Skip to content
Home » गुरु परिवर्तन – कर्क रास

गुरु परिवर्तन – कर्क रास

थोड्या अडचणी, थोडा संघर्ष
अनपेक्षित लाभाने होईल उत्कर्ष

ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर कर्क राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. गुरु महाराज आपल्या ग्रहमालेतील सर्वात शुभ ग्रह मानले जातात. मनुष्याला आयुष्यातील प्रत्येक वळणावर गुरु ग्रहाचं सहकार्य आवश्यक असतं. म्हणजे जन्म, शिक्षण, करिअरच्या माध्यमातून अर्थार्जन, विवाह, धर्म, संतती, भाग्य, धार्मिक-आध्यात्मिक विचार अशा विविध गोष्टींनी यशस्वी मानणसाचं आयुष्य घडत असतं. या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व एकाच ग्रहाकडे आहे. ते म्हणजे गरु महाराज होय.
गुरु महाराजाचं स्वामीत्व भगवान विष्णूंकडे जातं. म्हणून ते नैतिक आचरण शिकवितात. आध्यात्मिकता शिकवितात. उच्च अभिरुचीपूर्ण आयुष्य कसं जगावं? हे शिकवितात. कुंभ राशीत तीन नक्षत्र येतात. धनिष्ठा, शतभिषा आणि पूर्वभाद्रपदा ही तीन नक्षत्रे होय. धनिष्ठा हे मंगळ ग्रहाचं धन देणारं नक्षत्र आहे. या नक्षत्रात गुरु महाराजाचं गोचर हे कुठेतरी शुभत्व प्रदान करेल. त्यानंतर शतभिषा या नक्षत्राचा स्वामी राहु हा ग्रह आहे. राहु शिस्त शिकवितो. त्यानुसार या नक्षत्रातून गुरु महाराजांचे गोचर जनतेने शिस्तीने कसे जगावे? हे शिकविणारे ठरेल. यानंतर पूर्वभाद्रपदा नक्षत्र येईल. ते ध्येय निश्चित करण्याचं नक्षत्र आहे. या नक्षत्राचे स्वामी स्वत: गुरु महाराजचं आहेत. येथून ध्येय निश्चिती होत असते. त्यानुसार प्रत्येक राशीवर त्याचा प्रभाव पडेल.
गुरु महाराजाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या स्थानातून, राशीतून किंवा तत्त्वातून त्यांचा प्रवास सुरु असतो, ते तत्त्व ते समृद्ध करतात. आता ते वायुतत्त्वाच्या कुंभ राशीतून प्रवास करणार आहेत. तेथून त्यांची दृष्टी मिथुन आणि तुळ या राशींवर पडणार आहे. म्हणजे एकाच वेळी वायुतत्त्वाच्या तीनही राशींचा त्रिकोण ते पूर्ण करतात. त्यामुळे एकंदरीत वायुतत्त्वाचा प्रभाव हा भूतलावर वाढतो. वायुतत्त्वाच्या राशी या बुद्धिमान राशी मानल्या जातात. त्याचे शुभ परिणाम निश्चितच सर्वांना प्राप्त होणार आहेत. गुरु महाराज आता तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करणार आहेत. त्यानुसार त्यांच्या या राशी परिवर्तनाचा कर्क राशीवर प्रभाव पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज हे कर्क राशीसाठी भाग्येश आणि षष्ठेश आहेत. भाग्य म्हणजे ते त्रिकोणाचे स्वामी आहेत. भाग्य स्थानावरुन भाग्य निर्धारित होतं. वडीलांशी असलेलं नातं निर्धारित होतं. म्हणजे वडीलांकडून प्राप्त होणारं सौख्य येथून बघता येतं. तसेच पत्रिकेतील षष्ठ स्थानावरन आरोग्य, नोकरी, कर्ज, शत्रु असे विविध विषय बघितले जातात. कर्क राशीसाठी गुरु महाराज हे अत्यंत महत्त्वाचे कारक ग्रह आहेत. शिवाय ते भाग्येशही असल्यामुळे त्याची स्थिती व गोचर कर्क राशीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. कर्क राशीच्या भाग्याची दिशा आणि दशा ठरविण्याचं कार्य गुरु महाराज करतात. गुरु महाराज आता तुमच्या सप्तम स्थानातून प्रवास करीत आहे. २० नोव्हेंबरला ते राशी परिवर्तन करुन तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील. पत्रिकेतील अष्टम स्थानावरुन अडथळे, अडचणी, संघर्षाचा बोध होत असतो. तसेच भाग्याचं व्यय स्थान देखील तेच आहे. त्यानुसार भाग्येश जेव्हा भाग्याच्या व्ययातून प्रवास करतो तेव्हा त्याच्याकडून फारशा शुभ परिणामांची आपण अपेक्षा करु शकत नाही. एक महत्त्वाची बाब म्हणजे हा कालखंड खूप लहान असणार आहे. या गोचरमध्ये गुरु महाराज फक्त सहा महिनेच असतील. त्यानंतर ते अतिचार गतीने तुमच्या भाग्यात पोहचतील. तेथून पुढे जवळपास तीन वर्ष तुम्हाला अत्यंत भाग्यवर्धक राहणार आहेत. गुरु महाराजांचे भरभरुन आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. त्यामुळे अडथळे, अडचणी आणि संघर्षाचा हा जो सहा महिन्यांचा कालखंड आहे, तो तुम्ही अत्यंत संयमाने, धैर्याने पार करावा. तेच तुमच्यासाठी योग्य राहिल.
गुरु महाराज पत्रिकेतील ज्या स्थानात बसतात त्यापेक्षा ते ज्या स्थानांवर दृष्टी टाकतात तेथील फळांमध्ये वृद्धी होत असते. म्हणजे त्या स्थानांपासून अधिक शुभ फळे जातकाला प्राप्त होतात. कारण गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असे म्हटले जाते. सध्या ते तुमच्या अष्टम स्थानात जरी प्रवेश करणार असले व त्यापासून तुम्हाला संघर्ष जरी प्राप्त होणार असला तरी त्यांच्या अमृत दृष्टीपासून तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती नक्कीच होईल. कारण गुरु महाराज हे नैसर्गिक शुभ ग्रह आहेत. ते अशुभ स्थानी असले तरी त्यांच्या दृष्टीपासून शुभ फळे प्राप्त होतात.
त्यानुसार अष्टम स्थानातून गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या व्यय स्थानावर पडते आहे. पत्रिकेतील व्यय स्थान हे खर्च, परदेशगमन, हॉस्पिटल यांच्याशी संबंधित स्थान मानलं जातं. त्यामुळे जे जातक मेडीकल क्षेत्रात कार्यरत असतील त्यांना या काळात बर्‍यापैकी आर्थिक लाभ प्राप्त होईल. मग त्यामध्ये व्यावसायिक व नोकरी या दोन्ही ठिकाणी प्रगतीचे द्वार तुमच्यासाठी खुले होतील. जे जातक मागील काही महिन्यांपासून परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करीत असतील त्यांना या काळात यश मिळू शकतं. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न वाढवायला हवेत. त्यासाठी आवश्यक ती तरदूत निर्माण होणं, कागदपत्रांची पूर्तता होणं आदी गोष्टी या काळात उत्तमरीत्या पूर्ण होऊ शकतात.
