Skip to content
Home » गुरु परिवर्तन – मिथुन रास

गुरु परिवर्तन – मिथुन रास

संघर्ष, संकटातून मुक्ती
भाग्यात होईल वृद्धी
ग्रह हे सतत भ्रमण करीत असतात. त्यांच्या गोचरचा विविध राशींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेळी आपण त्या प्रभावांचं राशीनुसार विश्लेषण तुमच्यासाठी उपलब्ध करुन देत असतो. दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी गुरु परिवर्तन घडून येणार आहे. म्हणजे गुरु महाराज मकर राशीतून कुंभ राशीत गोचरने प्रवेश करणार आहेत. त्यांचं हे गोचर मिथुन राशीच्या जातकांसाठी कसं राहिल? यावर आपण आजच्या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत.कारण गुरु महाराजाचं हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण गुरु महाराज व त्यांच्या या गोचरचं महत्त्व समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती समृद्ध जाणारं? तो आपल्या आयुष्यात किती यशस्वी होणार? तो उच्च अभिरुचीपूर्ण आयुष्य जगणार की चुकीच्या वाटेने मार्गक्रमण करणार? तो अत्यंत श्रीमंतीत आयुष्य जगणार की गरीबीत दिवस काढणार? उच्चशिक्षण घेणार की शिक्षण न घेताच इतर कार्य करीत राहणार? या सर्व गोष्टी ठरविणारा ग्रह म्हणजे गुरु होय. मूळ पत्रिकेत गुरु महाराज जर योग्य स्थानी, योग्य राशीत, योग्य अंशात असले, नवमांशात त्यांची स्थिती योग्य असली तर त्या जातकाचं आयुष्य समृद्ध आणि संपन्न होतं. तसेच आपण असंही सांगू शकतो की एखाद्या माणसाचं यश मोजायचं असेल तर मूळ पत्रिकेतील गुरुची स्थिती बघावी. मूळ पत्रिकेतील गुरु महाराजांची स्थिती जितकी महत्त्वाची ठरते तितकीच त्यांची गोचरची स्थिती देखील महत्त्वाची ठरते. मूळ पत्रिकेतील स्थितीचा जितका परिणाम होतो, तितकाच गोचरच्या स्थितीचाही परिणाम हा तिव्र असतो.
राशीचक्रातील धनु आणि मीन या दोन राशीचं स्वामीत्व त्यांच्याकडे आहे. धनु ही त्यांची अग्नीतत्त्वाची रास तर मीन ही त्यांची जलतत्त्वाची रास आहे. गुरु महाराजांचे मित्र ग्रह म्हणजे सूर्य, चंद्र व मंगळ होय. बुध आणि शुक्र हे त्यांचे शत्रु ग्रह आहेत. शुक्र म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य तर गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती होय. त्यांच्यामुळे त्यांच्या एक नैसर्गिक शत्रुत्व येथे निर्माण होतं. शनि हा ग्रह मात्र त्यांचा सम ग्रह आहे. आता सम असणे म्हणजे काय असतं? तर ती वन वे मैत्री असते. अर्थात शनि गुरुला आपला मित्र मानतो तर गुरु शनिला शत्रु मानतो. त्यामुळे त्यांच्यात समत्वाचं नातं तयार होतं. त्यांच्यात फार मैत्रीही नसते आणि फार शत्रुत्वही नसतं. अशी सर्व परिस्थिती असतांना गुरु महाराज कर्क राशीत उच्चीचे होतात. तिथे ते ०५ अंशापर्यंत उच्चीचे होतात तर मकर राशीत ०५ अंशापर्यंत ते परम नीचीचे होतात. मकर ही त्यांची नीच रास आहे. आता ते २० नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी राशी परिवर्तन करुन कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. म्हणजे ते तुमच्या अष्टम स्थानातून भाग्य स्थानात प्रवेश करणार आहेत. गुरु महाराजांच्या या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीवर प्रभाव पडेल? हे आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया.म
मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु महाराज हे तुमच्या सप्तम आणि दशम या दोन स्थानांचे अधिपती आहेत. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं. व्यावसायिक भागिदाराचंही ते स्थान असतं. म्हणजे भागिदारीतील व्यवसायाचं यश देखील येथून बघितल्या जातं. तसेच पत्रिकेतील दशम स्थान हे कर्म स्थान म्हणून ओळखलं जातं. व्यवसाय देखील याच स्थानावरुन बघितला जातो. या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्र स्थानांचं स्वामीत्व गुरु महाराजांकडे असतं. मात्र इथे त्यांना केंद्राधिपती दोष लागत असल्यामुळे मिथुन राशीला गुरु महाराज हे कारक ग्रह ठरत नाहीत. तरी देखील अत्यंत महत्त्वाची खाती मात्र त्यांच्याकडे आहेत. म्हणूनच मिथुन राशीसाठी गुरु महाराजांची स्थिती व त्यांचं गोचर हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. ते तुमच्या अष्टम स्थानात नीच अवस्थेत विराजमान आहेत. आता ते तुमच्या भाग्य स्थानात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे साहजिकच तुमच्या भाग्यात वृद्धी होईल.
