच कोणत्या दिशेने ती कृती करावी? केव्हा करावी? त्यासाठी किती खर्च करावा किंवा खर्च करु नये? असे अनेक विचार माणसाच्या मनात सतत सुरु असतात. या सर्व विचारांमध्ये जर योग्य निर्णय आपल्याकडून घेतले गेले तर त्याचे परिणाम निश्चितच योग्य असतात. मात्र योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येक वेळी आपल्यात असतेच, असे नाही. गुरु महाराजांची अमृत दृष्टी जेव्हा भाग्य स्थानावर पडते तेव्हा ती क्षमता ते आपल्या निर्माण करतात. ज्याबळावर कितीही विपरीत परिस्थितीत, कठिणातल्या कठिण प्रश्नावर आपण योग्य निर्णय घेऊन आपण वाटचाल सुरु करतो. म्हणूनच गुरु महाराजांची ही दृष्टी विशेषत्वाने लाभदायक ठरते. जी आता तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या एकादश स्थानावर पडेल. पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभ व इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तुमच्या पत्रिकेत तिथे मंगळाची वृश्चिक रास येते. जसं आपल्याला माहिती आहे की गुरु आणि मंगळ हे मित्र ग्रह आहेत. मानवी आयुष्यात अनेक इच्छा, अपेक्षा असतात. काही स्वप्न प्रत्येकाचे निश्चितच असतात. ती पूर्ण व्हावीत यासाठी माणूस सतत झटत असतो. गुरु महाराजांच्या दृष्टीमुळे ती सर्व स्वप्ने, इच्छा, अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील. अनेक वेळा इच्छापूर्तीच्या स्थानात आलेल्या गुरु महाराजांपेक्षा इच्छापूर्तीच्या स्थानावर ते जेव्हा दृष्टी टाकतात, तेव्हा त्यांच्या दृष्टीची शक्ती मोठी असल्यामुळे इच्छापूर्ती, स्वप्नपूर्ती घडून येतात. अनेक प्रकारचे लाभ पदरात पडतात. घेतलेल्या शिक्षणातून तुम्हाला योग्य ती नोकरी मिळू शकते. शिक्षणासाठी तुम्ही प्रयत्न करीत असाल तर योग्य ठिकाणी तुमचा प्रवेश होऊ शकतो. किंबहूना कमी खर्चात चांगल्या ठिकाणी प्रवेश होणं हा देखील एक भाग येथे येतो. लहान मोठ्या प्रवासातून अनेक फायदे होतातच. मात्र जर तुम्हाला शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ती इच्छा देखील येथून पूर्ण होऊ शकते. त्या द़ृष्टीने तुम्ही प्रयत्न केल्यास गुरु महाराजांच्या कृपादृष्टीमुळे ती प्रक्रिया लवकर कार्यान्वित होईल. कारण गुरु महाराज हे तुमचे व्ययेश देखील आहेत. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

थोडक्यात तुमच्या तृतीय स्थानात येणारे गुरु महाराज हे तुमच्या पत्रिकेतील तृतीय, सप्तम, भाग्य, लाभ आणि व्यय अशा एकूण पाच स्थानांवर आपला शुभ प्रभाव टाकणार आहेत. ज्यामुळे ही पाचंही स्थानं सकारात्मक दृष्टीने कार्यान्वित होतील आणि त्या स्थानांच्या कारकत्वानुसार तुम्हाला योग्य ती शुभ फळं देखील प्राप्त होतील. कारण तृतीय स्थानात येणारे गुरु महाराज हे स्वराशीचे आहेत. त्यामुळे ते शुभ फळं द्यायला बाध्य होणार आहेत.

उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक असे छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे कोणीही अगदी सहज करु शकतो. त्यासाठी विशेष असं काहीच करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. फक्त अट एकच की पूर्ण श्रद्धेने ते उपाय करायला हवेत. त्यानुसार मकर राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता मकर जातकांनी प्रवासाला निघाल्यावर समोर जो कोणी गरजवंत व्यक्ती दिसेल त्याला यथाशक्ती पटकन काहीतरी दान करावं. त्याची मदत करावी. या काळात हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

अशाप्रकारे गुरु परिवर्तनाचे मकर राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan

धन्यवाद!

 

शुभम भवतु! 

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *