नमस्कार!
काल अत्यंत दुखद घटना घडली. अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ आपल्याला सोडून गेल्या. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. दु:खाशी त्यांनी दोन हात केले. त्यात त्या यशस्वी देखील झाल्या. मात्र त्यांचा संघर्ष अखेरपर्यंत सुरु होता. कारण त्यांनी कित्येक निराधार बालकांची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागील वर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे ऑनलाईन महिला ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात कर्तृत्ववान महिलांच्या पत्रिकेतील योगांचे विश्लेषण करण्याचे आम्ही ठरविले होते. अर्थातच त्यानं माईंचे नाव देखील होते. मात्र समस्या ही होती की त्यांची जन्मवेळ कुठेच उपलब्ध नव्हती. म्हणून मी थेट त्यांच्याशीच संपर्क साधण्याचा प्रयन्त केला. आश्चर्याची बाब म्हणजे माझा मॅसेज मिळाल्यानंतर व उद्देश समजून घेतल्यानंतर त्यांनी स्वत:हुन फोन केला. त्यांनी मला जन्म वेळ तर दिलीच, सोबतच आपल्या आयुष्यातील काही अशा घटनाही सांगितल्या ज्या अजून समोर आलेल्या नव्हत्या. त्यांच्या पत्रिकेच्या विश्लेषणाची लिंक नंतर मी त्यांनाही पाठविली होती. तेव्हा त्यांनी खूप छान झालंय म्हणून कौतुकही केलं होतं. हा सगळा प्रसंग आजही माझ्या मनात अगदी ताजा आहे. त्यांच्याशी बोबल्यानंतर एक वेगळ्याच ऊर्जेची अनुभूती मी घेतली होती. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे. अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली! संमेलनाच्या निमित्ताने त्यांच्यावर लिहिलेला हा विश्लेषणात्मक लेख….
अनाथ लेकरांची माई… देवाचं प्रतिरुप आई – सिंधूताई सपकाळ
घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला
ओढलेला प्राण माझा बोलण्याआधीच निघुन गेला
जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी
घेतला काढूनी खांदा ओळखीच्या माणसांनी
थोर गझलकार सुरेश भट यांनी या ओळी लिहिलेल्या आहेत आणि अनाथांच्या माई म्हणजे आई म्हणून ओळखल्या जाणा-या थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ या ओळी जगलेल्या आहेत. वास्तविक पाहता या दोघांचा काहीही संबंध नाही. मात्र कवी, लेखक हे आपल्या साहित्यातून समाजचित्रण उभं करतात. समाजातील दु:खाला वाचा फोडण्याचं काम करतात. काही कलाकृती प्रचंड लोकप्रिय होतात. कारण लोक त्यात स्वत:ला बघतात. असे असले तरी सिंधूताई सपकाळ यांचा जीवन प्रवास हा काही काव्याच्या चार – सहा ओळीत शब्दबद्ध करता येणारा नाही, हेही तितकेच सत्य आहे. अशा सिंधूताई सपकाळ यांच्या पत्रिकेतील विविध योगांवर या लेखाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे.
वयाच्या दहावा वर्षी लग्न, वीसाव्या वर्षापर्यंत तीन मुलींची आई व दहा दिवसांची ओली बाळंतीन असतांना सासरच्या लोकांनी चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं, गावक-यांनी गावाबाहेर जाण्यास भाग पाडलं, माहेरच्या लोकांनी घरात घेतलं नाही. हा सर्व विचार करतांनाही अंगावर काटा उभा राहतो आहे. यावरुन सिंधूतार्इंना तेव्हा काय भोगलं असेल? याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. अशा सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथे झाला. जन्मत:च त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुरे वळवण्यिाचे काम करायचे. ज्या दिवशी मार्इंचा जन्म झाला त्याच दिवशी जंगलात वाघाने त्यांच्या १४ म्हशींना मारले होते. तेव्हाच्या मानसिकतेनुसार हा अपशुकन झालेला होता. त्यामुळे मार्इंचे नाव चिंधी असे ठेवण्यात आले. यावरुनही त्यांच्या घरच्यांची मानसिकता आपल्या लक्षात येऊ शकते.
घरात, गावात शैक्षणिक वातावरण नसले तरी इच्छाशक्तीच्या बळावर मार्इंनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्या अजून पुढे शिकू शकल्या नाहीत, कारण वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा वयाने भरपुर मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह झाला. तेही गुरे वळवायचेच काम करायचे. दररोज शेकडो गुरांचे शेणपाणी त्यांना करावे लागायचे. प्रचंड परिश्रम करुनही त्याचा मोबदला मात्र मिळायचा नाही. मार्इंनी याविरुद्ध आवाज उठवून बंड पुकारले. त्यावेळी शेणाचा लिलाव होऊन वन विभागाचे लोक ते खरेदी करायचे. बंड पुकारल्यामुळे मार्इंना आपला मोबदला तर मिळू लागला. मात्र त्या सुखामुळेच दुस-या मोठ्या दु:खाची ठिणगी त्यांच्या आयुष्यात पडली. त्या लढाई जिंकल्या. मात्र त्याची त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली. कारण त्यांच्या बंडामुळे गावातील काही लोकांची मिळकत बंद झाली होती. त्यामुळे त्यांनी मार्इंच्या विरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली. गावातील जमीनदार दमडाजी असतकर याने तर त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. परिणामी नव-याने मार्इंना घराबाहेर काढून गोठ्यात आणून सोडले. तेव्हा माई गर्भवती होत्या. गोठ्यातच त्यांनी आपल्या चौथ्या मुलीला जन्म झाला. पुढे गावानेही त्यांचा तिरस्कार केला. परिणामी त्यांच्याकडे गाव सोडण्यावाचून पर्याय राहिला नाही. इतकेच काय जन्म देणा-या आईनेही त्यांचा स्विकार केला नाही. तेव्हा दु:खाचा फार मोठा डोंगर त्यांच्यावर कोसळला.
कुठेच आसरा नाही, कुणाचीच साथ नाही. त्यात पदरात तान्हुलं बाळ, अशा परिस्थितीत दु:ख होणे स्वाभाविक आहे. मात्र सिंधुताई दु:खाला कवटाळत बसल्या नाहीत तर त्यांनी संघर्ष केला. कवयित्री बहिणाबाई म्हणतात,
नाही दिव्यामध्ये तेल
कशी अंधारली रातं
तेल मिळे एकदाचं
नेली उंदराने वातं
अशाच काहीशा परिस्थितीचा सामना माई त्या काळात करीत होत्या. नव्हे परिस्थितीशी सरळ सरळ दोन हात करीत होत्या. रेल्वे स्टेशनवर भिक मागून पोट भरण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र तिथेही त्यांनी जे मिळेल ते कधी एकट्याने खाल्ले नाही. स्टेशनवरील सर्व भिका-यांना एकत्र करुन मिळालेलं अन्न त्या सर्वांना वाटून खायच्या. एका दिवशी त्यांना पुणे शहरातील रस्त्यावर एक लहान मुलगा रडतांना दिसला. त्या त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्या. मात्र पोलीसांनी त्यांची दखल घेतली. परिणामी त्या मुलाचा सांभाळ आपणच करायचा, असे त्यांनी ठरविले. पुढे त्यांना अजून तशीच दोन – तीन अनाथ बालके सापडलीत. तेव्हा त्यांच्यातील मातृत्व जागृत झाले आणि आपले आयुष्य याच मुलांसाठी वेचायचा त्यांनी ठाम निर्धार केला.
अशा परिस्थितीत कुणी उभं राहू शकतो. फक्त स्वत:च नाही तर हजारो लोकांना उभं करु शकतो, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र मार्इंचा जीवन प्रवास ज्यांनी ज्यांनी ऐकला, वाचला त्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्यातही ज्यांनी तो त्यांच्याच तोंडून ऐकला त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. आपण जे जगत आहोत, भोगत आहोत ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, असे त्यांना मनापासून वाटले आणि त्यातून ममता बाल सदन या संस्थेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. १९९४ साली पुण्याजवळील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली आणि दिवसागणीक मुलांची संख्या वाढू लागली. आजपर्यंत हजारो मुले त्या संस्थेत राहिलेली आहेत. त्यांचे भोजन, राहणे, आरोग्य, शिक्षण या सर्वांची काळजी माईच घेत असतात. आपल्या घरातील दोन – तीन मुले सांभाळतांना, त्यांचे हट्ट पुरवितांना किती नाकी नऊ येतं? याचा अनुभव प्रत्येक पालकाला असेलच. त्यावरुन हजारो लहान – मुली सांभाळणं, त्यांना माया देणं किती कठिण आहे? याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. हे मार्इंनी यशस्वीरीत्या करुन दाखविलं आहे. ज्यांना कोणीही नाही, त्यांच्यासाठी मी आहे, असे त्या मोठ्या उदारतेने म्हणत असतात. नंतरच्या काळात त्यांनी अशाच अजून काही संस्था सुरु केल्या आहेत.
मार्इंची कित्येक मुलं – मुली आज स्वत:च्या पायावर उभी राहून यशस्वी जीवन जगत आहेत. काही तर वकील, डॉक्टर, इंजिनिअरही झालेली आहेत. मार्इंना या कार्यासाठी आजवर राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावरील शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या आयुष्यावर मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. मोठ्या संघर्षातून मार्इंनी हे उभं केलं आहे आणि त्यांचा तो संघर्ष आजही अविरत सुरु आहे.
मार्इंना परमेश्वराने मातृत्व हा एकच गुण दिलेला नाही तर नेतृत्व, संघटन कौशल्य, अमोघ वाणी अशा अनेक गुणांच्या त्या स्वामीणी आहेत. माई जेव्हा बोलतात तेव्हा समोर हजारोंच्या संख्येने जरी लोक बसलेले असले तरी ते सर्व स्तब्ध होतात. एवढी शक्ती त्यांच्या वाणीमध्ये आहे. अशा माई म्हणजे सिंधूताई सपकाळ यांच्या पत्रिकेतील विविध योग आता आपण समजून घेणार आहोत.
ज्योतिषी या नात्याने पत्रिकांचा अभ्यास करतांना आपण नेहमीच म्हणतो की घटना महत्त्वाची नाही तर त्या घटनेला मिळालेली प्रतिक्रिया, तिचे परिणाम महत्त्वाचे आहेत. कारण कोणतीही घटना ही कारण आणि परिणाम यांच्या मध्ये घडत असते. जेव्हा जेव्हा पत्रिकेवर चर्चा होते की, एकाच घटनेवर प्रतिक्रिया वेगवेगळ्या का येतात? तर ते व्यक्तीच्या चंद्रावर, मानसिक बळावर, लग्नेशावर, त्याच्या सामर्थ्यावर, त्याने दिलेल्या प्रतिक्रियेवर अवलंबून असतं. अशा सर्व सामार्थ्यांनी परिपूर्ण असलेली पत्रिका म्हणजे मार्इंची पत्रिका होय.
राशी स्वामी गुरु स्वराशीचा, मूळ त्रिकोण राशीत म्हणजे धनु राशीत. एकदा एखादी गोष्ट ठरविली की कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढून यशस्वी होणारच हा मूळ स्वभाव. गुरु महाराज म्हणजे ज्ञान. शालेय शिक्षण वेगळं आणि ज्ञान वेगळं असतं. शालेय शिक्षणात आपण शिक्षण घेतो, पदवी मिळवित असतो. ज्ञान फक्त त्यातूनच प्राप्त होतं असं नव्हे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीतून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान जे आपलं आयुष्य समृद्ध करतं तेच खरं ज्ञान असतं. आयुष्याचं ज्ञान मिळवलं ते मार्इंनी. त्यांची गुरु महाराजांची रास म्हणजे मीन रास होय आणि राशी स्वामी स्वत:च्या मूळ त्रिकोण राशीत. ही ग्रहस्थिती त्यांना उत्तम, कणखर बनवित होती. त्याहीपेक्षा लग्नेश असलेला बुध व कुटुंबेश तसेच भाग्येश असलेला शुक्र यांच्यातील परिवर्तन योग, धन आणि कुटुंब स्थानातून झालेला, स्वस्थानापासून पंचमात दशमेश त्यांचे कर्म समृद्ध करीत होता.