यानंतर गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या द्वितीय म्हणजे कुटुंब स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन, कुटुंब, वाचा या तीनही गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्या जातकांच्या कौटुंबिक प्रॉपर्टीची विभागणी होणार असेल किंवा पारंपारिक प्रॉपर्टी विषयक तुमचे काही प्रश्न प्रलंबित असतील तर या काळात तुम्हाला चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न वाढवायला हवेत. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल. अष्टमातून जेव्हा धन स्थानावर गुरु महाराजांची दृष्टी पडते तेव्हा अचानक, अनपेक्षित लाभ आणि विनाकष्टाचा मोबदला या गोष्टींपैकी किमान एका मार्गाने पैसा प्राप्त होतो. हा योग तुमच्या पत्रिकेत निर्माण झालेला आहे. १३ एप्रिल २०२२ पर्यंत हा योग आहे. तुमच्याकडे कौटुंबिक एखादं शेत किंवा जुना प्लॉट असेल तर त्याची विक्री करुन खूप मोठा लाभ तुमच्या पदरात पडू शकतो. म्हणून त्या दृष्टीनेही तुम्ही प्रयत्न वाढवायला हवेत.
यानंतर अष्टम स्थानातून गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वास्तु, वाहन, आई, सुखशांती यांचं स्थान म्हणून ओळखलं जातं. मात्र अष्टम स्थानातून ही दृष्टी पडत असल्यामुळे ती अमृत दृष्टी असली आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहिल. जे जातक नवीन वास्तु किंवा वाहनाचा विचार करीत असतील त्यांना एप्रिल महिन्यापर्यंत थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तोपर्यंत जरी तुम्ही थांबलात व त्यानंतर या गोष्टींची खरेदी केली तर ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहिल. तसेही या गोष्टी काही रोज घेतल्या जात नाही. शिवाय या गोष्टींसाठी गुरु महाराजांचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं. ते थोडंसं कुठेतरी कमी पडेल. कारण अष्टम स्थानाला आपण पत्रिकेतील अत्यंत नकारात्मक स्थान मानतो. या स्थानातून सगळे अडथळे, अडचणी, संघर्ष पाहिला जातो. त्यामुळे वास्तु, वाहनासाठी थोडं थांबून घेणेच तुमच्यासाठी उपयुक्त राहिल.
याशिवाय गुरु महाराज जेव्हा धनिष्ठा नक्षत्रातून प्रवास करतील तेव्हा विशेषत: धनलाभाचे योग तुम्हाला प्राप्त होतील. कारण तुमच्या धन स्थानावर त्यांची अमृत दृष्टी पडत आहे. त्यांचा प्रवास जेव्हा शतभिषा नक्षत्रातून सुरु होईल तेव्हा ते तुम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतील. किंबहूना तुम्ही शिस्त लावून घ्यावी, अशी त्यांची अपेक्षा असेल. कारण शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहु हा ग्रह आहे. गुरु महाराज हे अष्टमातून प्रवास करीत आहे. त्यामुळे राहुच्या नक्षत्रातून जेव्हा त्यांचा प्रवास सुरु होईल तेव्हा तुम्ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाटचाल केली तर पुढील प्रगती, यश हे निश्चितच मोठे व लाभदायक राहणार आहे. तसेच पूर्वभाद्रपदा नक्षत्रातून जेव्हा गुरु महाराजांचा प्रवास सुरु होईल तेव्हा तुम्हाला ते नवीन ध्येय देतील. त्या ध्येयाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करायला हवी. कारण पुढील कालखंडात ते जेव्हा मीन, मेष, वृषभ या राशींमधून ते प्रवास करतील तेव्हा तुम्हाला भरभरुन लाभाची प्राप्ती होईल. फक्त आता सहा महिने तुम्हाला अडथळे, अचडणी, संघर्षाचा सामना करावा लागणार आहे.
एकंदरीत विचार केला असता गुरु महाराजाचं हे गोचर कर्क राशीसाठी तात्पुरत्या अडथळ्यांचं, संघर्षाचं जरी असलं तरी त्यातून अचानक धनलाभ होण्याचे योग देखील तुमच्यासाठी जुळून येणार आहेत. ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही या काळाचे नियोजन करायला हवे. संघर्ष करण्याची मानसिकता तयार करुन घ्यायला हवी. जेणे करुन संघर्ष करीत असतांना प्राप्त होणार्‍या लाभाच्या संधींचाही तुम्ही पुरेपुर उपयोग घेऊ शकाल. धन्यवाद! शुभम भवतु!
एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
९८५००९८६८८