Skip to content
Home » गुरु परिवर्तन – सिंह रास

गुरु परिवर्तन – सिंह रास

गुरु परिवर्तन - सिंह रास

सुख, समाधानासह इच्छापूर्ती
परिश्रमासह लाभात वृद्धी

ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर सिंह राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. ग्रहांचं भ्रमण व त्यामध्यमातून विविध राशींमध्ये त्यांचा होणारा प्रवेश हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. काही ग्रहांचा परिणाम तर दीर्घकाळ होणारा असतो. कारण ते एका राशीत दीर्घकाळ विराजमान असतात. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे ग्रह म्हणजे गुरु महाराज होय. ते आपल्या ग्रहमालेतील सर्वात शुभ ग्रह मानले जातात. मनुष्याला आयुष्यातील प्रत्येक वळणावर गुरु ग्रहाचं सहकार्य आवश्यक असतं. म्हणजे जन्म, शिक्षण, करिअरच्या माध्यमातून अर्थार्जन, विवाह, धर्म, संतती, भाग्य, धार्मिक-आध्यात्मिक विचार अशा विविध गोष्टींनी यशस्वी मानणसाचं आयुष्य घडत असतं. या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व एकाच ग्रहाकडे आहे. ते म्हणजे गरु महाराज होय.
आता आनंदाची बाब म्हणजे ते निसर्ग कुंडलीच्या लाभ स्थानात जाणार आहेत. लाभ हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्या स्थानाला गुरु महाराजांचं नैसर्गिक स्वामीत्व देखील लाभलेलं आहे. लाभ स्थान हे प्रत्येक गोष्टीत वाढ दर्शवितं. कौटुंबिक वाढ, एखादी इच्छापूर्ती होणं, आर्थिक लाभ प्राप्त होणं अशा गोष्टी तेथून घडतात. त्यात गुरु महाराज हे लाभाचे कारक ग्रह आहेत. म्हणजे लाभाचा कारक ग्रह लाभ स्थानात आता जाणार आहे. जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. ही विशेष शुभ बाब २० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी होणार आहे.
या दिवशी गुरु महाराज मकर या नीच राशीतून कुंभ या वायुतत्त्वाच्या राशीत जातील. या दोन्हीही राशी शनि महाराजांच्या आहेत. मात्र मकर आणि कुंभ राशीमध्ये काही मुलभूत फरक आहेत. मकर ही श्रमीक रास मानली जाते तर कुंभ ही बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. ज्ञानाचे कारक ग्रह असल्यामुळे गुरु महाराजांना बुद्धिमान असलेली कुंभ रास बर्‍यापैकी मानवते. तर मकर रास अजिबात मानवत नाही. अजून एक बाब म्हणजे कुंभ राशीनंतर मीन रास येणार असते. जी गुरु महराजांची रास आहे. कुंभ राशीतून जेव्हा त्यांचं मार्गक्रमण सुरु असतं तेव्हा त्यांना आपल्या घराचे वेध लागतात. स्वराशीकडे जाणारा ग्रह हा कुठेतरी आनंदात असतो की मी आता फिरुन फिरुन खूप थकलो. आता मी माझ्या घरी जाणार आहे. त्याचं देखील एक शुभत्व प्राप्त होतं. याशिवाय निसर्ग कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा कुंभ राशीत गुरु अकरावे होतात. ते स्थान गुरु महाराजांना विशेष मानवतं. कारण ते लाभ आणि इच्छापूर्तीचं स्थान आहे. शिवाय गुरु महाराजांचं सगळ्यात मोठं कारकत्व काही असेल तर गुरु म्हणजे देणारा, गुरु म्हणजे दाता होय. त्यामुळे लाभ आणि इच्छापूर्ती करणं हे त्यांचं नैसर्गिक कारकत्व ठरतं. नेमक्या त्याच स्थानात आता गुरु महाराज जाणार आहेत. त्यामुळे मागील काही काळात समाजात जी मरगळ आलेली आहे, ती आता दूर होऊ शकते. सोबतच आर्थिक बाबींना गती प्राप्त होईल. थोडक्यात, गुरु महाराजांच्या या राशी परिवर्तनाचे अत्यंत शुभ परिणाम विविध राशींवर होणार आहेत. त्यातल्या त्यात काही राशींसाठी हे राशी परिवर्तन विशेष भाग्योदयाचं, प्रगतीचं ठरणार आहे. काही राशींसाठी हे गोचर प्रचंड मोठा आर्थिक लाभ प्राप्त करुन देईल. कौटुंबिक लाभ देईल. किंबहूना काही राशी ज्या मागील काही वर्षांपासून अत्यंत त्रासात आहेत, त्यांच्यासाठी