परिश्रमात वृद्धी
भाग्यात समृद्धी
नमस्कार!
मी एस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मन:पूर्वक स्वागत करते. ग्रह सातत्याने भ्रमण करतात. गोचरद्वारे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनांचे विश्लेषण आपण करतच असतो. त्यानुसार येत्या एप्रिल महिन्यामध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत. त्यामध्ये नैसर्गिक शुभ ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे अनेक अर्थाने सर्वच राशींसांठी अत्यंत शुभ ठणार आहे. कारण ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. १३ एप्रिल रोजी गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होणार असून त्यांच्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण आपण करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीसाठी गुरु महाराजाचं हे राशी परिवर्तन कसं राहिल? यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.
मागील काही भागांमध्ये आपण गुरु ग्रह व त्याच्या परिवर्तनाचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजून घेतले आहे. आता आपण पत्रिकेच्या रचनेच्या बाबतीत आधी थोडी माहिती समजून घेऊया. जेणे करुन या गुरु परिवर्तनाचे महत्त्व तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. खरं तर आपण केवळ निसर्ग कुंडलीचाच जरी अभ्यास केला तरी ती आपल्याला अनेक वेळा वेगवेगळे संकेत देत असते. पत्रिकेतील नवम स्थानाला आपण भाग्य स्थान म्हणून ओळखतो. पूर्व जन्माचं आपण जे संचित घेऊन आलेलो असतो ते संचित देखील या स्थानातून दिसतं. अशा नवम स्थानाचं स्थायी कारकत्व गुरु महाराजांकडे आहे. त्यानंतर दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तुम्ही मिळालेल्या आयुष्यात जे काही कर्म करणार आहात त्या सर्व कर्माच्या नोंदी येथे केल्या जातात. ते नोंदी करण्याचं काम शनि महाराजांकडे असतं. म्हणजे आपल्या कर्माचा लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. कारण निसर्ग कुंडलीच्या कर्म स्थानाचं स्वामीत्व त्यांच्याकडे असतं. आता या दोघांचा सामुहिक होणारा परिणाम एकादश स्थानातून म्हणजे लाभ आणि इच्छापूर्तीच्या स्थानातून व्यस्त होतो. भाग्य आणि कर्म या दोघांचा परिणाम म्हणजे लाभ होय. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही सर्व कर्तव्ये पूर्ण करतात. सर्वांना सर्व देऊन टाकतात. मोकळेपणाने खर्च करतात. सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करतात आणि ते केल्यानंतर तुम्ही मोक्षाकडे जातात. तिकडे नेणारं स्थान म्हणजे पत्रिकेतील व्यय स्थान होय.
महत्त्वाची बाब म्हणजे या व्यय स्थानाचं कारकत्व देखील गुरु महाराजांकडे आहे. थोडक्यात पत्रिकेतील भाग्य, कर्म, लाभ आणि व्यय या चार स्थानाचं खूप सुंदर असं सुसुत्र आहे. हे चारही स्थानं धर्म, अर्थ, काम, मोक्ष या क्रमाने देखील येतात. नवम हे धर्म स्थान, दशम हे कर्म स्थान, एकादश हे लाभ तर द्वादश हे व्यय स्थान असतं. अशी छानशी रचना आपल्या पत्रिकेत असते आणि त्यानुसारच आपलं जीवन व्यतीत होत असतं. जेव्हा आपण ग्रहांच्या गोचरचा अभ्यास करीत असतो तेव्हा ती आपल्या दृष्टीस पडते आणि अत्यंत प्रसन्नता प्रदान करते. कारण प्रत्येक ग्रहाची दिशा याच पद्धतीने होते. त्यांचे प्रत्येक जातकावर होणारे परिणाम देखील याच पद्धतीने होतात. याचा सखोल अभ्यास केल्यास यातून आपल्याला आयुष्याचं सूत्र सापडतं. ही आपल्या ऋषीमुनींची शक्ती आहे, की ज्यांच्या परिश्रमाने, संशोधनाने अशी सुसुत्रित पत्रिका आपल्याला प्राप्त होत असते. याद्वारे गुरु महाराजांचं राशी भ्रमण व राशी परिवर्तनाच्या महत्त्वाचा तुम्ही अंदाज तुम्ही घेऊ शकता. तर गुरु महाराज १३ एप्रिल रोजी कुंभ राशीतून मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करीत आहेत. त्यांच्या या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीवर काय परिणाम होईल? हे आता आपण समजून घेऊया.
कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज हे तुमच्या पत्रिकेला मूळत: कारक ग्रह आहेत. कारण ते तुमच्या नवम या त्रिकोण स्थानाचे स्वामी असल्यामुळे त्यांना कारकत्व प्राप्त झालेले आहेत. कर्क राशीच्या किंवा लग्नाच्या पत्रिकेत गुरु महाराज षष्ठ आणि नवम म्हणजे भाग्य या दोन स्थानांचे स्वामी आहेत. षष्ठ हे अर्थ त्रिकोणातील महत्त्वाचं स्थान आणि नवम हे भाग्य स्थान या दोन्ही स्थानांचं कारकत्व त्यांच्याकडे आहे. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या भाग्य स्थानात प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे भाग्येश भाग्यात ही स्थिती निर्माण होणार असून ती तुमच्यासाठी अत्यंत शुभदायक, भाग्यदायक ठरणार आहे. थोडक्यात कर्क जातकांसाठी गुरु महाराजांचं हे गोचर अत्यंत शुभ योगकारक ठरेल. या वर्षात तुम्हाला भाग्याची भरभरुन साथ प्राप्त होईल. ते षष्ठ स्थान म्हणजे अर्थत्रिकोणाच्या स्थानाचे देखील स्वामी असल्यामुळे साहजिकच तुम्हाला या काळात भरपूर अर्थप्राप्ती देखील होणार आहे. एकंदरीत षष्ठ आणि भाग्य या दोन्ही स्थानांच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व गोष्टींचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. त्यांचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा. शिवाय भाग्य समृद्ध होणार असल्यामुळे या काळात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासाठी यशाची टक्केवारी देखील साहजिकच वाढणार आहे. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan
गुरु महाराजांच्या स्थानाबरोबरच त्यांच्या दृष्ट्यांचाही देखील खूप मोठा शुभ प्रभाव पडत असतो. आपल्याला माहितीच आहे की गुरु महाराजांना पंचम, सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात. महत्त्वाची बाब म्हणजे स्थानांपेक्षा त्यांच्या दृष्ट्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी मानतात. त्यानुसार भाग्य स्थानातील गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होईल. तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होईल. तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भता येईल. शिक्षणात वाढ होईल. तुमच्या व्यवहारी जीवनात वाढ होईल. व्यक्तिमत्त्व बळकट झाल्यामुळे सुव्यवस्थित जगण्याकडे तुमचा कला वाढेल. एकंदरीत शिस्तबद्ध आयुष्य जगावं अशी तुमची मानसिकता तयार होईल आणि त्याच पद्धतीने तुम्ही कार्यरत राहाल. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्राचे शिक्षण घेत असाल त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. कारण गुरु महाराज हे ज्ञानाचे कारक ग्रह म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या कृपादृष्टीमुळे तुम्हाला फार मोठं शैक्षणिक यश या काळात प्राप्त होऊ शकतं.
यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम, परिश्रमाचं स्थान म्हणून ओळखलं जातं. सोबतच लहान मोठे प्रवास, शेजारी व बंधुसौख्य देखील याच स्थानावरुन बघितलं जातं. या स्थानावर पडणारी गुरु महाराजांची शुभ दृष्टी तुम्हाला सूचित करीत आहे की तुम्ही योग्य पद्धतीने परिश्रम करा. यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रमाला पर्याय नाही. त्यानुसार तुम्ही देखील परिश्रम करणार आहात. मात्र परिश्रम करतांनाही तुम्ही आजच्या भाषेत ज्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो, त्या दिशेने कार्यरत राहाल. तुमचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होईल. सोबतच तुमचं कर्तृत्व देखील समृद्ध होणार आहे. तुमच्या परिश्रमाची, कर्तृत्वाची दिशा योग्य असेल. या काळात बंधुसौख्य देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभणार आहे. लहान-मोठे प्रवास तुम्ही करणार आहात. त्या प्रवासातून देखील तुम्हाला लाभाची प्राप्ती होणार आहे. कारण गुरु महाराज भाग्य स्थानात बसून तुमच्या तृतीय स्थानावर दृष्टी टाकणार आहेत. तृतीय स्थानावरुन आपण लहान प्रवास तर भाग्य स्थानावरुन आपण मोठे प्रवास बघत असतो. हे दोन्ही प्रवास तुमचे भरभरुन घडून येतील. तसेच गुरु महाराज भाग्य स्थानातच विराजमान असल्यामुळे त्या प्रवासातून देखील तुमचं भाग्य बळकट होईल. प्रगतीच्या नवीन संधी तुमच्यासाठी निर्माण होतील.
यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील पंचम स्थानावरुन शिक्षण, संतती, प्रणय या गोष्टी आपण बघत असतो. या स्थानावर गुरु महाराजांची अमृत दृष्टी पडत असल्यामुळे या सर्व बाबतीत तुमची यशाची टक्केवारी अजून जास्त वाढणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्याही क्षेत्राचे, शाखेचे शिक्षण घेत असाल त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. या काळात केलेला अभ्यास तुम्हाला दीर्घकालीन लाभ देईल. जे जातक घरात पाळणा हलण्याची वाट बघत असतील त्यांची मनोकामना पूर्ण होईल. म्हणजे संतती योग देखील तुमच्यासाठी निर्माण होत आहेत.
अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे जसं आपल्याला माहिती आहेच की चंद्र हा दर सव्वादोन दिवसांनी राशी परिवर्तन करीत असतो. तर ज्या ज्या वेळी तुमच्या राशी स्वामीचं म्हणजे चंद्राचं गोचर तुमच्या राशीतून होईल, पंचमातून होईल, भाग्यातून होईल, तृतीय स्थानातून होईल त्या त्या वेळी तुमच्या भाग्यात अजून जास्त समृद्धी येईल. मंगळ देखील आता लवकरच तुमच्या भाग्य स्थानात येणार आहे. त्यामुळे तिथे मंगळ-गुरु ही युती घडून येईल. तो काळ देखील तुमच्यासाठी अत्यंत भाग्यदायक ठरेल. किंबहूना चंद्र आणि मंगळ या दोन ग्रहांचं गोचर जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी शुभ राहिल तेव्हा तेव्हा तुमचं भाग्य अजून जास्त समृद्ध होईल. सोबतच रविचं गोचर देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेच. भाग्येशा सोबतच रवि देखील भाग्य स्थानात येऊन बसणार असल्यामुळे १३ एप्रिल नंतर त्याचे देखील तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. कारण रवि म्हणजे ग्रहांचा राजा आणि गुरु म्हणजे मार्गदर्शक होय. राजाला जर योग्य मार्गदर्शन मिळालं किंवा योग्य गुरु लाभला तर त्या राज्याची भरभराट होत असते. रवि हा तुमच्या पत्रिकेला कुटुंबेश-धनेश आहे. तो तेव्हा भाग्य स्थानातच बसलेला असेल. १३ एप्रिल रोजी गुरु महाराज राशी परिवर्तन करुन तिथे येतील. त्यामुळे तुमचं भाग्य चौफेर समृद्ध होणार आहे. किंबहूना या काळात तुमचा भाग्योदय होईल, असं देखील आपण म्हणू शकतो.
एकंदरीतच कर्क राशीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कर्क राशीच्या दृष्टीने प्रथम स्थान, तृतीय स्थान, पंचम स्थान, षष्ठ स्थान आणि भाग्य स्थान अशी ही पाच स्थानं गुरु महाराजांच्या राशी परिवर्तनामुळे समृद्ध होणार आहेत. ज्यामुळे या काळात तुम्हाला प्रगतीच्या भरपूर संधी प्राप्त होणार आहेत. विशेेषत: जे कर्क जातक उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना फार मोठं यश या काळात प्राप्त होऊ शकतं. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जे जातक शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी परदेशात जाऊ इच्छित आहेत त्यांना ती संधी प्राप्त होईल. त्यामुळे त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवायला हवेत. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल. एकंदरीतच कर्क राशीच्या जातकांसाठी गुरु महाराजांचं हे गोचर अत्यंत लाभदायक व भाग्यदायक राहिल. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा.
उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक असे छोटे छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत जे कोणीही अगदी सहज करु शकतो. त्यासाठी विशेष असं काहीच करण्याची आवश्यकता नसते. शिवाय उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम हा खूप मोठा होतो. फक्त अट एकच की पूर्ण श्रद्धेने ते उपाय करायला हवेत. त्यानुसार कर्क राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता कर्क जातकांच्या भाग्यातच गुरु महाराजांचं आगमन होणार आहे. त्यानुसार या काळात कर्क जातकांनी एखादी धार्मिक यात्रा करावी किंवा एखादं धार्मिक, सामाजिक कार्य करावं. ज्यामुळे समाजातील लोकांना तुमच्याकडून मदत होऊ शकेल. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.
अशाप्रकारे गुरु परिवर्तनाचे कर्क राशीवरील प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे, असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढील भागात पुढील राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील भागात पुन्हा नक्की भेटूया. #astroguru #drjyotijoshi #astrogurudrjyotijoshi #astroguruma #guruparivartan
धन्यवाद!
शुभम भवतु!
अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी