Skip to content

अनपेक्षित लाभाच्या संधी
होईल आध्यात्मिक प्रगती

ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर मीन राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत. कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. गुरु महाराज आपल्या ग्रहमालेतील सर्वात शुभ ग्रह मानले जातात. मनुष्याला आयुष्यातील प्रत्येक वळणावर गुरु ग्रहाचं सहकार्य आवश्यक असतं. म्हणजे जन्म, शिक्षण, करिअरच्या माध्यमातून अर्थार्जन, विवाह, धर्म, संतती, भाग्य, धार्मिक-आध्यात्मिक विचार अशा विविध गोष्टींनी यशस्वी मानणसाचं आयुष्य घडत असतं. या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व एकाच ग्रहाकडे आहे. ते म्हणजे गरु महाराज होय.
गुरु महाराजाचं स्वामीत्व भगवान विष्णूंकडे जातं. म्हणून ते नैतिक आचरण शिकवितात. आध्यात्मिकता शिकवितात. उच्च अभिरुचीपूर्ण आयुष्य कसं जगावं? हे शिकवितात. कुंभ राशीत तीन नक्षत्र येतात. धनिष्ठा, शतभिषा आणि पूर्वभाद्रपदा ही तीन नक्षत्रे होय. धनिष्ठा हे मंगळ ग्रहाचं धन देणारं नक्षत्र आहे. या नक्षत्रात गुरु महाराजाचं गोचर हे कुठेतरी शुभत्व प्रदान करेल. त्यानंतर शतभिषा या नक्षत्राचा स्वामी राहु हा ग्रह आहे. राहु शिस्त शिकवितो. त्यानुसार या नक्षत्रातून गुरु महाराजांचे गोचर जनतेने शिस्तीने कसे जगावे? हे शिकविणारे ठरेल. यानंतर पूर्वभाद्रपदा नक्षत्र येईल. ते ध्येय निश्चित करण्याचं नक्षत्र आहे. या नक्षत्राचे स्वामी स्वत: गुरु महाराजचं आहेत. येथून ध्येय निश्चिती होत असते. त्यानुसार प्रत्येक राशीवर त्याचा प्रभाव पडेल.
गुरु महाराजाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या स्थानातून, राशीतून किंवा तत्त्वातून त्यांचा प्रवास सुरु असतो, ते तत्त्व ते समृद्ध करतात. आता ते वायुतत्त्वाच्या कुंभ राशीतून प्रवास करणार आहेत. तेथून त्यांची दृष्टी मिथुन आणि तुळ या राशींवर पडणार आहे. म्हणजे एकाच वेळी वायुतत्त्वाच्या तीनही राशींचा त्रिकोण ते पूर्ण करतात. त्यामुळे एकंदरीत वायुतत्त्वाचा प्रभाव हा भूतलावर वाढतो. वायुतत्त्वाच्या राशी या बुद्धिमान राशी मानल्या जातात. त्याचे शुभ परिणाम निश्चितच सर्वांना प्राप्त होणार आहेत.त्यानुसार त्यांच्या या राशी परिवर्तनाचा मीन राशीवर प्रभाव पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराजांचं गोचर तुमच्यासाठी नेहमीच अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. कारण ते तुमचे राशी स्वामी म्हणजे प्रथम स्थानाचे स्वामी आहेत. सोबतच ते तुमचे दशमेशही आहेत. पत्रिकेतील प्रथम स्थान हे जातकाचं स्वत:चं स्थान असतं. व्यक्तिमत्त्व, स्वभाव यासह अनेक गोष्टींचा त्यावरुन बोध होत असतो. तसेच दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. व्यवसाय-व्यापारातील वृद्धी देखील याच स्थानावरुन बघितली जाते. त्यामुळे मीन राशीसाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह कोणता असेल तर तो म्हणजे गुरु होय. कारण त्याचा प्रभाव पूर्णत: तुमच्या व्यक्तिमत्त्वावर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या दिसण्यावर, एकंदरीतच तुमच्या प्रत्येक कृतीवर पडत असतो. तसेच ते दशमेश व कर्मेश असल्यामुळे कर्माची दिशा ठरविणं, व्यवसायाच्या दिशा ठरविणं अशा अनेक बाबी या गुरु महाराजांकडे जातात. याशिवाय गुरु महाराजांकडे इतर नैसर्गिक कारकत्व देखील आहेत. शिक्षण, ज्ञान, संतती, धनसंपत्ती यासारख्या अनेक गोष्टींचं नैसर्गिक कारकत्व गुरु महाराजांकडे आहे. असे हे गुरु महाराज तुमच्या इच्छापूर्तीच्या स्थानातून प्रवास करीत आहेत. ते स्थान त्यांच्यासाठी उत्तम असलं तरी तिथे ते नीचीचे होते. आता ते राशी परिवर्तन करुन तुमच्या व्यय स्थानात प्रवेश करणार आहेत.
तुमच्या व्यय स्थानात कुंभ राशी येते. कुंभ ही बुद्धिमान राशी म्हणून ओळखली जाते. तर गुरु महाराज हे ज्ञानाचे कारक ग्रह आहेत. त्यामुळे त्यांना कुंभ राशी मानवते. मात्र ते व्यय स्थानात आल्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला फारशी शुभ फळे प्राप्त होऊ शकत नाहीत. राशी स्वामी व्यय स्थानात येणं ही मूळत नकारात्मक बाब समजली जाते. ही स्थिती जेव्हा उत्पन्न होते तेव्हा खर्चाचे प्रमाण वाढणं, कारण असतांना आणि नसतांनाही खर्च करावा लागणं, किंबहूना खर्चाची वेगवेगळी कारणं शोधून काढणं या बाबी प्रामुख्याने समोर येतात. सोबतच जातकाला सातत्याने बाहेर जावंसं वाटतं. प्रवास करावासा वाटतो. दुसर्‍या देशात जावसं वाटतं. मानसिकता कुठेतरी विचलीत झालेली असते. अनेक वेळा जवळची माणसं देखील नकोशी वाटतात. हा एक प्रचंड मोठा प्रभाव म्हणता येईल. त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. कारण तुम्ही या काळात जवळच्या मानसांना तोडलं तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच होतात आणि नंतर त्याचा त्रास तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही. तसे मीन जातक हे मूळत: कुटुंब वत्सल असतात. कौटुंबिक सौख्य त्यांना अत्यंत प्रिय असतं. कुटुंबात सुखशांती असेल तर बाहेरील कुठल्याही आघाडीवर ते यशस्वी होतात. अशा मीन जातकांनी या काळात जर कुटुंबात दुरावा निर्माण करुन घेतला, आपल्या माणसाशी दुरावा तयार केला तर त्याचा दुष्प्रभाव त्यांना बराच काळ सोसावा लागतो.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की व्यय स्थानात आलेल्या गुरु महाराजांपासून फक्त अशुभच प्रभाव मिळतील का? तर तसं होत नाही. कारण गुरु महाराज हे नैसर्गिक शुभ ग्रह आहेत. त्यामुळे ते पूर्णपणे अशुभ कधीच कुठल्याच राशीला होत नाहीत. गुरु ग्रह पत्रिकेत कितीही अशुभ स्थितीत असला तरी त्याला दाता म्हटलं जातं. त्यामुळे तो काही न काही शुभ फळं देतच असतो. आता मीन राशीला बारावा असलेला गुरु इतर तीन स्थानांवर दृष्टी टाकत आहे. आपण याआधीही भरपूर वेळेस चर्चा केली आहे की गुरु महाराज जिथे विराजमान असतात त्यापेक्षा ज्या स्थानांवर त्यांनी दृष्टी असते त्या स्थानांच्या फळांमध्ये ते वृद्धी करीत असतात. कारण त्यांच्या दृष्टीला अमृततुल्य मानली जाते. त्यामुळे व्यय स्थानातील गुरु महाराजांची दृष्टी तुमच्या चतुर्थ, षष्ठ आणि अष्टम या तीन स्थानांवर पडणार आहे. ज्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ फळे नक्कीच प्राप्त होतील.
गुरु महाराजांची पंचम दृष्टी ही तुमच्या चतुर्थ स्थानांवर पडणार आहे. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरुन वास्तु, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य या गोष्टींचा बोध होत असतो. या स्थानावर गुरु महाराजांची व्यय स्थानातून दृष्टी पडत असल्यामुळे या सर्व कारणांसाठी खर्च करणं ही बाब प्रामुख्याने समोर येऊ शकते. जी तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. म्हणजे खर्च जरी होणार असला तरी आपण त्याला शुभ म्हणू शकतो. त्यामुळे तो जर तुम्ही स्विकारला तर पुढचा अशुभ खर्च कमी होण्याची शक्यता ही बर्‍यापैकी जास्त असते. कारण ग्रह फक्त इतकचं पाहतात, की या जातकाला खर्चात पाडायचं आहे. मग तुम्ही शुभ कारणांसाठी खर्च केले की जसं वास्तुचं नूतनीकरण केलं, वाहनाचं नूतनीकरणं केलं, आईच्या आरोग्यावर खर्च केले, घराच्या सुखशांतीसाठी काही खर्च केला तर पुढील काळातील अशुभ खर्च कुठेतरी नक्कीच कमी होतील.