गुरु महाराज जिथे बसलेले असतात त्या स्थानापेक्षा त्यांची दृष्टी ज्या स्थानावर पडते, तेथील शुभता ते वृद्धिंगत करतात. म्हणजे त्या स्थानांची देखील अत्यंत शुभ फळे जातकाला प्राप्त होतात. कारण गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृत दृष्टी मानली जाते. आधी सांगितल्याप्रमाणे गुरु महाराज हे तुमच्या अष्टम स्थानातून प्रवास करीत आहेत. आठवा गुरु हा जास्त शुभदायक मानला जात नाही. कारण पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे, अडचणी, संघर्ष दर्शवित असतं. आता ते तुमच्या भाग्य स्थानात प्रवेश करणार आहेत. सप्तमेश भाग्यात येणं म्हणजे वैवाहिक जोडीदाराकडून भाग्यवर्धक बातम्या मिळणं किंवा विवाह ठरल्यास तो भाग्यवर्धक होणं, विवाहानंतर भाग्यात वृद्धी होणं हा प्रकार घडून येतो. त्यादृष्टीने हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहिल.
गुरु महाराज तुमचे दशमेशही आहेत. त्यादृष्टीने विचार केला असता केंद्राचा स्वामी येथे त्रिकोणात आलेला आहे. ही निश्चितच एक शुभ बाब म्हणता येईल. कारण केंद्राचा स्वामी जेव्हा त्रिकोणात येतो तेव्हा केंद्रत्रिकोण योग ज्याला लक्ष्मीनारायण योग देखील म्हणता, तो येथे संपन्न होत असतो. त्याची देखील अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील. गुरु महाराज हे गेली काही महिने नीच राशीतून प्रवास करीत आहेत. आता ते कुंभ राशीत प्रवेश करतील. कुंभ राशीचेही स्वामी शनि महाराजच असले तरी ती वायुतत्त्वाची बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. ज्ञानाचे कारक गुरु महाराजांना ही बुद्धिमान रास नक्कीच मानवते. अर्थातच त्याची शुभ फळे तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. महत्त्वाची बाब म्हणजे कुंभ राशीत गुरु महाराज हे अतिचार गतीने प्रवास करणार आहेत. म्हणजे ऐरवी गुरु महाराज एका राशीत साधारणपणे तेरा महिने विराजमान असतात. मात्र आता ते १३ एप्रिल २०२२ रोजीच मीन राशीत प्रवेश करतील. मीन ही त्यांची स्वत:ची रास आहे. स्वराशीकडे जाणारा ग्रह हा लाभदायक ठरतो. कारण त्याला आपल्या घरी जाण्याची ओढ लागलेली असते. त्यानुसार अतिचार गतीने ते आपल्या घराकडे जाणार आहेत. यात एक आनंद देखील लपलेला असतो कि मी आता माझ्या घरी जाणार आहे. त्याची देखील अत्यंत शुभ फळं तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील.
ज्योतिषशास्त्रातील नियमांनुसार भाग्य स्थानातील गुरु महाराज हे अत्यंत प्रबळ मानले जातात. कारण तेथून त्यांची पंचम दृष्टी ही तुमच्या राशीवर, सप्तम दृष्टी तृतीय स्थानावर आणि नवम दृष्टी पंचम स्थानावर पडणार आहे. जी तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहिल. कारण गुरु महाराजांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. शिवाय भाग्य स्थानातील गुरु महाराज हे एकटेच धर्म त्रिकोण पूर्ण करतात. जी अत्यंत महत्त्वाची व शुभदायक बाब म्हटली जाते. त्याची पूर्तता गुरु महाराजांसारख्या नैसर्गिक शुभ ग्रहाद्वारे जेव्हा होते तेव्हा त्याची अधिकच शुभ फळे प्राप्त होतात.
गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या राशीवर म्हणजे प्रथम स्थानावर पडणार आहे. पत्रिकेतील प्रथम स्थान हे जातकं स्वत:चं स्थान असतं. त्यावरुन व्यक्तिमत्त्वाचा बोध होत असतो. या स्थानावर पडणार्‍या गुरु महाराजांच्या अमृत दृष्टीमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होणार आहे. जे मिथुन जातक लेखक, कवी असतील त्यांच्या लिखाणाला एक वेगळीच झळाळी या काळात प्राप्त होईल. तुम्ही जे काही लिखाण करीत असाल त्यात सखोलता प्राप्त होणं, ज्ञानात वृद्धी होणं या सारखे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. म्हणजे यापूर्वी तुम्ही जे काही लिखाण करीत होता त्यापेक्षा या काळात तुम्ही जे लिखाण कराल त्यात तुम्हाला जास्त यश प्राप्त होईल, असं आपण म्हणू शकतो. कारण गुरु महाराजांची पंचम दृष्टी तुमच्या राशीवर तर सप्तम दृष्टी तृतीय स्थानावर पडत आहे. तृतीय स्थान हे लेखन कलेशी निगडीत स्थान देखील आहे. एकाच वेळी या दोन्ही स्थानांवर दृष्टी पडत असल्यामुळे त्याचे शुभ परिणाम या पद्धतीने व्यक्त होतील.
सोबतच तुमचा राशी स्वामी बुध ग्र्रह २० नोव्हेंबर रोजी गुरु महाराजांसोबत नवपंचम योग करीत आहे. त्याचे देखील अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. ज्यामुळे कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रचंड यश मिळेल. विशेषत: जे जातक लेखक, कवी असतील, मॅनेजमेंट सेक्टरमध्ये कार्यरत असतील, शिक्षक असतील, शैक्षणिक संस्थेचे चालक किंवा त्यात मोठे पदाधिकारी असतील सोबतच राजकारण, समाजकारणात जे मिथुन जातक कार्यरत आहेत त्यांना बर्‍यापैकी मोठं यश या काळात प्राप्त होईल.
यानंतर गुरु महाराजांची नवम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील पंचम स्थान हे शिक्षण, संतती, प्रणय यांचं स्थान म्हणून ओळखलं जातं. संतती या काळात तुम्हाला प्रचंड आनंद देणार आहे. तुमच्या सर्व इच्छा ते या काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. किंबहूना संततीच्या कर्तृत्वाने तुम्ही भारवून जाणार आहात. जे जातक घर पाळणा हलण्याची वाट बघत असतील त्यांची देखील मनोकामना या काळात पूर्ण होईल. उपवर जातकांचे विवाह जुळून येतील.
एकंदरीत पाहता गुरु महाराजांचं हे गोचर मिथुन जातकांना अनेक बाबतीत लाभदायक ठरणार आहे. इष्टदेवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. शेअर मार्केट सारख्या ठिकाणाहून तुम्हाला पैसा प्राप्त होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मिथुन जातकांना या काळात धार्मिक गोष्टींसाठी काहीतरी कार्य करावंसं वाटेल. किंबहूना एखाद्यं मोठं धार्मिक कार्य तुमच्या हातून घडून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी होणं, त्यासाठी खर्च करणं आणि त्यात आनंद मानणं हा सगळा प्रकार तुमच्या सोबत घडून येईल. यानंतर पुढील एप्रिल मध्ये जेव्हा गुरु महाराज मीन राशीत म्हणजे तुमच्या दशम स्थानात जातील तेव्हा त्यांच्या शुभत्वात अजून जास्त वाढ होणार आहे. थोडक्यात या पुढील कालखंड हा तुमच्या सर्वार्थाने लाभदायक ठरणार आहेत. त्याचा तुम्ही पुरेपुर उपयोग करुन घ्यावा. धन्यवाद! शुभम भवतु!


एस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी
९८५००९८६८८