Skip to content
Home » गुरु परिवर्तन – मकर रास

गुरु परिवर्तन – मकर रास

नोकरी-व्यवसायात होईल प्रगती
मिळतील लाभाच्या अनेक संधी

ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर मकर राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. आजच्या या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. गुरु म्हणजे दाता, गुरु म्हणजे देणारा, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे स्थैर्य होय. मानवी आयुष्यात ज्या ज्या गोष्टीला महत्त्व आहे, त्या प्रत्येक गोष्टीचं कारकत्व गुरु महाराजांकडे आहे. परित्रिकेतील गुरु महाराजांची स्थिती, त्यांची शुभता-अशुभता याचा खूप मोठा प्रभाव मनुष्य जीवनावर पडत असतो. एखादं बाळ जन्माला येतं म्हणजे संततीचं कारकत्व गुरुकडे, शिक्षणाचं कारकत्व गुरुंकडे, शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यक्ती अर्थार्जन सुरु करतो त्याचं कारकत्व गुरुकडे, त्यानंतर विवाहाचं कारकत्व गुरुकडे, भाग्याचं कारकत्व गुरुकडे आहे. निसर्ग कुंडलीतील दोन, पाच, नऊ, अकरा या अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानांचं कारकत्व गुरु महाराजांकडे असतं. म्हणून गुरु हा पत्रिकेतील अत्यंत महत्वपूर्ण ग्रह ठरतो. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती समृद्ध जाणारं? तो आपल्या आयुष्यात किती यशस्वी होणार? तो उच्च अभिरुचीपूर्ण आयुष्य जगणार की चुकीच्या वाटेने मार्गक्रमण करणार? तो अत्यंत श्रीमंतीत आयुष्य जगणार की गरीबीत दिवस काढणार? उच्चशिक्षण घेणार की शिक्षण न घेताच इतर कार्य करीत राहणार? या सर्व गोष्टी ठरविणारा ग्रह म्हणजे गुरु होय. मूळ पत्रिकेत गुरु महाराज जर योग्य स्थानी, योग्य राशीत, योग्य अंशात असले, नवमांशात त्यांची स्थिती योग्य असली तर त्या जातकाचं आयुष्य समृद्ध आणि संपन्न होतं. तसेच आपण असंही सांगू शकतो की एखाद्या माणसाचं यश मोजायचं असेल तर मूळ पत्रिकेतील गुरुची स्थिती बघावी. मूळ पत्रिकेतील गुरु महाराजांची स्थिती जितकी महत्त्वाची ठरते तितकीच त्यांची गोचरची स्थिती देखील महत्त्वाची ठरते. मूळ पत्रिकेतील स्थितीचा जितका परिणाम होतो, तितकाच गोचरच्या स्थितीचाही परिणाम हा तिव्र असतो.
आनंदाची बाब म्हणजे आता ते निसर्ग कुंडलीच्या लाभ स्थानात जाणार आहेत. लाभ हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्या स्थानाला गुरु महाराजांचं नैसर्गिक स्वामीत्व देखील लाभलेलं आहे. लाभ स्थान हे प्रत्येक गोष्टीत वाढ दर्शवितं. कौटुंबिक वाढ, एखादी इच्छापूर्ती होणं, आर्थिक लाभ प्राप्त होणं अशा गोष्टी तेथून घडतात. त्यात गुरु महाराज हे लाभाचे कारक ग्रह आहेत. म्हणजे लाभाचा कारक ग्रह लाभ स्थानात आता जाणार आहे. जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. ही विशेष शुभ बाब २० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी होणार आहे. मकर महाराजांच्या या राशी परिवर्तनाचा कन्या राशीवर प्रभाव पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता तृतीय आणि व्यय या दोन स्थानांचं स्वामीत्व गुरु महाराजांकडे आहे. पत्रिकेतील तृतीय स्थान हे परिश्रम, पराक्रम, प्रवास यांचं स्थान म्हणून ओळखलं जातं. तर व्यय स्थानावरुन खर्च, परदेशगमन, हॉस्पिटलचे खर्च, बंधन योग, आध्यात्मिक प्रगती या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. परदेशगमन तृतीय स्थानावरुन देखील बघितलं जातं. कारण परदेशगमनासाठी तृतीय, नवम आणि व्यय हे तीनही स्थांनाची स्थिती आवश्यक ठरते. या दृष्टीने गुरु महाराज हे मकर राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. मूळत: गुरु हा ग्रह मकर राशीसाठी कारक नाही. किंहबूना मकर राशीत ते नीचीचे होत असतात. आता सध्या ते मकर राशीतच विराजामन असून तिथे ते नीच अवस्थेत आहेत. तरी देखील जे मकर जातक परदेशात असतील, शिक्षण, नोकरी, व्यवसाय या कुठल्याही कारणाने त्यांचे वास्तव्य परदेशात असेल तर त्या जातकांसाठी गुरु महाराज हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह ठरतात. कारण ते तुमच्या पत्रिकेतील व्यय आणि परिश्रम या दोन स्थानांचे स्वामी आहेत.
गुरु महाराज मागील काही महिन्यांपासून तुमच्या राशीत विराजमान आहेत. तिथे ते नीच अवस्थेत आहेत. त्यांच्या या स्थितीचा परिणाम म्हणजे तुम्हाला अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. अनेक लाभ देखील तुम्हाला मिळाले. गुरु महाराज तुम्हाला परस्पर विरुद्ध फळं सातत्याने रोज तुमच्या राशीत बसून तुम्हाला देत होते. एकीकडे प्रचंड परिश्रम करायला लावणं तर दुसरीकडे सातत्याने चिंता देणं आणि नंतर हळूच यशही देणं, असा नित्यक्रम त्यांचा सुरु होता. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या कुटुंब स्थानात प्रवेश करणार आहेत. कारण ते तुमच्या राशीत नीच अवस्थेत होते. तुमच्या कुटुंब स्थानात कुंभ ही रास येते. जी बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. तुमचे राशी स्वामी असलेल्या शनि महाराजांचीच ती रास आहे. तरी बुद्धिमान रास ही गुरु महाराजांना विशेष मानवते. कारण ते स्वत: ज्ञानाचे कारक आहेत. थोडक्यात गुरु महाराजांच्या या गोचरचे तुम्हाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होणार आहेत. त्यांचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यायला हवा.
गुरु महाराज पत्रिकेतील ज्या स्थानात विराजमान असतात त्यापेक्षा ज्या स्थानांवर त्यांची दृष्टी पडते त्या स्थानांच्या फळांमध्ये ते वृद्धी करीत असतात. कारण त्यांच्या दृष्टी ही अमृततुल्य मानली जाते. त्यानुसार तुमच्या द्वितीय स्थानात विराजमान गुरु महाराजांची पंचम दृष्टी षष्ठ स्थान, सप्तम दृष्टी अष्टम स्थान आणि नवम दृष्टी दशम स्थानावर पडणार आहे. तुमच्या धन व कुटुंब स्थानात जाणारे गुरु महाराज हे एकटे अर्थ त्रिकोण पूर्ण करण्यात सक्षम ठरतात. त्रिकोणाच्या कुठल्याही स्थानात ते जेव्हा विराजमान असतात तेव्हा आपल्या अमृत दृष्ट्यांद्वारे तो त्रिकोण पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं. तसेच ते जेव्हा याप्रकारे अर्थ त्रिकोण पूर्ण करतात तेव्हा ऐनकेन प्रकारे आर्थिक लाभ तुम्हाला देतातच. त्यामुळे भरपूर आर्थिक लाभाच्या संधी या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहेत. मात्र हा लाभदायक काळ फक्त सहा महिन्यांसाठीच राहिल. दि. २० नोव्हेंबर २०२१ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत तुमच्या कुंभ राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात विराजमान राहतील. ऐरवी त्यांचा गोचर हे तेरा महिन्यांचं असतं. मात्र यावेळी ते सहा महिन्यातच राशी परिवर्तन करणार आहेत. याचा अर्थ ते अत्यंत घाईघाईने आपल्या स्वराशीत प्रवेश करतील. परिणामी तुम्हाला जो आर्थिक लाभ त्यांना द्यायचा आहे, तो देखील ते घाईघाईनेच देतील.