सौख्याचे, प्रगतीचे दरवाजे घडतील. त्यात सिंह राशीवर गुरु महाराजांच्या या गोचरचा काय परिणाम पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज हे पंचमेश व अष्टमेश आहे. पत्रिकेतील पंचम स्थान हे शिक्षण, संतती, प्रणय, इष्टदेव या सर्व गोष्टींचं कारक म्हणून ओळखलं जातं. तसेच अष्टम स्थान हे आयुष्य देणारं, अचानक धनलाभ देणारं, कौटुंबिक प्रॉपर्टी प्राप्त करुन देणारं स्थान म्हणून ओळखलं जातं. सोबतच सासर देखील याच स्थानावरुन बघितलं जातं. सिंह राशीसाठी अशा या दोन भावांचे स्वामीत्व गुरु महाराजांकडे आहे. थोडक्यात गुरु सारखा शुभ ग्रह तुमचा पंचमेश व अष्टमेश असल्यामुळे त्याची शुभ फळं ही तुम्हाला नेहमीच प्राप्त होत असतात. त्यात प्रामुख्याने त्रिकोणाचं स्वामीत्व हे अत्यं महत्त्वाचं ठरतं. पंचम स्थान हे त्रिकोण स्थान म्हणून ओळखलं जातं. म्हणून सिंह जातकांसाठी गुरुचं भ्रमण किंवा गोचर हे विशेष प्रभाव कारक असतं. कारण धनु आणि मीन या गुरु महाराजांच्या दोन राशी आहे. तसेच गोचरने ते ज्या राशीत जातात ती रास आणि ज्या स्थानावर किंवा राशींवर दृष्टी टाकतात त्या राशींवर त्यांचा प्रभाव दिसून येतो. गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृततुल्य मानली जाते. त्यामुळे त्यांची दृष्टीही महत्त्वाची असते. त्या सिंह राशीसाठी गुरु महाराज हे मूळत: कारक ग्रह असल्यामुळे त्यांचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होत असतात.
गेली काही महिने ते तुमच्या षष्ठ स्थानातून म्हणजे मकर राशीतून प्रवास करीत होते. मकर ही त्यांची नीच रास आहे. त्याचा बर्‍यापैकी मोठा दुष्प्रभाव सिंह जातकांना सहन करावा लागला. म्हणजे शिक्षणात खूप जास्त परिश्रम करावे लागले. सोबतच घरात विसंवाद निर्माण होणं, आरोग्याच्या समस्या निर्माण होणं अशा विविध प्रश्नांमधून सिंह जातक वाटचाल करीत होते. २० नोव्हेंबर नंतर या स्थितीत हळूहळू बदल व्हायला सुरुवात होईल. कारण तेव्हा गुरु महाराज हे राशी परितर्वन करुन तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहेत. त्रिकोणाचा स्वामी गोचरने केंद्रात येणं, ही अत्यंत शुभ गोष्ट मानली जाते. त्यातल्या त्यात जर तुमच्या मूळ पत्रिकेत जर गुरु महाराज शुभ स्थानी असतील, योग्य अंशावर ते असतील, योग्य राशीत असतील तर त्या शुभत्वात प्रचंड वाढ होते. तर असे गुरु महाराज त्रिकोणाचे स्वामी बनुन तुमच्या केंद्र स्थानात आता येणार आहेत. २० नोव्हेंबरला ते तिथे येतील. मात्र ऐरवी गुरु महाराजांचं गोचर हे १३ महिन्यांचं असतं. म्हणजे एका राशीत ते १३ महिने विराजमान असतात. मात्र यावेळी ते कुंभ राशीत फक्त सहा महिने राहणार असून त्यानंतर ते राशी परिवर्तन करणार आहेत.
तेरा महिन्यांचं काम जेव्हा एखादा ग्रह फक्त सहा महिन्यांमध्ये पूर्ण करतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, या काळातील त्यांची ती कामं ते थोडे घाईगडबडीने पूर्ण करतील. भरभर कामं उरकतील. कदाचित त्यांना स्वत:च्या घरी जाण्याची ओढ लागलेली असेल. कारण यानंतर ते मीन या आपल्या स्वराशीत प्रवेश करणार आहेत. मात्र या काळातील कामं ते थोडी घाईत भरभरं उरकतील. त्यामुळे जे काही शुभ-अशुभ परिणाम प्राप्त होणार आहेत, ते देखील लवकर प्राप्त होतील. तर गुरु महाराज २० नोव्हेंबर २०२१ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत तुमच्या सप्तम स्थानात कुंभ राशीत असणार आहेत व त्याचेे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत.