यानंतर व्यय स्थानातील गुरु महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थानावरुन नोकरीचा बोध होत असतो. या स्थानावर पडणारी गुरु महाराजांची दृष्टी तुम्हाला नोकरीत स्थैर्य मिळवून देईल. विशेषत: जे जातक परदेशात नोकरी करीत आहेत त्यांना जरा जास्तच स्थैर्य देईल. देशातील जातकांना देखील नोकरीत बर्‍यापैकी यश देईल. षष्ठ स्थानावरुन कर्ज, स्पर्धक, हितशत्रुंची स्थिती देखील बघितली जाते. त्यानुसार या काळात तुम्ही आपल्या स्पर्धकांवर मात करु शकाल. हितशत्रुंच्या कारवायांपासून सुरक्षित राहु शकाल. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होऊ शकेल. मात्र या काळात घेतलेलं कर्ज तुमच्यासाठी फारसं लाभदायक ठरेलं, असं दिसत नाही. त्यामुळे या काळात तुम्ही कर्ज घेण्याचा विचार न करणंच योग्य राहिल.
यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी ही तुमच्या अष्टम स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील अष्टम स्थानावरुन अनपेक्षित लाभ बघितला जातो. त्यानुसार या स्थानावर पडणारी गुरु महाराजांची दृष्टी तुम्हाला कौटुंबिक धनलाभ प्राप्त करुन देऊ शकते. आर्थिक लाभ प्राप्त करुन देऊन शकते. ज्या जातकांचे कौटुंबिक प्रॉपर्टीविषयक प्रश्न प्रलंबित असतील ते या काळात सुटू शकतात. त्यातून देखील तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होण्याची शक्यता येथे बर्‍यापैकी जास्त दिसून येत आहे.
यापेक्षा व्यय स्थानात गेलेले गुरु महाराज हे आध्यात्मिक उन्नती घडवून आणतात. विशेषत: मीन जातकांच्या बाबतीत ही बाब अधिक घडून येते. कारण मीन जातक हे मूळत: आध्यात्मिक, धार्मिक प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे या काळात धार्मिक कारणांनी तुमचा एखादा मोठा खर्च होणं, त्यासाठी तुमचा वेळ खर्च होणं ही या बाबी घडू शकतात. मात्र तो तुमच्यासाठी शुभ देखील राहु शकतो. किंबहूना त्याचे दीर्घकालीन परिणाम तुमच्यावर नक्कीच होतील. आपण जेव्हा एखादं धार्मिक कार्य करतो तेव्हा आपल्याला जे आशीर्वाद प्राप्त होतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात.
याच बरोबर पत्रिकेतील द्वादश स्थान हे मोक्ष त्रिकोणातील अंतिम स्थान आहे. मोक्षाकडे जाणारे मार्ग येथून प्रशस्त होतात. जन्म-मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचं देखील हे स्थान आहे. त्यामुळे या काळात जर तुम्ही ध्यान धारणा वाढवली, त्यात योग्य ती प्रगती केली तर बौद्धिक प्रगल्भता वाढणं, आध्यात्मिक उंची गाठणं ही तुमच्यासाठी सहज साध्य होणारी बाब असेल. त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला दीर्घकाळासाठी प्राप्त होतील. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे या गोचरचा कालावधी हा केवळ सहा महिन्यांचा आहे. ऐरवी गुरु महाराजांचं गोचर हे तेरा महिन्यांचं असतं. मात्र ते आता सहा महिन्यांचेच असल्यामुळे १३ एप्रिल २०२२ रोजी गुरु महाराज तुमच्या राशीत प्रवेश करतील. स्वराशीचे गुरु महाराज तुमच्या प्रथम स्थानात आल्यानंतर तुम्हाला भरभरुन शुभ फळे प्राप्त करुन देणार आहेत. तो काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्तम असणार आहे. त्यामुळे तुम्ही असा विचार करा की आता जरी थोडा संघर्ष असला तरी भविष्यातील सोनेरी वाटेकडे तुम्ही वाटचाल करीत आहात. ते यश तुम्हाला भविष्यात प्राप्त होणारच आहे. तो काळही फार जास्त लांब नाही. म्हणून हा थोडा खडतर प्रवास तुम्ही धैर्याने, संयमाने पूर्ण करावा, जेणे करुन पुढील उत्तम काळ नक्कीच प्राप्त होईल. धन्यवाद!
शुभम भवतु!
एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
९८५००९८६८८