तरी देखील येथे अर्थ त्रिकोण पूर्ण होत असल्यामुळे येथूनच तुम्हाला भरघोस आर्थिक लाभ प्राप्त होईल. अर्थात तो किती होईल? सर्वच मकर जातकांना तो एकसारखा होईल का? तर तसे अजिबात होणार नाही. ते सर्वस्वी तुमच्या मूळ पत्रिकेतील स्थितीवर अवलंबून असेल. मात्र एक मात्र नक्की की तुम्हाला आर्थिक लाभ होणारच आहे. विशेषत: जे मकर जातक परदेशात आहेत त्यांना बर्‍यापैकी मोठा आर्थिक लाभ प्राप्त होऊ शकतो. भारतात असलेल्या जातकांसाठी देखील लाभाच्या विविध संधी प्राप्त होतील. त्यात ज्यांनी एखादी जुनी जमीन घेतलेली असेल त्यातून लाभ होऊ शकतो. व्यवसायातूनही लाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. सोबतच पारंपारीक प्रॉपर्टीतूनही लाभ प्राप्त होण्याचे योग बर्‍यापैकी मोठ्या प्रमाणात घडून येतील.
द्वितीय स्थानात विराजमान असलेल्या गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडत आहे. ज्याचा परिणाम म्हणजे मागील काळात ज्यांच्या नोकरी प्रश्न, समस्या उत्पन्न झाल्या होत्या त्या कुठेतरी आता कमी व्हायला सुरुवात होईल. किंबहूना नोकरीत स्थैर्याची अनुभूती देखील तुम्ही घेऊ शकाल. एखाद्या कामात यश देखील प्राप्त होऊ शकतं. तसेच जे जातक नवीन नोकरीच्या शोधात असतील त्यांना ती प्राप्त होईल. ज्या जातकांना आपल्या नोकरीत बदल करायचा असेल त्यांच्यासाठी हा काळ अतिशय उत्तम म्हणता येईल. म्हणून त्यांनी या काळात सदुपयोग करायला हवा. ते त्यांच्यासाठी लाभदायक देखील राहिल.
यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील अष्टम स्थानावरुन आपण अचानक, अनपेक्षित धनलाभ बघत असतो. त्यानुसार कौटुंबिक धनलाभ, प्रॉपर्टीतून धनलाभ, शेयर मार्केट मधून धनलाभ होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत. मात्र शेअर मार्केटचं कारकत्व मुख्यत: राहु आणि शुक्राकडे जातं. त्यांचं जर शुभत्व तुम्हाला प्राप्त झालं तर येथून गुरु महाराज त्या दृष्टीने धनलाभ देतात. कारण अनेक वेळेला ग्रहांचे योग लाभ प्रदान करीत असतात. म्हणजे एकटा ग्रह एखादी पूर्ण घटना घडवून आणू शकत नाही. त्यासाठी त्याला इतर ग्रहांचंही सहकार्य आवश्यक असतं. ते जर मिळालं तर ती घटना पटकन घडते आणि त्याचा जातकांना लाभ प्राप्त होतो. एकंदरीत, अष्टम स्थानावर पडणारी गुरु महाराजांची अमृत दृष्टी तुम्हाला आरोग्य देईल, धनलाभ देईल. त्या धनलाभाचे मार्ग वेगवेगळे राहु शकतात. मात्र लाभाच्या शक्यता या मोठ्या असतील.
यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखले जाते. व्यवसाय-व्यापारातील वृद्धी देखील याच स्थानावरुन बघितली जाते. अशा या स्थानावर पडणार्‍या गुरु महाराजांच्या अमृत दृष्टीमुळे तुमच्या व्यवसायात प्रचंड वाढ होईल. म्हणजे एकीकडे नोकरी करणार्‍या मकर जातकांना गुरु महाराज आशीर्वाद देणार आहेत. तर दुसरीकडे व्यावसायिका जातकांना देखील ते सहकार्य करणार आहेत. त्यांना त्यांच्या कामात यश देणार आहेत. व्यावसायिक जातक नवनवीन संकल्पना आपल्या व्यवसायात राबवतील. ज्याद्वारे प्रगतीच्या संधी त्यांच्यासाठी निर्माण होतील. विशेषत: ज्या जातकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, त्यांना खूप मोठा धनलाभ या काळातून प्राप्त होऊ शकतो. खरं तर परदेशातील जातकांसाठी गुरु महाराजांचं हे गोचर विशेष लाभदायक ठरेल. भारतीय जातकांना देखील धनलाभ ते निश्चितच देतील. मात्र काही बाबतीत तडजोड तुम्हाला करावी लागणार आहे. धन्यवाद! शुभम भवतु!
एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी ९८५००९८६८८