मार्इंची ही पत्रिका कन्या लग्नाची आहे. लग्नेश आणि दशमेश असलेले बुध महाराज मित्राच्या राशीत आणि धनेश व भाग्येश असलेले शुक्र महाराज लग्न स्थानात नीचीचे झालेले. म्हणजे संपूर्ण विपरीत परिस्थिती असतांना संघर्ष करुन पुढे जाण्याचं सामर्थ्य त्यांना आपल्या लग्नेशाकडून मिळालं. त्यात लग्नेश एकटा नाही तर दोन पाप ग्रहांच्या मध्ये आहे. त्याला ज्योतिषीय भाषेत पाप कर्तरी म्हटलं जातं. कारण तुळ राशीत एकीकडून नीचीचा रवि आणि एकीकडून केतू. केतू १० अंशावर, लग्नेश १२ अंशावर आणि नीचीचा असलेला रवि २८ अंशावर. म्हणजे या दोन पाप ग्रहांच्या मध्ये लग्नेश सापडलेला आहे. तसेच राशी स्वामीवर एकीकडे नीचीच्या ग्रहाची दृष्टी आहे तर दुसरीकडे कोणत्याही शुभ ग्रहाची दृष्टी नाही. थोडक्यात ही सर्व ग्रहस्थिती लक्षात घेतली असता परिस्थिती किती विपरीत असू शकते, याच्या सर्व सीमा संपून जातात. आपल्या विचारांच्या सीमा संपतात. इतक्या विपरीत, प्रतिकूल परिस्थितीतही एक महिला उभी राहते. ती उभी राहते तर फक्त स्वत:साठी नव्हे तर पुढे हजारोच्या संख्येने अनाथ मुलं दत्तक घेते. त्यांचे पालन पोषण, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभी करते. थोडक्यात काय तर त्या मुलांची फक्त नाही तर सर्वस्व बनते. हे कमी की ज्या नव-याने तिला घराबाहेर काढलं होतं तो जेव्हा तिच्याकडे येतो तेव्हा त्याची देखील आई बनते. हे कर्तृत्व, हे मातृत्व सिंधूताई सपकाळ म्हणजे आपल्या मार्इंचं आहे. ते त्यांना कुणी बहाल केलं? अर्थात चंद्राने. चंद्र हा ग्रह त्यांच्या पत्रिकेत प्रबळ आहेच. सोबतच तो बुद्धीमान, कर्तृत्ववान देखील आहे. थोडक्यात काय तर पत्रिकेत ग्रहांची बैठक ही अतिशय उत्तम झालेली आहे.
पत्रिकेत तृतीयेश असलेला मंगळ हा तृतीयात म्हणजे आपल्या स्वस्थानात, स्वराशीत विराजमान आहे. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान मानलं जातं. खरं तर ते परिश्रमाचं स्थान असतं. दिवस – रात्र परिश्रम करुन त्यांनी कर्तृत्व गाजविलं. दुसरी बाब म्हणजे दु:खात रडणारे सर्वच असतात. मात्र माई त्यातल्या नव्हत्या. तर त्या दु:खाचंही काव्य करणा-या होत्या. कलेचा कारक व भाग्येश असलेला शुक्र हा लग्न स्थानात आहे आणि लग्नेशाशी तो परिवर्तन योग करीत आहे. म्हणजे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांच्यातील कला, काव्य त्यांनी ठेवलं. सर्वसाधारण लोक जिथे रडतात तिथे त्या काव्य गातात. सुरुवातीला विविध धार्मिक कार्यक्रमात उपस्थितीत राहणे, भजण गाणे यातून त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. याविषयी त्या म्हणतात, “मी जेव्हा भजणं गायचे तेव्हा लोक भोजन द्यायचे आणि आता जेव्हा मी भाषणे देते तेव्हा लोक धान्य देतात.’’
अशा पद्धतीने हजारो अनाथ लेकरांची एकटी माय म्हणजे माई या अत्यंत जगावेगळ्या आहेत. ते त्यांच्या पत्रिकेतूनही स्पष्ट निदर्शनास येतं. यासाठी पत्रिकेत बनणारा सर्वात प्रबळ योग म्हणजे वर्गोत्तम लग्न हा होय. ज्योतिषशास्त्रातील नियमानूसार वर्गोत्तम ग्रह हा जातकाला शुभ फळं देतो आणि वर्गोत्तम लग्न हे व्यक्तिमत्त्व कणखर व बजबूत बनवतं. त्यानुसार मार्इंचं व्यक्तिमत्त्व कणखर घडलं. कारण वर्गोत्तम लग्न ही अत्यंत शुभ गोष्ट त्यांच्या पत्रिकेत आहे.