मी तुम्हाला आधीही सांगितलं की गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृत दृष्टी मानलं जातं. किंबहूना ते ज्या स्थानात विराजमान असतात त्यापेक्षा ते ज्या स्थानांवर दृष्टी टाकतात त्या स्थानांच्या शुभतेत भरघोस वाढ करतात. त्यानुसार त्यांची पंचम दृष्टी तुमच्या लाभ स्थानावर अर्थात इच्छापूर्तीच्या स्थानावर पडणार आहे. सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. तर नवम दृष्टी तुमच्या परिश्रम, पराक्रम, प्रवास दर्शविणार्‍या तृतीय स्थानावर पडणार आहे. एकंदरीत फळाच्या दृष्टीने विचार केला असता सप्तम स्थानात आलेले गुरु महाराज हे काम त्रिकोण पूर्ण करतात. त्यामुळे सांसारीक आयुष्याच्या सर्व जबाबदार्‍या व्यवस्थित पूर्ण करत सुख, समाधानाने आयुष्य जगणं हा येथील गुरु महाराजांचा मुख्य प्रभाव सांगता येईल. गेली काही महिने घरात जे विसंवाद मोठ्या प्रमाणावर सुरु होते त्याला थोडाशी खिळ बसेल आणि सुंसावाद वाढीला लागेल.
सप्तम स्थानातून गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या लाभ स्थानावर पडत आहे. लाभ स्थान हे वाढ दर्शविणारं स्थान आहे. गुरु महाराजांच्या शुभ ग्रहाची जेव्हा येथे दृष्टी पडते तेव्हा येथे अनेक बाबतीत लाभ संभवतो. खरं तर लाभ म्हणण्यापेक्षा तुमची इच्छापूर्ती होते. मग एखाद्याला शिक्षणात यश पाहिजे असेल, एखाद्याला प्रेम विवाह करण्याची इच्छा असेल, एखाद्याला फॅक्टरी टाकायची इच्छा असेल, व्यवसाय करण्याची इच्छा असेल किंवा एखाद्याला नोकरी करण्याची इच्छा असेल, अशा तुमच्या ज्या काही इच्छा, अपेक्षा असतात त्या पूर्ण होण्याचा हा कालखंड आहे. एखाद्या व्यक्तीला घरातील सौख्य मोठ्या प्रमाणात हवं असेल तर ही इच्छापूर्ती या काळात होऊ शकते. त्याचे अत्यंत शुभ परिणाम सिंह जातकांना प्राप्त होणार आहेत. त्यामुळे त्यांनी या शुभ, लाभदायक काळाचा जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा.
यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. ही दृष्टी तुमच्या ज्ञानात भर टाकणारी असेल. नवीन ज्ञान मिळविणं, रोज अभ्यास करणं, एखाद्या गोष्टीत तज्ज्ञात प्राप्त, या बाबींकडे तुमचा कल झुकतो. व्यक्तिमत्त्वात प्रचंड सुधारणा होते. नातेसंबंधांचं महत्त्व कळायला लागतं. सर्वांना घेऊन चालण्याचं कौशल्य तुमच्यात विकसित होतं. एकंदरीतच गुरु महाराज जेव्हा तुमच्या राशीवर दृष्टी टाकतात तेव्हा व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने त्याची अत्यंत शुभ फळं प्राप्त होतात. जी या काळात सिंह जातकांना प्राप्त होणार आहेत.
यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडणार आहे. या स्थानावरुन आपण परिश्रम, पराक्रम, प्रवास पाहतो. त्यानुसार परिश्रमात, पराक्रमात वाढ होणं, प्रवास घडून येणं या सारख्या घटना तुमच्या सोबत घडील. प्रवासाची ओढ तुम्हाला या काळात लागू शकते. काही जातकांना परदेशात जाण्याची देखील ओढ लागेल. तसेच परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकते. म्हणून जे जातक शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे नियोजन करीत आहेत, त्यांनी या काळात आपल्या आपले प्रयत्न वाढवायला हवेत. त्यात त्यांना नक्कीच यश प्राप्त होऊन इच्छापूर्ती देखील होऊ शकते. कारण पंचमेशाची सप्तम स्थानातून तुमच्या तृतीय स्थानावर दृष्टी पडत आहे. जी तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
एकंदरीत पाहता सिंह जातकांसाठी हा काळ, गुरु महाराजांचं हे गोचर अत्यंत शुभ व लाभदायक असणार आहे. जेव्हा काळ आपल्यासाठी अनुकुल असतो तेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. कारण त्या प्रयत्नांमध्ये आपल्याला नक्कीच यश प्राप्त होतं. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा. धन्यवाद!
शुभम भवतु!


एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
९८५००९८६८८