महादशांचा आपण जर विचार केला तर जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा बुध ग्रहाची महादशा सुरु होती. पण ती १९५४ म्हणजे वयाच्या ८ व्या वर्षी संपली. त्यानंतर त्यांना केतूची महादशा लागली आणि वयाच्या १० व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. केतूच्या महादशेत त्यांचा प्रचंड संघर्ष सुरु होता. त्यानंतर शुक्राची महादशा लागली. शुक्र पत्रिकेत नीचीचा आहे. त्यामुळे त्याने देखील त्यांना अटळ असा संघर्ष दिला. शुक्राची महादशा संपल्यानंतर रविची महादशा लागली. रवि हा ग्रह देखील पत्रिकेत नीचीचा आहे. त्यात तो व्ययेश आहे. परिणामी त्याने देखील प्रचंड संघर्ष दिला. या संघर्षातून वाटचाल करत जेव्हा त्यांना चंद्राची महादशा सुरु झाली त्यावेळी त्यांच्या आयुष्यात मोठे बदल सुरु झालेत. मान सन्मान प्राप्त होऊ लागला. त्यातून त्यांनी आयुष्यात मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी उत्तरोत्तर प्रगती घडत गेली.
चंद्रानंतर त्यांना मंगळाची महादशा लागली. मंगळ या पत्रिकेत स्वराशीचा आहे. त्यामुळे मंगळानेही त्यांना भरभरुन यश दिलं. त्यानंतर त्यांना राहूची महादशा लागली. मात्र राहूवर त्यांनी कधीच विजय मिळविलेला होता. राहू प्रत्येकच पत्रिकेत असतो. त्या राहूला तुम्ही प्रतिक्रिया कशी देता? यावर तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा अवलंबून असते. प्रत्येक पत्रिकेत बुध, गुरु, मंगळ हे शुभ ग्रह असतातच. तसेच राहू, केतू, शनि देखील प्रत्येक पत्रिकेत असतात. पत्रिकेतील बुध, गुरु, शुक्र यांना प्रबळ करणं आणि राहू, केतू, शनि यांना जो निर्बळ करु शकतो तोच यशस्वी होतो. मार्इंनी आपल्या आयुष्यात, जीवन प्रवास प्रचंड संघर्ष करुन ते करुन दाखवलं. यश मिळवून दाखवलं. फक्त स्वत:साठी नव्हे तर हजारो अनाथ मुलांसाठी. हजारो अनाथ मुलांचे आयुष्य त्यांनी सावरलं. त्यांना स्वत:च्या पायावर उभं करुन दिलं. आज त्यांना हजारोच्या संख्येने मुलं, मुली, जावई आहेत. हा सगळा परिवार हसत, खेळत, काव्य म्हणत सक्षमपणे सांभाळत आहेत.
भाग्य स्थानातील गुरु धर्म स्थापनेला प्रोत्साहन देतो. सिंधूतार्इंच्या नवमांश पत्रिकेत गुरु महाराज भाग्य स्थानात असून बुधशी नवपंचम योग व मंगळाशी लाभ योग करीत आहेत. मंगळाने त्यांना सामर्थ्य दिलं. मंगळ, बुध, गुरु या तीघांचे एकमेकांशी होणारे योग आणि विशेषत: गुरु महाराजांचा पुन्हा शुक्र आणि शनि यांच्याशी होणारा लाभ योग हे विशेष म्हणावे लागेल. एकंदरीत पाहता अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांना ग्रहांची उत्तम साथ लाभली. या विपरीत परिस्थितीशी लढण्याचं, संघर्ष करण्याचं सामथ्र्यही त्यांना ग्रहांनीच दिलं. त्यांनी संघर्ष केला, लढल्या आणि जिंकल्या देखील. अशा सिंधूताई सपकाळ यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मानचा मुजरा!
Facebook Marathi:- Astroguru Dr. Jyoti Joshi
Facebook Hindi:- Astro Gurumaa Dr. Jyoti Joshi
Youtube Marathi:- Astroguru Dr Jyoto Joshi
Youtube Hindi:- Astro Guruma Dr Jyoti Joshi
Dr Jyoti Joshi Books:- Best Selling Book
धन्यवाद! शुभम भवतू!
– डॉ. सौ. ज्योती जोशी